Tuesday, September 16, 2025
Homeसेवा'जीवन प्रवास' ( २३ )

‘जीवन प्रवास’ ( २३ )

अखेरचा दंडवत !
दोन्ही कर जोडले नि लता दीदींच्या गाण्याची आठवण झाली.
“अखेरचा हा तुला दंडवत,
सोडूनी जाते गाव,
दरी दरीतून मावळ देवा,
देऊळ सोडून धाव ॥
तुझ्या शिवारी रडले हसले,
कडी कपारी अमृत प्याले,
आता हे परि सारे सरले,
उरलं मागं नाव ॥
सोडूनी जाते गाव,
अखेरचा हा तुला दंडवत ॥”

नतमस्तक होवून मी व माझे कलिग्स, माझ्या एमटीएनएलच्या उंबरठ्याबाहेर पडणार होतो. माझ्या हया कंपनीने, आम्हाला काय दिले नाही ? सारी सुखे उपभोगण्यासाठी, साक्षात लक्ष्मी आमच्या पदरात टाकली.

अनेक टेक्निकल बाबींचे उत्तम प्रशिक्षण दिले. देवासारखा अफाट ग्राहक, माझ्या कंपनीने आम्हाला मिळवून दिला. शिफ्टड्यूटीमुळे आमच्या खाजगी आयुष्याचे व्यवस्थापन, आम्ही उत्तमपणे पार पाडू शकलो. तुझ्या सेवेत राहून, जनसेवेचे परम भाग्य मला लाभले. मुलांच्या संगोपनात आमच्या मातृत्वाबरोबरच, तू स्वतः पाळणाघर रुपी मुलांची माय झालीस. उच्च शिक्षणासाठी एमटीएनएलच्या नावामुळेच शिक्षण कर्जे घेऊन, मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवू शकलो. नवीन घरांची स्वप्ने साकार करू शकलो. जणू तू आमच्यासाठी सुखाची पायघडी अंथरलीस ! तुझे ऋण मानावेत, तेवढे कमीच !

एमटीएनएल मातेच्या सुखद कुशीतून बाहेर पडणे सर्वांच्याच मनाला दुःखद धक्का होता. तरीही त्रिवेणी संगम उत्सव साजरा करण्यास सर्व ऑफिसेसमधून जोरदार तयारी सुरू झाली होती.

कामगार संघाच्या युनियनमध्ये, विविध पदे मिळवून, काम करण्याचे भाग्य मला बरेच वर्षे लाभले होते. कामगार संघाला लाभलेले सक्षम नेतृत्व म्हणजे अरविंद सावंत !
एमटीएनएल म्हणजे महिलांनी भरलेला जणू महासागर ! महिला वर्गाची उत्तम काळजी घेणारी आमची कंपनी म्हणजे एमटीएनएल !
ही आमच्या कंपनीची घट्ट सांगड आहे. असे उदाहरण जगासमोर आज उभे आहे. त्याचे साक्षीदार म्हणजेच आम्ही !

कामगार संघाच्यावतीने, त्रैवार्षिक समारंभाचे आयोजन आखत, युनियन कार्यकारी व्यक्तींचा सत्कार समारंभ, पनवेलमधील रिसॉर्टला आयोजित केला होता. सेवेतून निवृत्त होताना, सन्माननीय निरोप प्रशस्तीपत्र, माननीय श्री.अरविंद सावंत (भाई) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. तो दिवस म्हणजे माझ्या सर्व युनियन कार्यकारी संघासाठी सोन्याचा दिवस होता.

स्वेच्छानिवृत्तीचे सन्मानचिन्ह तयार करून घेण्यापासून ते आमच्या बेलापूर कॉल सेंटर मधील, एकोणपन्नास स्टाफचा निरोप समारंभ वेळापत्रक आखण्यापर्यंत, तर उपस्थित राहणाऱ्या कुटुंबीय पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे, प्रेमाची आठवण म्हणून एखादी सुंदर भेट वस्तू खरेदी करणे तर, चहा नाश्त्याची सोय करणे, सर्व कामे आम्हालाच करावयाची होती.

अमृताने सन्मानचिन्हाचे काम घेतले, भेटवस्तू आणण्याचे काम मी घेतले तर, जुमलेदारने चहा नाश्ताचे काम, इतर मैत्रिणींना सोबत घेवून, पूर्ण करण्याचे ठरविले.

एमटीएनएल परिवारातून बाहेर निघण्याआधी, आम्हा मैत्रिणींना मकरसंक्रांत सणानिमित्त, हळदीकुंकू सोहळा साजरा करण्यास अवसर मिळाला होता. सौभाग्याचे वाण ओटीत घेण्याचे, पवित्र भाग्य आम्हाला लाभले होते. हा सोहळा एकत्रितपणे आनंद लुटून साजरा केला होता. त्या दिवशी आम्ही सगळ्या सख्यांनी, ‘महाराष्ट्राची शान नऊवारी साडी’ चा पेहराव केला होता. मराठमोळ्या शालीन स्त्रीचा रेखीवपणा, प्रत्येकीच्या रूपात ठासून भरलेला दिसत होता. अमृता व दमी, दोघींनी सर्वांचे फोटो, अगदी अचूक टिपले होते. वेगवेगळ्या पोझमधील फोटो घेण्यात, साऱ्याजणी हरवून गेल्या होत्या.

३० जानेवारी २०२० या दिवशी, आजच्या ‘न्यूज स्टोरी टुडे’ च्या सहसंपादक सौ.अलका भुजबळ, आमची मैत्रिण तर बेलापूर कॉल सेंटरचा स्टाफ, ह्या दिवशी सकाळ पासून बेलापूरला आली होती. दीर्घ आजारामुळे ती सानपाडा कार्यालयात कार्यरत होती. पण त्या दिवशी तिच्या उपस्थितीमुळे, आजच्या समारंभास चारचांद लागले होते.

एकोणपन्नास स्टाफचे आयोजन, दोन गटात विभागून, ऑफिसमधील जागेचा विचार करत, समारंभाची आखणी केली होती. पहिल्या समारंभाचा प्रारंभ सकाळी अकराला सुरू केला होता. ह्या गटात पंचवीस जणींचा समावेश होता. व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून (डीजीएम) श्री. पांडे सर, (एसडीई) श्री. मदन सर, व (एसडीई) श्री. पालांडे सर, तसेच कामगार संघ (बेलापूर कॉल सेंटर विभागाच्या) अध्यक्षा सौ. दीपा कदम, विराजमान झाले होते. अधिवेशनाचे सूत्रसंचालन मी स्वतः सांभाळले होते. मला सहसूत्रसंचालक म्हणून सौ. मृणाल बागायतकर, प्रथमच सहभागी होणार होती.

सकाळच्या अधिवेशनातील उत्सवमूर्तींना प्रमुख पाहुण्यांच्या आजूबाजूला बसण्याचे, नियोजन केले होते. समोर कुटुंबीय पाहुणे व उर्वरित स्टाफ, असा जागेचा विचार करत, सर्वांनी सहकार्य दिले होते. समारंभ दाटीवाटीने साजरा होणार होता. त्याबद्दल मी सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त केली होती. परिवारातून कुणी ना कुणी स्वतः चे मनोगत मांडत होते. मी व मृणालने, सुपरवायझर पोस्ट सांभाळताना प्रत्येक स्टाफच्या स्वभावाचे आकलन करून, प्रत्येकीबद्दल दोन ओळीत काव्यरचना केल्या होत्या. माझी सहसूत्रसंचालक मृणाल बागायतकर हिच्या नवख्या वाणीतून, त्या काव्यरचना ऐकवल्या होत्या. सर्वांनी कौतुकाची टाळी आम्हाला दिली होती तर, स्वतः बद्दलचे वर्णन ऐकून साऱ्या जणी खुश झाल्या होत्या.

खेळीमेळीचे पण ताटातूटीचे वातावरण समोर निर्माण झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणजे आमचेच अधिकारी असल्याने, त्यांनीही मनमोकळेपणाने एमटीएनएलच्या, बदलत गेलेल्या कामाचे स्वरूप उत्तमपणे मांडले होते. सेवेतील स्पर्धक चढाओढी, त्यासाठी कंपनीने आखलेले नियम व केलेले बदल, कामगाराने स्वतःला बदलून व निष्ठेने काम करून, ग्राहकास सेवा देत, समाधान देण्याच्या प्रयत्नात राहीला. अश्या गोष्टींचा उल्लेख, आपल्या वक्तव्यातून, एमटीएनएल आणि स्टाफ, हे चित्र सर्वांसमोर उभे केले होते.

तिन्ही सरांच्या हस्ते प्रत्येकीला प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते. हसतमुख चेहऱ्याने समारंभ पार पडत होता. हे पाहून मात्र आमचे (डीईटी) श्री. पांडे सर उद्गारले होते,
“सभी उत्सवमूर्ती खुश लग रहे हैं। सन्मानीय शाल कन्धोपे डाल दी जाती है, तो मन दुख से भर आता हैं। और रो पडता हैं। पर ऐसा कोई चित्र यहा पे नजर नही आ रहा है !”
तेव्हा मी त्यांना म्हटले होते, “सर, अभी वक्त आना बाकी है। सभी रोनेवाले हैं।”
ह्या वाक्यावर सगळे खदखदून हसले होते. अश्या रीतीने समारंभाच्या पहिल्या अधिवेशनाची सांगता केली होती. कुटुंबीय अतिथीना चहा व स्नॅक्स देऊन, आम्ही त्यांचा शुभेच्छांच्या वर्षावात निरोप घेतला होता.

दुपारच्या अधिवेशनातील सत्कारमूर्तीचा निरोप समारंभ तीन वाजता सुरू होणार होता. त्या अगोदर थोडासा विसावा घेवून, चेहऱ्याला टचअप दिला नि आम्ही साऱ्याजणी, पुढील अधिवेशनाच्या तयारीसाठी पुन्हा ताजेतवाने झालो होतो. ह्या सत्रात चोवीस जणींचा समावेश होता. आताच्या उत्सवमूर्तीच्या परिवारातून कुणी ना कुणी उपस्थित झाले होते. माझे पती व माझी मुलगी सोनाली, दुर्वासह आले होते. ह्याच अधिवेशनात मी उत्सवमूर्ती असणार होते.

माझ्या सूत्रसंचालनाचा दुसरा भाग सुरु झाला होता. देवासमोर सर्वांनी प्रार्थना करून पुन्हा एकदा व्यासपीठावर, सकाळचे अधिकारी अतिथी व आमच्या बेलापूर कमिटीच्या अध्यक्षा स्थानापन्न झाले. दुसऱ्या सत्रातील साऱ्या उत्सवमूर्तींना आदराने व्यासपीठाच्या आसपास रांगेत बसवले गेले. उपस्थित झालेल्या कुटुंबीय पाहुण्यांचे स्वागत करून, त्यांनाही समोर बसण्याची विनंती केली. सर्वांचीच उत्सुकता कार्यक्रमाकडे लागून राहिली होती.

सकाळ प्रमाणे आताही जोमाने, माझ्या सूत्रसंचलनाच्या ताकतीवर, मी कार्यक्रमाला सुरुवात केली होती. (एसडीई) श्री.पालांडे सर व श्री.मदन सर यांनी आपल्या वक्तव्यातून, एमटीएनएलवर असलेले प्रेम व तिच्या सेवेत काम करून मिळालेले समाधान, यावर बरीच उदाहरणे दिली. त्यांचेही मन भरुन आल्यासारखे वाटले होते. “आपली एमटीएनएल कंपनी म्हणजे, समाधानी आयुष्य !” हया वाक्याने सर्वांचीच मने हेलावून गेली तर अभिमानाने भारावली. प्रत्येकीच्या विशिष्ट स्वभावानुसार आम्ही लिहिलेल्या काव्यचारोळ्या मृणाल बागायतकरने वाचण्यास सुरुवात केली होती. खरं तर हा प्रत्येकीचा स्वभाव अभ्यास व निरीक्षण आकलन, मी व मृणाल सुपरवायझरच्या पोझिशनवर आल्यापासून हे क्षण टिपले होते.

माझी लेखनातील आवड, बरेच दिवसांपासून मृणालच्या लक्षात आली होती. हे जाणवताच तिने मला, ‘वेचलेले मोती’ नावाचे पुस्तक भेट दिले . तिचीही शब्दांवरील पकड चांगली होती. त्यामुळे हे काम आम्ही दोघींनी, छान केले. प्रत्येकीचे चार शब्दातील वर्णन ऐकून, समारंभातील वातावरण प्रफुल्लित झाले होते. समारंभाला खेळीमेळीचे व उल्हासित स्वरूप येत होते.

हसता हसता आम्ही आता शेवटच्या कार्यक्रमाकडे वळलो होतो. प्रत्येकीला पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल व सन्मान चिन्हासोबत प्रशस्तीपत्र देऊन, श्री.पालांडे सर, श्री.मदन सर व श्री. पांडे सर, सर्वांचा सत्कार करत होते. आमच्या बरोबरीने श्री. पालांडे सर व श्री. पांडे सर, हे सुद्धा स्वेच्छानिवृत्तीत होते. त्यांचाही श्री.मदन सरांनी, पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल व भेटवस्तु देऊन सत्कार केला होता.

विशेष म्हणजे हया समारंभात, निवृत्तीच्या कारकुनी कामात व संगणकावर उत्तम काम करून, वेळेत पूर्ण केले होते, त्या आमच्या क्लार्क दळवी मॅडमचे, खूप कौतुक झाले होते. श्री. पांडे सरांनी, तिच्या बद्दल कौतुकाचे भाष्य करून, स्वलिखित प्रशस्तीपत्र देऊन तिचा सत्कार केला होता.

सोहळयात पाहुण्यांना चार शब्द मांडण्याची संधी दिली होती. कोणाचे पती तर कुणाची मुलगी तर कुणाचा मुलगा आपल्या आईच्या कर्तुत्वावर बोलत होते. तर पती आपल्या पत्नीबद्दल, आयुष्याच्या नवीन वळणावर, कित्येक वर्षे मनात बंद करून ठेवलेल्या भावना, सर्वांसमोर बोलत होते. आई बद्दलचे प्रेम, तिने स्वतः च्या धावपळीत मुलांची घेतलेली काळजी, जेव्हा ती मुले आपल्या शब्दात बोलत होती तेव्हा मात्र, सर्व माता भावूक झाल्या होत्या.

माईक पुन्हा माझ्या हातात आला होता. शेवटच्या टप्प्यात माझ्या एमटीएनएलच्या परिवारात आम्ही उपभोगलेले ते अविस्मरणीय क्षण व असंख्य आठवणी, मी लिहिलेल्या कवितेतून सादर करणार होते. शेवटचा क्षण येऊन ठेपला होता. कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी सर्व कुटुंबीय अतिथींचे व माझ्या सर्व अधिकारी वर्गाचे व मित्र परिवाराचे आभार मानत, माझी कविता वाचण्यास मी सुरुवात केली.

आठवण तुझी येत राहील,
आठवण तुझी येत राहील,
हुशारीच्या स्वप्नांची दुवा झालीस तू,
स्त्री सन्मानाची महती दिलीस तू,
पुरुषांच्या रांगेत स्थान दिलेस तू,
स्वावलंबी आयुष्याची उमेद होतीस तू ॥१॥

आठवण तुझी येत राहील,
आठवण तुझी येत राहील,
कौटुंबिक ताण न कामाचा क्षीण,
विसरण्याचे मंदिर होतीस तू,
केसांची स्टाईल न चेहरा न्याहाळण्यास,
प्रिय आरसा होतीस तू ॥२॥

आठवण तुझी येत राहील,
आठवण तुझी येत राहील,
स्पर्धात्मक प्रशिक्षणाची शाळा होतीस तू,
जिभेच्या चोचल्यांची माय होतीस तू,
नटून थटून येण्याचे ठिकाण होतीस तू,
प्रेमळ ऊबेची रजई झालीस तू ॥३॥

आठवण तुझी येत राहील,
आठवण तुझी येत राहील,
सुखात तुझ्या विसरले माहेरवास,
तूच होतीस माय न बाप,
नाती जुळली ह्याच घरात,
विसरू कसे सांग कानात ॥४॥

आठवण तुझी येत राहील,
आठवण तुझी येत राहील,
असं कसं हिरावून घेतलंस,
विरहाच्या डोहात तू फेकलंस,
निकामी करून घरात बसवलंस,
आसवांचा पाझर डोळ्यात आणलास ॥५॥

आठवण तुझी येत राहील,
आठवण तुझी येत राहील,
माय होऊन सांभाळत होतीस,
क्षीण होताच साथ तू सोडलीस,
मातेचे कर्तव्य पार तू केलेस,
स्वतःचे घरदार मोकळे केलेस ॥६॥

आठवण तुझी येत राहील,
आठवण तुझी येत राहील,
सर्वांचा किलबिलाट न हास्याचा कल्लोळ,
हॅलो-हॅलो, येस सर, प्लीज सर, थँक्यू सर,
सारे कसे शांत होईल,
फोन बिचारा निःशब्द होईल ॥७॥

आठवण तुझी येत राहील,
आठवण तुझी येत राहील,
अडकला जीव तुझ्या सेवेत,
विसरू कसे तुझे उपकार,
आठवणींनी कंठ येतो दाटून,
पाय निघेल कसा इथून ॥८॥

आठवण तुझी येत राहील,
आठवण तुझी येत राहील,
निरोप घेते तुझ्या सेवेतून,
रित्या होणाऱ्या तुझ्या घरातून,
जन्मोजन्मी ऋणी राहीन,
जन्म घेवून तुझीच सेविका होईन ॥९॥

कविता वाचता वाचता माझ्या पद्दयाचे प्रहार, मला अनावर झाले नि मी ओक्साबोक्शी रडू लागले. सर्व सख्यांच्या डोळ्यातून अश्रूंना पूर आला. सगळीकडे निरव शांतता पसरली. निरोप समारंभाच्या वातावरणात दुःखाचे सावट पसरले. श्री.पांडे सर उभे राहिले नि म्हणाले,
“अभी लग रहा है कि हम सब सेवानिवृत्त हो रहे हैं। मॅडम आपके कविता मे बडी ताकद है। सबके साथ मैं भी भावूक हो गया हूँ।”
पुढील कवितेचे वाचन माझी मैत्रीण, सहसूत्रसंचालक मृणालने पूर्ण केले होते.

आठवणींच्या कप्प्यात बेलापूर कॉल सेंटरच्या अधिकाऱ्यांसह, सर्वांचा ग्रुप फोटो घेतला होता. आजही तो फोटो मी पाहते, तेव्हा ३० जानेवारी २०२० ह्या दिवसाची आठवण डोळ्यासमोर उभी राहते.
अगदी हुबेहूब तशीच !

वर्षा भाबल.

– लेखन : सौ. वर्षा भाबल.
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. वर्षा खूप सुंदर आठवणी 👌👌 कविता कितीही वेळा वाचा रडू येतेच

  2. स्वेच्छानिवृत्तीचा योग्य इतिहास कथन केलाय.

  3. Writing is your passion it seems. You are such a natural article writer. Belapur call center staff must save it and read it once in a year to keep memories of retirement day fresh in their minds.
    Finally, i can only say that i am really impressed with your writing skill. Keep it up. We love it.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं