Monday, December 22, 2025
Homeसेवा"माहिती"तील आठवणी ( ५ )

“माहिती”तील आठवणी ( ५ )

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील व्यक्तींच्या आठवणी आपण दर शनिवारी वाचत आहोत. या आठवणींना मिळणाऱ्या छान प्रतिसादाबद्दल वाचकांचे मनःपूर्वक आभार.

माहिती खात्यातील अधिकारी, फोटोग्राफर, कॅमेरामन, ड्रायव्हर आदीं मंडळी सतत सर्वांच्या नजरेसमोर असतात. त्यामुळे ही मंडळी लोकांना व लोक त्यांना ओळखत असतात.

पण पडद्यामागेही अहोरात्र काम करणाऱ्या अनेक व्यक्ती, शाखा या खात्यात आहेत. संकलक हे असेच एक महत्वाचे पद आहे.

श्री विकास पाटील यांच्या या आठवणींमुळे एरव्ही पडद्यामागे असणारे संकलकाचे काम पडद्यावर येत आहे…

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, फिल्म सेंटर, ताडदेव, मुंबई
येथे चित्रपट विभागात “फिल्म लायब्ररीयन” या पदावर मी हजर झालो तो दिवस होता १ ऑक्टोबर १९८१.

तांत्रिक काम खूप आणि लिखापढी कमी असे हे पद. अंदाजे १०,००० फिल्मची रिळे असलेली ही लायब्ररी. ही लायब्ररी मी पूर्ण अप-टू-डेट ठेवली होती. २२ वर्षे मी या पदावर कार्यरत होतो. एका खेड्यातनं मुंबईला नोकरी करण्यासाठी आलेला, फिल्म विषयी काहीही जाण नसलेल्या मला चित्रपटाशी संबंधित कामे सरावाने, काही पाहून इथेच शिकता आली. (इथे मला शिकायचे आहे असं म्हटलं तरी शिकवायला कुणीही तयार नसतं.) तशात फिल्म सेंटरचा माहोलच चित्रपटाचा होता. देशात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटापैकी ९० टक्के चित्रपटाचे काम जसे एडीटींग, रेकॉर्डींग, डबींग, फायनल प्रिंटींग इत्यादी ही अशी चित्रपटाशी जोडलेली सर्वच कामे या लॕबोरेटरीमधे होत असत.

आर. डी. बर्मन यांचे रेकॉर्डिंग स्टुडिओचं बुकींग फिल्म सेंटरलाच असायचे. आपल्या कार्यालयाच्या वरच हा स्टुडीओ होता. लतादीदी, आशाताई, अनुराधा पौडवाल, किशोरदा, रफीसाहेब अशी मंडळी या स्टुडीओत हमेशा असायची. रमेश सिप्पींसह अनेकांचे एडीटींग सुट एका ओळीत होते. अमिताभ, अमजद खान, जितेंद्र, धर्मेंद्र यांसारखी दिग्गज मंडळींची रेलचेल अधून मधून असायची. त्यामुळे ही मंडळी आम्हाला जवळून पाहता आली.

के. वैकुंठ, हे कॕमेरा क्षेत्रातलं असामी व्यक्तिमत्व. “दादा” म्हणून फेमस. धर्मेंद्रच्या “बगावत” या चित्रपटाचे ते कॕमेरामन. या चित्रपटाच्या एडीटींगसाठी फिल्म सेंटरला आले की मला हमखास भेटायला येत. माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सोबत घेऊन जात. माझ्या पाठीवर थाप मारत “ए… हा साला आपला बच्चा आहे. एकदम हुषार आहे.” असे सर्वांना ठासून सांगत. ज्या व्यक्तिला या क्षेत्रातले कॕमेरामन दोन हात अंतर ठेवून चरणस्पर्श करीत, अशी व्यक्ति माझ्या खांद्यावर हात ठेवून मला आपल्या मुलासारखे या माहोलात घेऊन हिंडत. माझ्यासाठी हा खूप अविस्मरणीय असा अनुभव असायचा. त्यांचा मुलगा आतिश वैकुंठ हा दुरदर्शन वर कॕमेरामन म्हणून काम करीत होता.

चित्रपट हे क्षेत्र माझ्यासाठी इंटरेस्टींग असलं तरी पूर्णतः नवीनच होतं. खरं तर या क्षेत्रात पदार्पण करावयाचे असल्यास तुमच्या पाठीशी कुणीतरी “गॉडफादर” असावा लागतो. अन्यथा तसे कुणी तुमची डाळ कुणी शिजू देत नाही. या क्षेत्रात ज्याचं नाव आहे त्याच्याकडे काम आहे. बाकीच्यांची वणवण असते. सुरुवातीला मेहनत करायची असेल तर विना मोबदलाच काम करावे लागते. तेही कुणाच्या तरी ओळखीनेच. कामात थोडेफार हुषारी दाखवली तरच मोबदल्याची शक्यता.. शाश्वती नाही..

माझी शासकीय नोकरी असल्याने मला असा काही प्रश्नच आला नाही. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक स्व. दिलिप जामदार हे माझे गॉडफादर..! के. वैकुंठदादा हे त्यांचेच मित्र. हे दोघेही माझ्या वडीलांचे मित्र. माझी वडील पूण्यायी म्हणून अशा दिग्गज, मातब्बर मंडळींचा आशिर्वाद माझ्या पाठीशी होता. अशांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा योग आला.

मी हजर झालो तेव्हा मला अनंत चव्हाण, वसंत गुणदेकर, किरण ठाकूर ही कार्यालयात कार्यरत असलेली मंडळी, एडीटींग विभागात फिल्म एडीटर श्री. व्यंकटेश भोंडे साहेब, प्रकाश पालेकर, असिस्टंट फिल्म एडीटर विनायक हरदास, फिल्म जॉयनर कृष्णा तरडे, मेघःशाम मांजरेकर, केशव गुणदेकर, फिल्म प्रोजेक्टर ऑपरेटर रामभाऊ नागांवकर, सुरेश कोळी, सहाय्यक पांडुरंग पवार, गजानन सावंत या मंडळींसोबत काम करता आले. या अनुभव संपन्न मंडळींचा सहवास मला मिळाला. आज बरीचशी मंडळी हयात नाही पण.. मला त्यांच्या सहवासातून खूप काही शिकता आले.

चित्रपट विभागा कडून दर वर्षी १२ न्युज रील आणि १२ डाक्युमेंटरी फिल्मची (६ डॉक्युमेंटरी बाह्य निर्माते आणि ६ डॉक्युमेंटरी विभागीय) निर्मिती केली जात असे. बाह्य निर्मात्यांमधे रमेश देव, जब्बार पटेल, विजय आरोरा, विनय आपटे, कॕ. पुरुष बावकर, विजय देशमुख, मेघनाद कुलकर्णी अशी जी जाहिरात, लघुपट, चित्रपट निर्मितीत नावाजलेली मंडळी आपल्या माहिती खात्यासाठी चित्रपट निर्मितीचे काम करीत. या मंडळींचा सहवास मला मिळाला.

चित्रपट विभाग, ताडदेव हे एक कुटुंबच होते. वेळच्यावेळी कामे होत असल्याने निर्मल साहेबांनी (असी.डायरेक्टर (फिल्म्स)) आमच्यावर कधीच बंधने घातली नाही. सर्वांना सांभाळून घेत. सर्वच पुरुष मंडळी असल्याने महिला विरहित या विभागात गमतीदार वातावरणातच कामे होत असत.

कार्यालयात लक्ष्मण ध. जाधव हे वॉचमन म्हणून होते. मिलट्री एक्स सर्विसमन. त्यांना ल.ध. जाधव हाक मारले की खूप चिडायचे. माझे नाव लक्ष्मण धर्माजी जाधव आहे ल.ध. नाही. एडीटींग विभाग हा पहिल्या माळ्यावर तर ऑफीस दुसऱ्या माळ्यावर होते. कुणी कार्यालयात कामानिमित्त आले की पहिल्या माळ्यावरच एडीटींग मधेच येत आणि चौकशी करत. दुसऱ्या माळ्यावर ऑफीसमधे पाठवताना पालेकर गंमत करायचे. पाहूण्यांना सांगायचे ऑफिस वर आहे. तिथे पांढरे केस आणि झोकदार पांढरी मिशी असलेली म्हातारी व्यक्ती बसली असेल. तिला ऐकायला कमी येते. अगदी जवळ जाऊन मोठ्याने विचारा की इथे ल.ध. जाधव कोण आहेत..? ते तुम्हाला मार्गदर्शन करतील.”
ती बिचारी व्यक्ती सांगितल्या प्रमाणे जाधवांच्या जवळ जाऊन मोठ्ठ्याने विचारी की, इथे ल.ध. जाधव कोण आहेत..? मग जाधव इतके चिडत की , येणाऱ्याला म्हणत, तुम्हाला त्या पालेकरने पाठवले असेल ना ?
दोन शिव्या पालेकरांना हासडत. तुम्हाला कोणाला भेटायचे आहे ते सांगा ? शांतपणे काम चाललेल्या ऑफीसमधे हास्याचे फवारे फुटत.

इथले असे अनेक गमतीदार किस्से आहेत.
नारकर म्हणून नवीन शिपाई आला होता. निर्मल साहेबांचा हा शिपाई. पोईपकर हा (शिपाई) जवळ बसूनच बारीक आवाजात हाक मारण्यात वाकबगार होता. जसे की लांबून कुणीतरी आपल्याला साद घालतंय.. नारकर इधर आओ..
नारकर धावतच निर्मल साहेबांकडे जायचा. “हां सर..” “अरे मैने नही बुलाया..” साहेब.
थोड्यावेळाने “अरे नारकर… सुना नही..?”
नारकर धावतच साहेबांकडे जायचा. “हां सर..”
“अरे पागल हो गया है क्या तू.. मैने कहॉ बुलाया ?..”
मग नारकर सांगायचा “मला भास का होतात कळत नाही. कुणीतरी हाक मारतोय असा भास होतोय मला.”
पोईपकर सांगायचा,
“अरे या बिल्डिंगमधे भूत आहे. ते तूला हाक मार असेल. तू असे कर अमावस्येच्या दिवशी रात्री दिवा लाव की मग सुटका होईल…”
सांगितल्या प्रमाणे त्याने अमावस्येला दिवाही लावला होता… नंतर त्याला कळले की हेच लोक माझी टेर खेचतात.

सु. रा. कदमांचे तर अनेक किस्से आहेत. अनेक जण खास किस्से ऐकण्यासाठी वेळ काढून येत असत..

ताडदेवचा हा तांत्रिक विभाग असल्याने कामाचे स्वरुप पूर्णतः वेगळ्या स्वरुपाचे होते. त्यामुळे कुणी इथे काम करायला तयार नसत. सुरवातीच्या काळात अहोरात्र काम चालत असे. काम संपता संपत नव्हतं तरीही वातावरण आनंदी होतं..

चित्रपट निर्मितीसाठी लागणारा रॉ-स्टॉक (निगेटिव्ह) चे भारतातले मेन सप्लायर फिल्म सेंटरचे मालक “पटेल इंडिया लिमी.” हे होते. फिल्म लॕबॉरेटरीज, रेकॉर्डिंग स्टुडीओज ताडदेव विभागात असल्याने चित्रपट निर्मितीसाठी कुठलीही अडचण येत नसे.

चित्रपट विभागात अहोरात्र निर्मितिचे काम होत असे. “लघुचित्रपट (डॉक्युमेंटरी) “निर्मिती चित्रपट विभागाची शान होती. फिल्म प्रभाग, भारत सरकारच्या बरोबरीने चित्रपट निर्मिती होत होती. सेंन्सॉर बोर्ड, फिल्म प्रभाग, एन्. एफ्. डी. सी., नेहरु सेंटर या विभागात विशेष आदरभाव दाखविला जाई. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल चित्रपट विभागाला खास जबाबदारी
दिली जात असे. अनेक फिल्म फेस्टिवल्सला आम्ही सेवा दिली आहे.
मराठी चित्रपट विभागात मान्यवरांचे अभिप्राय घेण्यासाठी स्मिता तळवळकरांच्या सोबत मला कामाची जबाबदारी दिली होती.

आपण निर्मिती केलेल्या डॉक्युमेंटरी-न्युजरील राज्यातील सर्व चित्रपटगृहामधून प्रदर्शित करण्याचे बंधन चित्रपटगृहांना होते. आणि १६ मि.मि . प्रती तयार करुन हे अनुबोधपट राज्यातील सर्व जिल्हा माहिती कार्यालयामार्फत खेडोपाड्यात प्रदर्शित होत असत.

चित्रपट विभागाकडून “शेर शिवाजी” हा रंगीत हिंदी चित्रपट, अंदाजे ३५० डाक्युमेंटरीज आणि अंदाजे ४६० न्युजरीलची निर्मिती केली आहे. या शिवाय “प्रपंच, स्वप्न तेच लोचनी, शामची आई, महात्मा फुले” या चित्रपटांचे सर्व हक्क आपल्या विभागाकडे आहेत.

१९९५ च्या दरम्यान व्हिडीओ माध्यमामुळे फिल्म मिडीयावर मंदीचे सावट आले. घरोघरी, गल्लोगल्ली व्हिएचएस व्हिडीओ कॕसेटवर नवीन नवीन चित्रपट अगदी सहज मिळू लागले. चित्रपटगृह बंद पडू लागली. टिव्ही चॕनल्सनी जोर घेतले. फिल्म मिडीया पूर्ण ठप्प झाले. काम बंद झाले. माध्यम नवीन असल्याने व्हिडीओचा अनुभव नाही. अगदी मोजक्याचं स्टुडीओमधून हे काम चालत असे. बऱ्याच लोकांवर ऊपासमारीची वेळ आली होती. काही तरी करायला हवे म्हणून आम्ही फिल्मची रिळे फिरवायचे काम करायचे. पण… हळू हळू सर्वच ठिकाणी व्हिडीओ एडीटींग सूट तयार होऊ लागले.

दूरदर्शन मधील अनुभव असलेले वरिष्ठ सहाय्यक संचालक श्री देवेंद्र भुजबळ साहेब यांच्या
अहवालानुसार माहिती संचालनालयात १ ऑगस्ट १९९७ रोजी “दृकश्राव्य शाखा” स्थापन करण्यात आली. त्यावेळी संचालक सुधाकर तोरणे साहेब, महासंचालक कॅप्टन अशोक देशपांडे साहेब, तर सचिव अजित वर्टी साहेब होते. अल्पावधीतच मंत्रालयातील फोटोग्राफी सेक्शनच्या वर व्हिडीओ एडीटींगची यंत्रणा बसविण्यात आली. तसेच छोटेखानी स्टुडिओ उभारला गेला. त्यानंतर माहिती संचालनालय नवनवीन कॕमेरे, संकलन यंत्रणेसह सुसज्ज होत गेले. लो बँड युमॕटिक एडीटींग सूट तयार करण्यात आला. व्हिडीओ एडिटर म्हणून हेमंतकुमार भोसले यांची नेमणूक झाली. पुढे येथेच “शिवशाही आपल्या दारी”, “मायमराठी ” या दूरदर्शन कार्यक्रमांचे, अनेक माहितीपटांचे संकलन झाले.

या काळात सहा. संचालक (चित्रपट) सन्मा. व्यंकटेश भोंडे साहेब होते. त्यांच्या कारकिर्दीत “असिस्टंट फिल्म एडीटर” म्हणून मला बढती मिळाली.

ताडदेवचे दालन मी आणि असिस्टंट म्हणून मेघःशाम मांजरेकर सांभाळत असू तर मंत्रालयात भोसले. त्यांना असिस्टंट म्हणून प्रदीप माटे होते.

मे १९९९ साली तत्कालीन महासंचालक सन्मा. डॉ संजय चहांदे साहेब यांनी ताडदेव ला भेट दिली होती. अगदी जुन्यात जुने चित्रीकरण व्हिडिओवर काय दाखवू शकता..? असा प्रश्न केला. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्याचा, स्व. पं. जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याच्या नकाशाचे अनावरण केल्याचा “महाराष्ट्र संस्थापना महोत्सव” हा रंगीत माहितीपट मी त्यांना दाखवला . १९६० चा रंगीत माहितीपट पाहून ते भाराऊन गेले. “त्या काळातही रंगीत माहितीपट तयार केला. म्हणजे तेव्हा आपला चित्रपट विभाग किती अॕडव्हान्स होता नाही…?”
“पण हे सर्व आपण कुठे शिकलात..? ” साहेबांनी प्रश्न केला.
“सर, हे सर्व या विभागात पाहून सरावानेच शिकलोय..” मी.
आश्चर्याने ते म्हणाले “काय म्हणता..?”
“ईतकं सोपं नाही हे माध्यम..”
“होय सर..” मी.
“तुम्हाला एफ्. टी. आय. आय. ला ट्रेनिंगला पाठवले तर जायची तयारी आहे..?”
“हो सर.. केव्हाही आदेश करावेत..” मी.

चहांदे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे काही काळातच एफ्. टी. आय. आय. च्या ट्रेनिंगचे आदेश निघाले. पण… या यादीत माझेच नाव नव्हते ! हे का.. काय.. कसे झाले ? हे मला माहित नाही. पण १७.०९.१९९९ रोजी ही मंडळी ट्रेनिंगसाठी जाण्याच्या एक दिवस आधी मला फोनवरुन कळविण्यात आले की, व्हिडीओ एडीटींगच्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला पुण्याला जायचे आहे. आणि अशा प्रकारे मी तिथे गेलो, तेव्हा एफ्. टी. आय. आय.चे संचालक सन्मा. मोहन आगाशे साहेब होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं ट्रेनिंग पूर्ण झाले.

२००२ साली तातडीची गरज म्हणून फिल्म सेंटर येथिल संपूर्ण एडीटींग विभाग मंत्रालयात हलवावा असा विचार झाला. तेव्हा तत्कालीन महासंचालक सन्मा. भूषण गगराणी साहेबांशी फिल्म लायब्ररी बाबत चर्चा केली. लायब्ररीचे “फोर के” मधे डिजीटायझेशन केलेले चांगले होईल असे त्यांनी प्रस्तावित केले. त्या प्रमाणे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला २०१३ ला मान्यता मिळाली.

चित्रपट विभागातील सर्व व्हिडीओ एडीटींग यंत्रणा मंत्रालयातील “दृक श्राव्य” शाखेत हलविण्यात आली.
“दृकश्राव्य” शाखेत हेमंतकुमार भोसले हे व्हिडीओ एडीटर म्हणूनच कार्यरत होते. त्यांच्या बाजूच्या दालनात आमची प्रतिस्थापना झाली.

आता इथे एक व्हिडीओ एडीटर = दोन फिल्म एडीटर (पालेकर आणि मी) अशी वर्णी होती. व्हिडीओ माध्यम जोशात असल्याने फिल्मवाले आम्ही सो सो च होतो. देवेंद्र भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेल्या या “दृकश्राव्य” शाखेत आम्ही आलो तेव्हा उपसंपादक म्हणून श्री आत्माराम साहेब पण होते.

२००५ साली गगराणी साहेब यांनी चित्रपट विभागाचे “वृत्तचित्र विभाग” असे नामकरण केले. शाखा अधिकारी म्हणून श्री ज्ञानोबा ईगवे साहेब आले. शाखेचे आधुनिकीकरण करतांना ११ लाखाची “फायनल कट प्रो” (एफ् सी पी) ही यंत्रणा खरेदी केली. आणि मग सर्वच काम झटपट या यंत्रणेवर होत गेले.

संचालक मा. प्रल्हाद जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली १३ डॉक्युमेंटरीज आणि ३५ जाहिरातींचे एडीटींग मला करता आले. २००४ ला “बेबी” या २६ सेकंदाच्या
“राष्ट्रीय एकात्मता” या विषयावरील जाहिरातीसाठी रापाचा “बेस्ट स्क्रिप्ट” हा पुरस्कार मिळाला.

२००५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे हस्ते उपमुख्यमंत्री स्व. आर्. आर्. पाटील आणि महासंचालक भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन माझा सत्कार करण्यात आला.

२००९ पासून महासंचालक मा. मनीषा पाटणकर-म्हैसकर मॕडमनी आकाशवाणीसाठी “दिलखुलास” आणि दुरदर्शन साठी “जय महाराष्ट्र” हे कार्यक्रम सुरु केले. या कार्यक्रमांच्या एडीटींगची जबाबदारी वाढली होती. हेमंतकुमार भोसले , प्रदीप माटे आणि मी असे तिघांनी मिळून एडीटींगची जबाबदारी सांभाळली. संचालक प्रल्हाद जाधव साहेब आणि देवेंद्र भुजबळ साहेबांच्या मार्दर्शनाखाली सर्वश्री ज्ञानोबा ईगवे साहेब, संजय देशमुख साहेब, अनिरुद्ध अष्टपुत्रे साहेब, मिलिंद बांदिवडेकर साहेब, मिलिंद दुसाने साहेब, मीनल जोगळेकर मॕडम, बर्षा आंधळे मॕडम, मुकुंद चिलवंत साहेब, अर्चना शंभरकर मॕडम, मीरा ढास मॕडम, अतुल पांडे साहेब, संध्या गारवारे मॕडम असे अनेक अधिकारी या कार्यक्रमांचा दर्जा कसा वाढविता येईल यासाठी प्रयत्नशील होते.आजही या कार्यक्रमांचे प्रक्षेपण नियमित होत आहे. आज ही सर्व मंडळी कुणी मंत्रीमहोदयांच्या कार्यालयात तर कुणी जिल्हा कार्यालयात ऊच्च पदस्थ आहेत.

२०१३ ला डिजिटाझेशनचे काम तीन टप्यात पूर्ण करण्याचे ठरले. सदर काम प्रथम फेमस स्टुडिओ, महालक्ष्मी येथे सुरु झाले. फिल्मचे रिळ तपासण्याचे काम प्रदीप माटे आणि मी करीत असे. डिजीटायझेशन प्रतवारी तपासण्याची जबाबदारी संचालक मा. प्रल्हाद जाधव साहेब यांच्या आदेशाने मा. अनिरुद्ध अष्टपुत्रे साहेब, मीनल जोगळेकर मॕडम, वर्षा आंधळे मॕडम यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यावर सोपविण्यात आली. बाकी मॕनेजमेंट गफुर संग्रार पाहत असत. त्यासाठी दोन वर्षे मला पूर्णतः फेमस स्टुडीओ, महालक्ष्मी येथे जावे लागले. इथे डिजीटायझेशनची प्रतवारी तपासण्याचे “स्क्रॕच मशिन” वापरायला शिकलो.

याच वेळी माझा मुलगा निषाद चेन्नईला ईन्फोसीस कंपनीत इंजीनीअर म्हणून नोकरीस लागला होता. त्याचे चेन्नईला डिहायड्रेशनने आकस्मिक निधन झाले. माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी हा मोठा आघात होता. या काळात मला संचालकांसह सर्वच सहकाऱ्यांनी खूप आधार दिला. मी रजेवर असताना सहा. संचालक मा. मिलिंद बांदिवडेकर साहेब आणि मिलिंद दुसाने साहेब माझ्या घरी आले. एक दिवस मुक्काम केला. अगदीच घरी कुढत बसण्यापेक्षा मानसिक आधार देऊन माझी समजूत काढून मला कार्यालयात घेऊन आले. या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे ऋण आजन्म माझ्यावर असणार आहेत.

डिजिटायझेशनचा नंतरचा टप्पा हा शेमारु, अंधेरी येथे पूर्ण करण्यात आला. हे काम शेमारुमधे वर्षभर चालले. तयार झालेली डिवीसी प्रो कॕसेटस तपासायची जबाबदारी हेमंतकुमार भोसलेंवर तर डिव्हीडी तपासण्याची जबाबदारी सुर्यकांत कासार यांना दिली होती. २०१५ पर्यंत या कामाची पूर्तता करण्यात आली.

फिल्म लायब्ररी मधे १९४८ पासून म्हणजे “गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे” हे द्विभाषिक राज्य असल्या पासूनचा चित्रपटाचा खजिना या विभागात आजही सुस्थितीत जपला जात आहे.

आज नकारात्मक आणि पेड न्युजच्या खाजगी वाहिन्यांच्या प्रवाहात सकारात्मक असलेल्या “वृत्तचित्र विभागा” ची अत्यंत गरज आहे. या विभागाकडे स्वतःचा अद्ययावत स्टुडीओ आहे, सुसज्ज एडीटींग विभाग आहे. तुटपुंजे मनुष्य बळ घेऊन दिमाखदार थाटात वाटचाल केलेला “चित्रपट विभाग” हा नव्याने “वृत्तचित्र विभाग” अशी यशस्वी वाटचाल करण्यासाठी धडपड करताना दिसतोय.
या सर्व वाटचालीचा मी साक्षीदार होतो, त्यात माझा प्रत्यक्ष सहभाग होता याचा मला सार्थ अभिमान आहे.

विकास पाटील

– लेखन : विकास पाटील
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. आपल्या कामाशी प्रामाणिक, मेहनती वृत्ती व सकारात्मक उर्जा या त्रयीच्या आधारे माहिती व जनसंपर्क विभागात संकलकाचे काम करत आपण प्राप्त संधीचे सोने केले.
    आज मागे वळून पाहताना हे अनुभव कथन मनाला प्रेरणादायक वाटेल यात शंकाच नाही.पुढील वाटचालीस सदिच्छा💐

  2. व्वा विकास! चित्रपट ते वृत्तचित्र शाखेचा एक पटच उभा केला. मोठमोठ्या आसामींचा सहवास, आशीर्वाद आपल्याला लाभला. खरोखर असे भाग्य लाभायला पूर्वपुण्याईच लागते. त्या काळातील किस्से आठवणी आपण अतिशय मनोवेधक पध्दतीने मांडल्या आहेत. आपल्या लेखणात एक शैली आहे. आपल्या आयुष्यात आलेला आघाताचा प्रसंग हृदयाला चटका देऊन गेला. आपले महासंंचालनालय म्हणजे खरोखर अशा प्रसंगात आधार देणारे महाकुटूंब आहे हे मी देखील 2018 मध्ये जे जे मध्ये दाखल करावे लागले तेव्हा अनुभवले आहे.
    माहिती व जनसंपर्क महासंंचालनालयातील असेच अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या आठवणी शेअर केल्या तर तो एक फार महत्वाचा दस्तऐवज तयार होईल. या आठवणी पुसून जाण्याआधी शब्दात लिहून ठेवल्या पाहिजेत. पुनश्च विकास हार्दिक अभिनंदन, असेच नित्य नूतन लिहित रहा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”
सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37