Thursday, September 18, 2025
Homeलेखमर्मबंधातली ठेव

मर्मबंधातली ठेव

काही काही गोष्टी या विस्मरणात जातच नाहीत. आताही मी त्या जागी मला पाहू शकते इतके स्पष्ट ते दृश्य मला डोळ्यांसमोर दिसते.

साधारण चवथी पाचवीत असेन मी. तेव्हा आमच्या शिवण शिकवणाऱ्या बाईंकडे मी जात असे. वर्गातल्या इतरही मुली असतच बरोबर. बाई आम्हाला हेम, टीप कशी घालायची ते शिकवत असत. आम्ही कापडाच्या तुकड्यावर सुई दोरा घेऊन सराव करीत असू.

तेव्हा तिथे समोरच्या घरात रेडिओ होता. मोठे हौशी लोक असावेत बिचारे ! हो, अहो मी साठ पासष्ट वर्षांपूर्वीची घटना सांगते आहे. त्या रेडिओवर लताने गाईलेले ”राधा ना बोले ना बोले ना बोले रे” हे गाणे चालू असे व समोरच्या घराच्या ओट्यावर आम्ही शिवणकाम शिकत असू.

लताच्या सुमधुर आवाजातले ते गाणे लागले रे लागले की, माझे जीवाचे कान होत नि अवघी आठ नऊ वर्षांची मी जीवाचे कान करून ते गाणे ऐकत असे. काहीही फारसे न कळण्याचे माझे वय होते, पण माहित नाही त्या गाण्यात जो तबला वाजतो तो तुम्ही आज ही ऐकून पहा… अहो, काय बोलतो तो
तबला ? व्वा आता ही त्याचा तो ठेका माझ्या डोक्यात घुमू लागला आहे. गाणे तर अप्रतिम आहेच पण त्या तबल्याच्या दमदार ठेक्याने ते अधिकच मनात शिरते व माणूस कान देऊन नुसता तबला ऐकू लागतो. वाह वा.. काय ठेका आहे त्याचा ? लाजवाब.. केवळ लाजवाब.. खेड्यातली मुलगी, गाण्यातला गा ही न कळणारी, पण काय असेल ते असो, मला गाण्याचा कान आहे, उत्तम क्लासिकल गाणी मला फार आवडतात.!

ते गाणे इतकी वर्षे गेली तरी मी जरा ही विसरले नाहीच पण टेपरेकॅार्डरच्या नव्या जमान्यात मी ते पुन्हा जीवाचे कान करून ऐकले कारण मधली ३०… ४० वर्ष ते मला माझ्या मनाच्या कप्प्यात असले तरी ऐकायला मिळाले नव्हते. मला अत्यंत प्रिय असलेले हे गाणे जणू माझी “मर्मबंधातली” ठेव बनली होती नि मला ती कितीतरी वर्षे दुर्मिळ झाली होती. हो.. पूर्वी अशी उठसूठ गाणी उपलब्ध नव्हती. रेडिओवर आवडीची गाणी लोक जीवाचा कान करून ऐकत असत. म्हणूनच अमिन सयानीची रेडिओ सिलोनवरची ‘बिनाका गीतमाला’ एवढी फेमस झाली होती.

मला आठवते, ११ वाजता कामगार सभा सुरू झाली की, घरोघरच्या रेडिओचे आवाज फुल्ल होत असत व सगळी गल्ली मोठ्या आवाजात कामगार सभेतील गाणी ऐकत असे. अतिशय आनंदाचे ते घरोघरचे क्षण होते नि सर्वांचे या बाबतीत एकमत होते हे ही तितकेच खरे आहे.

तिच गोष्ट बिनाका मालेबाबत म्हणता येईल. हिंदी गाण्यांना नाव लौकिक मिळवून देण्यात अमिन सयानींचा मोठा वाटा आहे हे कोणी ही नाकारू शकत नाही .

ही गोष्ट माझ्या आईची !
ती काही फार शिकलेली नव्हती. माझे वडिल फार हौशी होते. जगातले जे जे नवे व चांगले ते आपल्याकडे हवे असे त्यांना वाटायचे. म्हणून त्यांनी ग्रामोफोन आणला. पूर्वी काळी गोल तबकडी मिळायची गाण्यांची. तुम्ही पाहिली असेल, हिज मास्टर्स व्हाईस ऐकणारा तो ग्रामोफोनच्या तबकडी समोर मन लावून गाणे ऐकणारा कुत्रा ! मान तिरपी करून तो गाणे ऐकतो असे ते चित्र तबकडीवर असे.

तर तो ग्रामोफोन, एका हॅण्डल ने गोल गोल फिरवून त्यात आम्ही हवा भरायचो नि मग त्या गोल फिरणाऱ्या तबकडीवर ती काळी गाण्याची तबकडी ठेवायची व ती फिरत असतांनाच सुई असलेले हॅण्डल त्या वर टेकले की लगेच गाणे वाजायला सुरूवात व्हायची.

राजकपूर नर्गिस चे सिनेमे तेव्हा जोरात होते. ‘राजा की आएगी बरात’ पासून ‘ओ बसंती पवन पागल’ पर्यंत सगळी गाणी ऐकायला आमची अख्खी गल्ली आमच्या अंगणात येऊन बसे.
नि मी मोठ्या तोऱ्यात गाणे लावत असे. एक तबकडी संपली की, ती काढून दुसरी ठेवायची व वाजवायची असा तो कार्यक्रम असे.
तर काय सांगत होते मी… हं, आई पण ती गाणी ऐकायची पण त्यातले एक गाणे तिला विशेष आवडायचे..
ते म्हणजे ”मारी कटारी मर जाना“ हे गाणे ऐकले की ती विशेष खुष व्हायची ! नऊवारी छान साडी, कपाळावर कुंकवाची आडवी चिरी लावलेली माझी आई गालातल्या गालात अशी खुदकन् हसायची की तिच्या डोक्यावरच्या पदरा आडून ही तिचे ते हसू मी इतकी लहान असूनही माझ्या नजरेतून सुटत नसे.

आई गेली तरी ते दृश्य माझ्या नजरे समोरून कधी ही पुसले गेले नाही . . इतके की अलिकडे सहज उपलब्धीच्या जमान्यात माझ्या मिस्टरांना बऱ्याच वर्षांपूर्वी ते शोधायला लावून पुन्हा मी ते जीवाचे कान करून
ऐकले. पुन्हा आई नसली तरी तिचा हसरा पदराआडचा चेहरा मला दिसला नि मी पुन्हा खुश झाले.

काय मंडळी … कुणा कुणाच्या जीवनात अशा ही मर्मबंधाच्या ठेवी असू शकतात … विश्वास बसत नाही ना ?
पण कुणाच्या असोत नसोत… माझ्या मात्र या मर्मबंधातल्या ठेवी आहेत. अजून ही बऱ्याच काही आहेत पण सगळ्या इथे सांगणं कसं शक्य आहे ? म्हणून थांबते.
हसू नका बरं मला … नाही तर मला वाईट वाटेल …

प्रा. सुमती पवार

– लेखन : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. रेडिओच्या आणि ग्रामोफोनच्या आठवणी सुमती पवार यांनी चांगल्या पध्दतीने शब्दबद्ध केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा