Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यपुस्तक परीक्षण : जागतिक राजकारण

पुस्तक परीक्षण : जागतिक राजकारण

जागतिक राजकारण आणि आपला काय संबंध ? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडू शकतो.
पण पेट्रोलच्या किंमती का वाढतात ? दोन देशांमध्ये युद्ध का होते ? अशा एक ना अनेक गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होत असतो.

खरं म्हणजे प्रत्येक देशाची सीमारेषा ठरलेली असते. दोन्ही देशातील सर्व सामान्यांना रोजचं जगणं सुसह्य असावे इतकीच अपेक्षा असते. तरी दोन देशांमध्ये युद्ध पुकारले जाते.ते कशामुळे ? युद्ध कुणाला आणि का हवे असते ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. रशिया आणि युक्रेन दरम्यानचे युद्ध किती दिवस झाले तरी चालूच आहे. ते कधी संपेल,कसे संपेल हे आजच्या घडीला कुणीच सांगू शकत नाही.
या सर्व किचकट बाबी समजून घेण्यासाठी
राज्यशास्त्राच्या अभ्यासक प्रा डॉ अंजली रानडे यांनी लिहिलेले “जागतिक राजकारण” हे परिश्रमपूर्वक लिहिलेले पुस्तक वाचलेच पाहिजे.

सकृत दर्शनी हे पुस्तक राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिल्याचे जाणवतेच. त्यामुळे ते
राज्यशास्त्राचे विद्यार्थी त्याच बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी उपयुक्त आहेच आहे पण पुस्तकातील राजकारणाचे सिद्धांत, जागतिक राजकीय अर्थ व्यवस्था, जागतिक सुशासन, जागतिकीकरणाचे तांत्रिक आणि सांस्कृतिक परिणाम, जागतिक सामाजिक चळवळी आणि अशासकीय संस्था, जागतिक राजकारण आणि राष्ट्रवाद, एकविसाव्या शतकातील जागतिक व्यवस्था, युद्ध आणि शांतता, मानवी सुरक्षा व हक्क, अण्वस्त्र प्रसार आणि निःशस्त्रीकरण दहशतवाद, लिंगभेद,
पर्यावरण, स्थलांतर, कोरोना व जागतिक राजकारण आणि शेवटी भविष्यवेेेध ही प्रकरणे वाचली की पुस्तकाची व्याप्ती स्पष्ट होते.

लेखिका  प्रा डॉ अंजली रानडे

प्रारंभीच लेखिका, जागतिक राजकारण म्हणजे काय हे सांगताना म्हणतात.. “जागतिक राजकारण” म्हणजे राज्यांतर्गत आणि राज्यांदरम्यान घडणाऱ्या अनेक घटना होय” त्यामुळे एखाद्या देशात घडलेल्या घटनेचे पडसाद लगेच इतर देशात उमटल्याचे आपण पहातो.

“जागतिक राजकीय अर्थ व्यवस्था” या प्रकरणात लेखिका दुसऱ्या महायुद्धापूर्वीची अर्थ व्यवस्था कशी होती ? हे सांगून दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची अर्थ व्यवस्था कशी बदलली आणि अजूनही कशी बदलत चालली आहे, हे विस्ताराने सांगतात.

“युद्ध आणि शांतता” या प्रकरणात लेखिका काही महत्वाची कोटेशन्स देतात. उदाहरणार्थ, साम्यवादी क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की म्हणतात, “तुम्हाला युद्धात रस नसला तरी युद्धाला तुमच्यात रस असतो”. ब्रिटिश युद्धशास्त्री बेसिल हार्ट म्हणतात, “तुम्हाला शांतता हवी असेल तर युद्ध समजून घ्या
इतिहासात डोकावले तर असे दिसते की, आजवर १४ हजार ४०० युद्ध झाली असून ३५० कोटी लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. असा सर्व इतिहास असूनही मानव युद्धापासून परा न होता, उलट अधिकाधिक शोध लावून नवनवी शस्त्रे, अण्वस्त्रे, प्रकार शोधून शेवटी जगाच्या अंताला का कारणीभूत ठरत आहे ? असा प्रश्न पडतो. याचे कारण कदाचित “जागतिक राजकारणाचे सिद्धांत” या प्रकरणात लेखिका म्हणतात, त्या प्रमाणे, “राज्याची निर्मिती आणि त्याचे नेतृत्व हे नेहमी स्वार्थी आणि सत्तापिपासू व्यक्ती करतात. त्यामुळे मानवी स्वभावाची मूलतत्त्वे आंतरराष्ट्रीय राजकारणात दिसून येतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात स्पर्धा आणि शत्रुत्व अटळ आहे. म्हणूनच लष्करी सामर्थ्य वाढविण्याकडे राष्ट्रांचा कल असतो”

शेवटच्या “भविष्यवेध” या प्रकरणात लेखिका म्हणतात, “या पुढील सत्तास्पर्धा ही भुराजकिय नसेल तर ती भूआर्थिक असेल” त्यामुळे नवीन बाजारपेठा काबीज करण्यावर भर दिला जाईल. अर्थकारणाला अधिक महत्व दिल्यामुळे युद्ध होऊ नये, यावर भर दिला जाईल. अर्थात असे असले तरी सर्व जगाचे एक राज्य होईल, अशी शक्यता नजीकच्या भविष्यात तरी दिसत नाही.
जगात खरोखरच शांतता नांदण्यासाठी, सर्व जग सुखी होण्यासाठी सर्व जगाचे “एक राज्य” निर्माण होणे हीच खरी काळाची गरज आहे, हे मात्र नक्की.

हे या पुस्तकाचे परीक्षण असल्यामुळे, नमूद कराव्याश्या वाटत असूनही विस्तार भयास्तव सर्वच बाबी लिहिताना मर्यादा आहेत. पण डोळसपणे जगायचे असेल तर जागतिक राजकारण समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी हे पुस्तक मुळातूनच वाचायला हवे.

४२१ पानांचे हे पुस्तक खरे म्हणजे ग्रंथच आहे. पुणे येथील डायमंड पब्लिकेशन्सने, ते सुबकरित्या प्रकाशित केले आहे.

जग सध्या संक्रमणातून जात असताना अतिशय योग्य वेळी पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल लेखिका आणि प्रकाशक दोघेही अभिनंदनास पात्र आहेत.
लेखिकेच्या पुढील लेखन प्रकल्पासाठी हार्दिक शुभेच्छा.

– परीक्षण : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं