मोठ्या आणि किचकट शस्त्रक्रिया केवळ मोठ्याच रुग्णालयात पार पडतात, असे नव्हे तर निष्णात डॉक्टर- सर्जन असल्यास त्या छोट्या रुग्णालयातही यशस्वीपणे केल्या जाऊ शकतात, याची प्रचिती नुकतीच नवी मुंबईतील महावीर रुग्णालयात आली. सर्व सामान्य माणसाला अतिशय दिलासा देणारी ही बाब आहे.
डॉ. सचिन लोखंडे व त्यांच्या सहकारी डॉक्टरांच्या टीमने, एका ७२ वर्षीय महिलेवर अवघड शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून पावणेचार किलो वजनाचा, मोठ्या टरबुजाच्या आकाराचा गोळा बाहेर काढला. ही शस्त्रक्रिया कोणत्याही मोठ्या रुग्णालयात केली असती तर किमान २ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च आला असता.
गेल्या ३२ वर्षांपासून नवी मुंबईत राहणारी ७२ वर्षीय वृद्ध महिला पोटात दुखते म्हणून महावीर रुग्णालयात आली. सदर महिलेचा मुलगा उच्च शिक्षित आणि त्यास वैद्यकीय ज्ञानाची पुरेपूर जाण असल्यामुळेच त्याने मुंबईतील मोठी रुग्णालये सोडून आपल्या आईला आमच्या महावीर रुग्णालयात आणले.
आम्ही सर्व तपासण्या केल्या. सोनोग्राफीही करण्यात आली. त्यात महिलेच्या पोटात मोठा गोळा असल्याचे निदान झाले. सदरची गाठ कॅन्सरची आहे का ? याचीही तपासणी केली. असल्यास ती आतड्यांमध्ये पसरू शकते का ? याबाबतची आम्ही खातरजमा केली. परंतु ती गाठ कॅन्सरची नव्हती.
गावाकडील महिला आजही लुगडी नेसतात. ही वयोवृद्ध महिला लुगड्याचाच वापर करते. कंबरेच्यावर आणि लुगड्याच्या काष्ट्याखाली ही गाठ असल्यामुळे ती नजरेस आली नाही. परंतु अधिकचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात भरती होण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे आम्ही सदर वृद्ध महिलेस भरती करून घेतल्याचे डॉक्टर लोखंडे यांनी सांगितले.
वृद्ध महिलांवर अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया करणे धोक्याचे असते. पण रुग्णाच्या मुलाने शस्त्रक्रिया करण्याचा धोका पत्करून परवानगी दिली आणि आम्ही डाॅक्टरांनीही तो धोका पत्करला.

अत्यंत कठीण अशा शस्त्रक्रियेचे आमच्यासमोर आव्हान होते. सुरवातीला भूलतज्ञांकडून रुग्णास भूल देण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. यासाठी शरीरातील काही ग्रंथी आधी काढाव्या लागल्या. जवळपास अडीच- तीन तास चाललेली शस्त्रक्रिया अखेरिस यशस्वी झाली.
महिलेच्या पोटातून ३५ बाय ४० म्हणजचे पावणेचार किलो वजनाचा , मोठ्या टरबुजाच्या आकाराचा गोळा काढला. दोन दिवस रुग्णालयात ठेवल्यानंतर सदर महिला तिसऱ्याच दिवशी स्वतः चालत घरी पोहचली.
याबाबतीत बोलताना डॉ. सचिन लोखंडे म्हणाले की, अशा गाठी कुणालाही होऊ शकतात. असे होऊ नये यासाठी प्रत्येक महिलेने वयाच्या चाळिशीनंतर मॅमोग्रंथी, सोनोग्राफी, गर्भाशयातील पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर याबाबतची तपासणी दरवर्षी करुन घेतली पाहिजे.
नवी मुंबईतील आमच्या रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया होऊ शकतात, यासाठी मोठ्याच रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही. हिच शस्त्रक्रिया मुंबईतील मोठ्या रुग्णालयात केली असती तर रुग्णास किमान दोन- अडीच लाख रुपये निश्चितपणे लागले असते. परंतु आम्ही केवळ ६० हजारांत ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली, याचे आम्हाला अतीव समाधान आहे, असे डॉ. लोखंडे यांनी सांगितले.

अल्प परिचय
डॉ सचिन लोखंडे यांनी १९९७ ते २००१ दरम्यान मिरज येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर पुण्यात डीजीओ केले. तर तामिळनाडूतील प्रख्यात खिश्र्वन मेडिकल कॉलेजमधून प्रगत तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यानंतर केरळच्या व दिल्लीच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अनुभव घेऊन सर्व सामान्यांना परवडेल असे स्वतःचे
हॉस्पिटल सुरू केले.
– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
निष्णात डाॅक्टर सचिन लोखंडे आणि त्यांच्या सहका-यांनी एका लहान हाॅस्पीटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याचे वृत्तांकन लेखकाने केले .त्याबद्दल लेखक आणि डाॅक्टरांचे अभिनंदन.