सत्याचे प्रतिबिंब नसेल तर त्या सृजनात अर्थ नाही, जे विचारांची पेरणी करतं ते खरं कसदार साहित्य, असं प्रतिपादन सरस्वती सन्मान आणि साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित ज्येष्ठ कानडी लेखक डॉ एस एल भैरप्पा यांनी नुकतेच ठाण्यात बोलताना केलं. सर्व भारतीय भाषांत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय साहित्य परिषद या संघटनेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
“गप्पा भैरप्पांशी” या अनोख्या प्रगट मुलाखतीचं आयोजन अभासापनं समन्वय प्रतिष्ठान या संस्थेच्या सहकार्यानं केलं होतं. या कार्यक्रमात भैरप्पांचं मौलिक साहित्य मराठीत आणणार्या ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी भैरप्पांची मुलाखत घेतली.
विचारधारा समोर ठेऊन त्यानुकूल लिखाण करण्यापेक्षा आपल्या लिखाणातून विचारधारा निर्माण करा असं आवाहन भैरप्पा यांनी यावेळी युवा लेखकांना केलं. “विचार देतं ते साहित्य” असं सांगतानाच ज्यातून नव्या आदर्शांची निर्मिती होईल असं साहित्य निर्माण व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
370 कलम रद्द करणं, लक्ष्यवेधी कारवाया, अशा अनेक सकारात्मक गोष्टी घडताहेत पण त्यातूनही नकारात्मकता शोधणारी छिद्रान्वेशी वृत्ती बोकाळत चालली आहे. या नकारात्मक प्रवृत्तीच्या माणसांनी जनमानसात विष कालवण्याचा प्रयत्न चालवला आहे, त्याना अद्दल घडवायला हवी असं स्पष्ट मत भैरप्पा यांनी यावेळी व्यक्त केलं.
आज साहित्याच्या क्षेत्राला जातीयतेची कीड लागली आहे त्यातून त्याला बाहेर काढायला हवं, सर्व समावेशक विकास हाच जातीय दरी मिटवण्याचा मार्ग आहे मात्र साहित्य क्षेत्रात शिरलेली ही जातीयतेची कीड सामाजिक दुरी वाढवते आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
रामायण आणि महाभारतातील मिथकं दूर सारत आपण आपल्या कादंबर्यांतून या पौराणिक कथांचं नातं वर्तमानाशी जोडलं असं सांगताना भैरप्पा म्हणाले की, जुगारात राज्य गमावणार्या धर्मराजापेक्षा या देशात ज्याचा जन्म झाला त्याच्याच कडेच महत्वाचं पद सोपवावं असं सांगणार्या रामाचे वचन आजही लक्षात ठेवण्याची गरज आहे.
अखिल भारतीय साहित्य परिषद “सहित ते साहित्य” हाच विचार उराशी धरून काम करते आहे, त्यासाठी युवा पिढीला सोबत घेत सकारात्मक विचारांची चळवळ उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, या प्रयत्नांना साथ द्या असं आवाहन अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ख्यातनाम कवी आणि गीतकार प्रवीण दवणे यांनी यावेळी व्यक्त केलं.
या कार्यक्रमात ऊमा कुलकर्णी लिखित संवादू अनुवादू या आत्मचरित्राच्या विरुपाक्ष कुलकर्णी यांनी केलेल्या कानडी अनुवादाचं प्रकाशन करण्यात आलं. मूळ मराठीत असलेल्या या आत्मचरित्राला कानडी साहित्यातही महत्वाचं स्थान आहे असं कानडी साहित्याच्या अभ्यासक उमा रामाराव यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सई गांगण यांनी सुरेल आवाजात सादर केलेल्या सरस्वती वंदनाने वातावरण भारावून गेले. मकरंद जोशी यांनी नेमकेपणाने सूत्रसंचालन
आणि आभार प्रदर्शन केले.
अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री ऋषीकुमार, प्रदेश कार्याध्यक्ष नरेंद्र पाठक, उपाध्यक्ष नीतीन केळकर, महामंत्री बळीराम गायकवाड, संघटनमंत्री सुनील वारे, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत भोंजाळ, ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार, निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ, तसंच साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
अभासापने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डाॅ.भैरप्पा यांचे साहित्यविषयक विचार खरंच उद्बोधक वाटतात.