सध्या आपण अशा जगात वावरत आहोत जिथे अनेक प्रकारची माहिती सतत आपल्याकडे येत असते. अनेकवेळा ही माहिती खोटी किंवा चुकीची असते. ऑनलाइन माध्यमांचा फायदा असला तरी या माध्यमांमुळे काही नवीन आव्हाने उभी राहिली असून, या माध्यमाचा विवेकपूर्ण वापर करण्याची गरज आहे, असे विचार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
या विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात आयोजित ‘फंडामेंटल्स ऑफ डिजिटल जर्नालिझम‘ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. डॉ.किरण ठाकूर, डॉ. मकरंद पंडित आणि डॉ. योगेश जोशी यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून विश्वकर्मा पब्लिकेशनने ते प्रकाशित केले आहे.
डॉ. करमळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, “नागरिकांचे भविष्य घडविण्यासाठी विद्यापीठे महत्वाची भूमिका बजावतात. परंतु हे मान्य केले पाहिजे की इतर संस्थादेखील त्यांच्या संबंधित क्षेत्रात खूप चांगले काम करत आहेत. ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी विद्यापीठे अशा संस्थांशी सहकार्य करू शकतात. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आम्ही विद्यापीठात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत १३० सामंजस्य करार केले आहेत.”
डाॅ.किरण ठाकूर यांनी या पुस्तकामागील कल्पना स्पष्ट करताना सांगितले की, हे पुस्तक माध्यम संस्थांचे विद्यार्थी आणि कार्यरत पत्रकारांनाही उपयोगी पडेल अशा पद्धतीने लिहिले आहे. हे पुस्तक केवळ बातम्या गोळा करणे, लिहिणे एवढ्यापुरते मर्यादित ठेवलेले नाही तर ते पत्रकारितेचे विद्यार्थी, तरुण शिक्षक आणि प्रसारमाध्यमांचा वापर करणाऱ्या सर्वांना उपयुक्त ठरेल.
डॉ मकरंद पंडित यांनी पत्रकारिता आणि माहिती तंत्रज्ञान यांचे परस्पर संबंध आणि त्यातून बदलत गेलेले पत्रकारितेचे स्वरूप विशद केले.
डॉ. योगेश जोशी म्हणाले की, हे पुस्तक माध्यमांचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांचा सेतू बांधणारे आहे. इंटिग्रेटेड न्यूजरूम, पॉवर ऑफ डिजिटल मीडिया, न्यूज वेबसाइट्स, डेटा जर्नलिझम, डिजिटल स्टोरीटेलिंग, डेटा सायन्स, पॉडकास्ट आणि ट्विटर यासारख्या नवीन युगाशी संबंधित विषयांवर हे पुस्तक आहे. अनेक समकालीन उदाहरणांसह, पुस्तक पत्रकारिता, सोशल मीडिया आणि तांत्रिक लेखनात रस असलेल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे.
संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, प्राध्यापक डॉ. संजय तांबट यांचीही यावेळी समयोचीत भाषणे झाली.
पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करणारे डॉ. नचिकेत ठाकूर यांना यावेळी गौरविण्यात आले. सहाय्यक प्राध्यापक योगेश बोराटे यांनी आभार मानले. डाॅ. सोनल जुवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास प्रसार माध्यमातील विविध मान्यवर, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
छान वृत्तांकन