Sunday, July 6, 2025
Homeपर्यटनचला, आसाम मेघालयाला ( ३ )

चला, आसाम मेघालयाला ( ३ )

आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.
आता परत गुवाहाटीकडे. आमच्या प्रवासाची जिथून सुरुवात झाली त्याच ठिकाणी परत जायचे.

गुवाहाटी म्हणजे गोहत्ती. गोहत्तीचे प्राचीन नाव, प्रागज्योतिषपूर असे आहे. आसाम राज्यातील आणि ईशान्य भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे हे शहर. हे आसामच्या मध्य पश्चिम भागात, ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. प्राग्ज्योतिषपूर या नावाने प्रचलित असलेले गुवाहटी, ही ऐतिहासिक कामरूप राज्य तंत्राची राजधानी होती. आता दिसपूर ही आसामची राजधानी आहे. काझीरंगा ते गुवाहाटी हे जवळजवळ १९३ किलोमीटरचे अंतर आहे. गुवाहाटी कडे जाणारा हा रस्ता अतिशय रमणीय होता. वातावरण पावसाळी होते. आकाश ढगाळलेले होते.

चहाचे लांबचलांब मळे दुतर्फा होते. केळी सुपारी होत्याच. बटाट्याचीही शेती दिसली. वाटेत, चहा, नारळाचे पाणी, किरकोळ खरेदी अशी मौजमजा करत प्रवास चालला होता. गाडीत ड्रायव्हरने आसामी गाणी लावली होती. काहीशी भजनी चाल वाटत होती. काही शब्दही कळत होते. थोडीशी बंगाली पद्धतीची शब्दरचना वाटत होती. आवाजही चांगला होता. गाणी ऐकताना मन रमले.

चहा चे मळे

आजचे विशेष आकर्षण होते ते ब्रह्मपुत्रा नदीतील क्रूझ. आणि रोपवे सफारी. मात्र गुवाहाटीला पोहोचल्यावर मुसळधार पावसाने सारीच त्रेधातिरपीट उडवली. रोपवे सफारी रद्द करावी लागली. मात्र आमच्या टूर सहायकाने दुसर्‍या दिवशी जाऊ असे आश्वासन दिले म्हणून बरे वाटले.

ब्रह्मपुत्रेचं दर्शन आत्मानंदी होतं ! आशिया मधली ही एक प्रमुख नदी आहे. तिबेट, चीन, भारत आणि बांगलादेश मधून ही वाहते. बांगलादेशामध्ये तिला “जमुना” या नावाने ओळखले जाते. गंगेच्या त्रिभुज प्रदेशात येऊन ब्रह्मपुत्रा बंगालच्या उपसागरास मिळते. ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून ब्रह्मपुत्रा. काही ठिकाणी तिचा ब्रह्मपुत्र असा पुलिंगीही ऊच्चार करतात.

ब्रम्हपुत्रा नदी

आसाम राज्यातील बहुतेक मोठी शहरे ब्रह्मपुत्रेच्या काठावर वसलेली आहेत. नद्यांना आपण देवता का मानतो ? अनुभूतीतून ते जाणवायला लागतं. संथ वाहणाऱ्या या महाकाय सरितेच दर्शन खरोखरच स्वर्गीय आनंद देणार होतं ! तिच्या पात्राकडे बघता बघता नकळतच हात जुळले. निसर्गातल्या अज्ञात शक्तीला केलेलं ते नमन होतं ! गंगा, गोदावरी, इंद्रायणी जणू सार्‍यांचं एकरुप पहात आहोत असं वाटलं. वात्सल्यरुपी माऊलीसारखीच मला ती भासली. पावसाळ्यात मात्र ती रौद्र रुपात एखाद्या देवीसारखीच भासत असावी.

अल्फ्रेस्को ग्रँड हे आमच्या बोटीचं नांव. तीन मजली बोट होती. यामधून केलेला विहार अतिशय आनंददायी होता. बोटीवरच जलपान झाले आणि सारेच पर्यटक नाचगाण्यात रमून गेले. नदीमध्ये अनेक लहान मोठी बेटे, झाडाझुडपात दडलेली आहेत. तिथे मंदिरेही आहेत. मावळतीच्या वेळचे आकाशातले गुलाबी रंग आणि किरणांचे, संथ पाण्यातले प्रतिबिंब पाहता पाहता माझे मन हरखून गेले. ती नौका सफर अविस्मरणीय होती !! क्षणभर वाटलं या जलौघात सामावून जावं !!

गुवाहाटी हे तसं मोठं गजबजलेले शहर आहे. आसाम मधील मोठे, शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि व्यापारी क्षेत्र आहे. येथे सरकारी कार्यालये, विधानसभा, उच्च न्यायालयाच्या इमारती आहेत. इथल्या नेहरु स्टेडियमवर क्रिकेट व फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय सामने होतात. मात्र इथल्या रस्त्यांचा विकास झालेला वाटला नाही. रस्ते अरुंद आणि वर्दळ प्रचंड. पण ट्रॅफिक रूल्स पाळण्याची शिस्त असल्यामुळे गोंधळ जाणवला नाही.

आमच्या हॉटेलचं नाव मला आवडलं. घर ३६५.
या ! आपलं स्वागत आहे ! वर्षभर घर आपलेच आहे! अशा अर्थाचं हे नाव वाटलं. रूम लहान असली तरी सर्व सुविधा संपन्न होती. रात्रीचे जेवणही छान होते. आता हळूहळू मोहरीच्या तेलातलं आसामी चवीचं जेवण आवडू लागलं होतं. रात्री झोपताना मात्र डोळ्यासमोर येत होती ती विशाल ब्रह्मपुत्रा !

आज स्वच्छ ऊन पडलं होतं. पाऊस नव्हता. पण सकाळचा गारवा जाणवत होता. काल हुकलेली रोप वे सफर आज केली. खाली संथ वाहणारी ब्रह्मपुत्रा आणि डोक्यावर अथांग आकाश. केवळ मनोरम !!

गुवाहाटी पासून दहा किलोमीटर अंतरावर कामाख्या देवीचे मंदिर आहे. हे शक्तीदेवता सतीचे मंदिर आहे. व आसामी लोकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. नीलाचल पर्वत श्रेणीत हे मंदिर स्थित आहे. भारतात देवींची ५१ शक्तीपीठे आहेत. यामध्ये आसाम राज्यातील कामाख्या मंदिर हे मोठे जागृत देवस्थान मानले जाते. महत्त्वाचे म्हणजे जिथे स्त्रियांची योनी किंवा मासिक पाळी या विषयावर बोलणे ही टाळले जाते तिथे या मंदिरात, देवीच्या योनीची आणि मासिक पाळीचा उत्सव साजरा केला जातो. सती देवीने स्वत्याग केल्यानंतर शंकराने क्रोधित होऊन तांडवनृत्य सुरू केले. हे पाहून विष्णूने सतीच्या शरीराचे एकावन्न तुकडे केले. नीलाचल पर्वतावर सतीचा योनीभाग पडला. तिथेच आज हे कामाख्या मंदिर आहे. हे मंदिर पाहताना आणि ही कथा ऐकताना एक जाणवले की, स्त्रीच्या योनीला जीवनाचे प्रवेशद्वार मानले जाते. म्हणूनच सर्व सृष्टीनिर्मीतीचे केंद्रही स्त्रीलाच मानले जाते. एक प्रकारे स्त्रीचं महात्म्य या मंदिरात पूजले जाते.

कामाख्या मंदिर

आमच्या या प्रवासातले आणखी एक आकर्षण म्हणजे इथल्या सिल्क बनवणाऱ्या केंद्राला दिलेली भेट. रेशमाच्या किड्याचा न मारता बनवलेले हे आसामी सिल्क जगप्रसिद्ध आहे. तिथे अजूनही घरोघरी हातमागावर विणणारे विणकर आहेत आणि त्यांची कारागिरी, कलाकुसर ही जगप्रसिद्ध आहे. आसामची मुंगा सिल्क साडी अतिशय प्रसिद्ध आहे विशेषतः ती हाताने विणली जाते. आणि एका साडीस १५ ते ४५ दिवस तयार होण्यास लागू शकतात. या हातमाग केंद्रावरचे विणकर अतिशय तन्मयतेने आपले काम करताना दिसले. खरोखरच बारीक कलाकुसरीचे आणि मेहनतीचे काम आहे. हे त्यांच्या कलेला मी मनोमन सलाम केला !

आजूबाजूला असलेल्या दुकानात मात्र पर्यटकांची खरेदीसाठी छान धावपळ चालू होती. अर्थात हे स्वाभाविकच आहे ना ? बहुतेकांनी साड्या, कुर्ते, स्कार्फ यांची खरेदी केली.

तर मंडळी, आसाममध्ये हा आमचा शेवटचा दिवस होता. आता पुन्हा बॅगा भरायच्या. परतीच्या प्रवासाचे बॅगा भरणे हा एक विलक्षण भावनेचा खेळ असतो . आणलेले सामान विस्कटलेले असते. शॉपिंग चे सामान ठेवायचे. पुन्हा विमानाचा प्रवास म्हणून वजनाचे दडपण असते. या कोंबाकोंबीत अर्थातच घराकडचीही ओढ असतेच आणि आता पुन्हा आपले रुटीन सुरू…… याचा काहीसा खेद भावही असतो.

इंडिगो च्या फ्लाईट नंबर ६४३५ ने आम्ही मुंबईला आलो. आणि समूहातील लोकांची पांगापांग झाली. बाय बाय, नक्की भेटू, पुन्हा एकत्र जाऊ वगैरेंची आश्वासने दिली घेतली.

या परतीच्या प्रवासात होत्या दाटलेल्या आठवणी ! आठवडाभर वेचलेल्या आनंद क्षणांची एक नशा !! एका वेगळ्याच प्रांताच्या, भौगोलिक सांस्कृतिक ऐतिहासिक निसर्गरम्य आठवणी मनात खोलवर साठवून निघालो.

अभिमानाने विचार आला, खरोखरच आपली भारत भूमी महान आहे !! किती वैविध्य आहे आपल्या देशात! तरीही संस्कृतीचा एक धागा या विविधतेला ही कसा जुळवून धरतो !! वेश,भाषा, वर्ण, धर्म यापलीकडे असतो तो फक्त माणूस !! हाडामासाचा आणि भावनेचा एकसंध !!
पर्यटनात ही भावना मनात रुजते. एखादा आसामी माणूस जेव्हां, “नमस्कार !” असे म्हणून आपले स्वागत करतो तेव्हाच तो आपला होऊन जातो.

शिवाय एक जाणवलं, किती संपन्न आहे आपला देश ! या मातीत काय आणि किती उगवतं ! किती उत्पादकता, वैविध्य आहे या भूमीत ! खरोखरच सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम् !! निसर्गदेवता अनेक अंगांनी अलंकार घालून, नटून-थटून आपल्यासमोर उभी आहे ! या निसर्गाची आपण खरोखरच मनापासून जपणूक केली पाहिजे, या विचाराला बळकटी येते.

तसेच काहीसे मागासलेपण, गरिबी पाहूनही मन कळवळतं. पर्यटनाचा विकास होत आहे परंतु तो अधिक वेगाने झाला पाहिजे व जगात भारत देशाची प्रतिमा उजळली पाहिजे असं प्रकर्षाने वाटत रहातं. अमेरिकेत एखाद्या नैसर्गिक धारेचाही कॅस्केड म्हणून गाजावाजा करून देशोदेशीच्या पर्यटकांना तिथे अत्यंत सुविधापूर्ण रितीने आकर्षित करुन घेतले जाते. एक धार ते नायगारा साठी तितकेच पर्यटक गर्दी करतात. आणि आपल्याकडे डोंगराडोंगरातून वाहणारं हे सौंदर्य टिपण्यासाठी काही मूठभर लोकच दिसतात !! याचा विषाद वाटतो !

जे पाहिलं, अनुभवलं, वेचलं ते तुम्हालाही द्यावं असं वाटलं म्हणून हा सारा लेखनप्रपंच !!

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार मनुजा ज्ञान येत असे फार।। हेच खरे.
बाय-बाय !!

राधिका भांडारकर

– लेखन : राधिका भांडारकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ.☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. फार छान प्रवास वर्णन राधिका ताई…डॊगर दऱ्यातून वाहणाऱ्या शुभ्र झऱ्यांसारखे तुमचे शब्दझरे

  2. सुंदर मनाने आसाम मधे जाऊन आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments