Tuesday, September 16, 2025

आई

मातृदिनाच्या निमित्ताने आईची थोरवी गाणाऱ्या काही ममतापुर्ण कविता ...

१. मातृदिन

कळीत मिटलेलं फूल ,
गर्भात जपलेलं मूल ,
अनुभवण्यास भाग्य लाभले ‘आईस’ ॥

पाण्यात दिसते प्रतिबिंब ,
आरसा दाखवतो रुबाब ,
मोठे वाटत नाही ‘आईस ‘ ॥

आयुष्य आईच्या कर्जात ,
जन्म आईच्या ऋणात ,
व्याज लावत नसते ‘आई ‘ ॥

घरे तुटून बिखरतात ,
आठवणी हृदयी राहतात ,
जीवनी पान असते ‘आई ‘ ॥

व्यापता न येणारे अस्तित्व ,
मापता न येणारे मातृत्व ,
उदंड प्रेम देते ‘आई ‘ ॥

अपेक्षा विना वाढवते ,
मुलांच्या सुखात सुखावते ,
अखंडीत श्वास म्हणजे ‘आई ‘ ॥

तुझ्या विना जगले आई ,
रोगांवर उपाय दवाई ,
जगी एकच औषध ‘आई ‘ ॥

आईला शुभेच्छा काय देणार !
तिच्याच शुभेच्छांवर घडणार ,
घडवली मूर्ती देवरुपी ‘आई ‘ ॥
– रचना : सौ. वर्षा महेंद्र भाबल.

२. 🙏मातृ देवो भव 🙏

घरोघरी राहतो
देवबाप्पा आईच्या रुपात
समईतली ज्योत बनून
जळत असते आई दिन रात

चंदनाचं खोड ते
झिजत असतं सुगंध देत असतं
निःस्वार्थपणे आपलं समजून
तन्मयतेने सर्वांसाठी राबत असतं

देवाचं आवडतं निवासस्थान
असतं आईचं ह्रुदय
म्हणूनच तिच्या सहवासात
नसतं बाळाला कुठलच भय

रडून आकांत करणारं बाळ
आईला बघताच हसू लागतं
जादूची कांडी फिरावी
तसं ते शांत होऊन जातं

राम कृष्णही आले
तिच्याच पोटी जन्माला
त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगून
तिनेच घडविले शूर शिवबाला

सानेगुरुजी विनोबा भावे
त्याच माऊलीची लेकरं
संध्याकाळ होताच वाट बघतात तिची
घरट्यातली पाखरं,गोठ्यातली वासरं

ती माऊली बिचारी जपत असते
जिवापाड आपल्या लेकरांना
कुणाला काय हवं नको तीच बघते
जीव लावते घरातल्या आबालवृद्धांना

राब राब राबत, कोंड्याचा मांडा करत
घरपण देते घराला
तिच्याच सानिध्यात शिकतं बाळ
बोलायला वाचायला लिहायला

ती माऊलीच असते
बाळाचा पहिला गुरू
तीच असते चिंतामणी
कामधेनू कल्पतरू

शिकवते संस्कारीत करते
दाखवते मार्ग ज्ञानाचा खरा
अंतरी त्या हिरकणीच्या वाहत असतो
अखंड वात्सल्याचा झरा

धावत असतं मायेचं आभाळ
लेकरांच्या भल्यासाठी सदासर्वकाळ
एक दिवस हिरावून नेतो आपल्यातून
त्या माऊलीला क्रूर काळ

तिच्या आठवणींनी मग
वाहू लागतात अश्रू घळघळा
विनवितो मी प्रत्येकाला
ती जिवंत असेतो जीव लावा रे तिला

सर्व माता भगिनींना मातृदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा 🙏🌹
– रचना : राजेंद्र वाणी. दहिसर. मुंबई

३. माझी माय !

अंगणी सुगंध ! मंजिरी सुवास
पवित्र तुळस ! माझी माय !

मंद सुशितल ! झरा खळखळ
मायेचा निर्मळ ! माझी माय !

दूर करी तमा ! अखंड तेवत
समईची वात ! माझी माय !

अतूट जिव्हाळा ! सागर लहरी
खोल गहीवरी ! माझी माय !

कवेतं माईना ! त्या आभाळभर !
प्रेम निरंतर ! माझी माय !

उत्तुंग पर्वत! नग हिमालय!
शितल अक्षय ! माझी माय !

देवी सुस्वरूप ! मंदिरी मंगल!
तूच सुमंगल ! माझी माय !
– रचना : नेहा हजारे. ठाणे.

४. आई

आई शब्द अर्थ गहन
सांगे कुणी समजावून
नाही व्याख्या विधाता
आई जगतास व्यापून

आई ती होते बाळाची
घेऊनी उदरी न‌ऊमास
घडविता पुण्याई संपेल
ठेऊन मुखातील घास

असते जेव्हा ती समीप
काळजी नसे जगताची
जाता डोळ्याआड होत
किंमत कळलेली तिची

आई ती होते प्रसवताना
लेकरू कुणी होत बाळ
मायेच्या कोकरा समवेत
तिने बांधलेली घट्ट नाळ

देव देतो असे एक ते रुप
ज्यास आई म्हणोनी हाके
ईश्वरास अधिक असे प्रिय
जाता ती एकटे मागे टाके

कधी पदरास करे हिंदोळा
उपाशी पोट गाई गीत गळा
मांडी नी हात बने झोपाळा
सर्वांना ती प्रीय लावे लळा

लेकरास घडवित असताना
ठाऊक नसतेच ते रात्र दिन
अंगाईतून फुटून ते उठतात
राजसा, छकुला अक्षरे तीन
– रचना : सौ माधवी प्रसाद ढवळे राजापूर

५. उक्ती तैशी कृती

माय लेकराच नातं
जणूं दुधांत साखर
ममतेच्या पदराने
घाली मायेची पाखर

आई माझी धैर्यशील
पार संकटं करून
केले ताठ मानेनंच
विश्व उभे शून्यातून

उक्ती तैशी कृती असे
नित्य तिचे आचरण
लेकी-सुनेसाठी सदा
मनीं भावना समान

दिले संस्काराचे धन
पहा माणसांत देव
तिची हीच शिकवण
जन्मभरासाठी ठेव

हात पुढे मदतीचा
गरजुंना यथाशक्ती
दिला घासातला घास
किती वर्णावी महती

तिच्या ठायी कृतज्ञता
माझ्या अंतरात भाव
जन्मोजन्मीं हीच असो
आई माझी देवा ! पाव
– रचना : भारती महाजन- रायबागकर. चेन्नई.

६. देत नही साद

माय माय करू मायनी ते येस याद
कितल्याबी हाका मारा देत नही साद
देत नही साद …

रागे भरनी का माय बोलत का बरं नही
कष्ट करी करी तुनी भरी गई वही
धाकली मी व्हतू माय व्हता तुना नाद
कितल्या बी हाका मारा देत नही साद…

मुर्ती तुनी दिससं ना दयता कांडता
पावनासनां व्हता सदा घरम्हा राबतां
आला गेला तृप्त व्हये म्हने नही ब्यॅद
कितल्या बी हाका मारा देत नही साद…

कष्ट करी करी तुना जीव थकी गया
बेचाळीसन्या चयवयन्या लागन्यात तुले झया
देशभर फिरनी तू..कष्टनी .. नही वाद …
कितल्या बी हाका मारा देत नही साद …

एक डाव इसी का व दिससी का माले
डोयाभरी देखी लिसू पुन्हा पुन्हा तुले
सपनं मा इसी का तू साध ना संवाद ..
कितल्या बी हाका मारा देत नही साद ….

याद येतसं का तुले लेकरे तुना माय
काला मोडी दे ये माले टाके दूध साय
कितली मी याद करू दे ना माले दाद
कितल्या बी हाका मारा…देत नही साद…

मुर्ती तुनी शेवटनी दिससं ना माले
इतली का आवडी तू गयी देवबा ले
इचारं भी नही माले …
इच्चारं.. भी ..नही …
का बरं सोडी … सा…ऽऽऽऽ.थ ….
कितल्या बी हाका मारा….
देत .. नही .. साद…
देत.. नही .. साद….॥
– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments