माझे अष्टपैलू मित्र, चित्रकार, लेखक, कला समीक्षक, भक्ती मार्गावरील यात्रेकरू, जे जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्राध्यापक असलेले श्री गजानन शेपाळ यांनी लिहिलेले….
“श्री दत्तमार्ग : संत विभुतींचे कार्यसंकेत” हे पुस्तक मला भेट दिले. आपल्या संग्रही ठेवावे, वाचलेच पाहिजे अशा या पुस्तकाविषयी हे काही थोडंसं…..
अध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनांत मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक आहे.
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभ मुहूर्तावर चेंबूर येथील श्री स्वामी समर्थ मठात, त्या मठाचे एक प्रमुख विश्वस्त आणि श्री स्वामी समर्थांचे शिष्योत्तम श्री स्वामीसूत यांचे वंशज श्री विजयदादा नलावडे यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन झाले.
श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, नृसिंहभान, श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, श्री साईबाबा, अशा संत-सत्पुरुषांचं पृथ्वीवर अवतरणं, त्यांच्या कार्यांचे संकेत, त्यांच्या कडून दुःखी,पिडीत आणि दुर्व्यसनी समाज कंटकांना मुलभूत गरजांसह सभ्य समाजात जीवन जगण्यासाठी सूस्थितीत आणून सोडण्यापर्यंतचं कार्य करणं हे सारं श्री गुरुदत्त मार्गाशी संबंधित आहे. या बद्दलचा उहापोह या पुस्तकात केलेला आहे. शिवाय धार्मिक-अध्यात्मिक मार्गात चाचपडणार्या अनेकांना या पुस्तकाच्या वाचनाने यथायोग्य मार्गदर्शन मिळेल अशी खात्री देणारे हे पुस्तक आहे.
या पुस्तकाचे संकलन, संपादन, बांधणी, सजावट आणि मुखपृष्ठ स्वतः शेपाळ यांनी केलेले आहे. लहानपणापासून घरातील धार्मिक आणि अध्यात्मिक वातावरणाचे संस्कार झाले असल्याने ध्यानातूनच त्यांना श्री स्वामी समर्थ यांचे झालेले दर्शन त्यांनी त्यांच्या लहानपणी म्हणजे ते इयत्ता पाचवी-सहावीत शिकत असतांना चितारले आहे, जे चित्र या पुस्तकाचे मुखपृष्ठ म्हणून पहायला मिळते आहे.
शेपाळ यांनी हाती घेतलेल्या चित्रसंग्रहालय निर्मितीचे, एस्.व्ही.एस्.(सिताराम विश्वास शेपाळ)कला प्रतिष्ठान हे या पुस्तकाचे प्रकाशक आहे. ह्या पुस्तकात संकलित केलेली माहिती ही सुमारे साठ-पासष्ट वर्षांपूर्वीची असून ब्रह्मीभूत अंबेकर (श्री स्वामी समर्थ उपासक) यांनी शेपाळ यांच्या कडे सुपूर्द केली होती.
प्रासादिक शब्दांत व्यक्त झालेल्या समर्थ वाणीतील हे पुस्तक म्हणजे गद्यातील ग्रंथच म्हणावा, असेच आहे.
२३८ पानांच्या या ग्रंथात आठ पाने रंगीत असून अत्यंत प्रभावी आणि दुर्मिळ फोटो असलेल्या सत्पुरुषांचे दर्शन वाचनाच्या वेळी होते. मुखपृष्ठाच्या आणि मलपृष्ठाच्या आतील पानांवर श्री स्वामी समर्थांची विविध रुपे चितारलेली पहायला मिळतात. तसेच प्रत्येक पानाच्या खाली श्री स्वामी समर्थांचा संदेश एका वाक्यात देण्यात आलेला आहे. वाचतांना कंटाळा येणार नाही याची काळजी काळजी घेत वाचकांना सूलभपणे वाचता येईल अशा आकाराची अक्षरे असल्याने हे पुस्तक नक्कीच संग्राह्य ठरेल यात काही शंकाच नाही .
श्री शेपाळ यांच्या आगामी उपक्रमांना मन:पूर्वक शुभेच्छा.
– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

श्री. शेवाळ यांच्या ऊपक्रमांना मन:पूर्वक शुभेच्छा!