“आयुष्य”……. परिपूर्ण कसं बनतं.?
साकव्य समुहाचे दुसरे परदेशस्थ मराठी कवी संमेलन नुकतेच आभासी पद्धतीने पार पडले. या संमेलनात सादर झालेल्या कविता, रोज एक या प्रमाणे आपल्याला वाचायला मिळतील. विशेष म्हणजे ‘कुटुंब रंगलय काव्यात’ फेम विसुभाऊ बापट हे या कवितेचं रसग्रहण करीत आहेत….
‘आयुष्य एक यात्रा, आयुष्य एक मेळा |
आयुष्य वेदनांचा, खग्रास ठोकताळा ||’
अकोल्याच्या उ.रा. गिरी याची ही कविता.! यासारख्या अनेक कवींनी आयुष्यावर अनेक कविता लिहिल्या. त्या वाचून आयुष्याकडे बघण्याचा प्रत्येक कवीचा दृष्टिकोन रसिक वाचकाला समाजतो. पण परिपूर्ण आयुष्य कसं बनतं ? हे अगदी चपखल शब्दांत सांगण्याचा प्रयत्न रशियात राहणाऱ्या डॉ.कल्याणी मसादे यांनी त्यांच्या ‘आयुष्य’ या कवितेत केलेला दिसून येतो.
तलम रेशमी वस्त्र असो किंवा साधं खादीचं वस्र असो विणकाम करणाऱ्याला प्रत्येक वस्राची वीण घट्टच करावी लागते. त्याप्रमाणेच श्रीमंत असो वा गरीब प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भावभावनांची, नातेसंबंधांची वीण घट्ट करावीच लागते, तेंव्हाच आयुष्य सुखद आणि सुंदर होते. वेगवेगळ्या रंगछटांनी विणलेले वस्र जसे सुंदर देखणे होते, त्याप्रमाणे सुखाबरोबरच दुःखाच्या धाग्यांनी विणलेले आयुष्याचे वस्र देखणे आणि परिपूर्ण होते.
वात्सल्याच्या धाग्याने आयुष्याचे वस्र उबदार-मुलायम होते तर मैत्रीच्या धाग्याने ते आकार घेऊ लागते. अशा छान, प्रसन्न, आणि सुखद धाग्यांबरोबर दुःख, निराशा, पराजय असे धागे सुद्धा आयुष्याचे वस्र विणताना वापरले तर आयुष्याच्या वस्राची वीण खऱ्या अर्थाने घट्ट आणि परिपूर्ण होते. हेच परिपूर्ण आयुष्याचे गमक कवयित्री डॉ.कल्याणी मसादे यांनी त्यांच्या ‘आयुष्य‘ या कवितेत साध्या सोप्या शब्दातून सांगितले आहे.
– विसुभाऊ बापट. मुंबई.
आता वाचू या “आयुष्य” ही कविता…..
✨आयुष्य ✨
आज म्हटलं आयुष्य
विणायला घेऊ या.
जमतयं का ते बघुया;
वाटलं अगदी सोप्प असेल,
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल…
प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे ?
एक-दोनच की सगळेच वापरायचे ?
मग ठरवलं फक्त छान छानच धागे घेऊ;
एक काय, दोन काय सगळेच एकमेकांत विणू.
सुरवात केली वात्सल्याच्या धाग्याने;
धागा होता फार ऊबदार आणि मुलायम.
म्हंटल छान आहे हा धागा;
धाग्याने या वीण राहिल कायम.
मग घेतला एक मैत्रीचा धागा,
बघता बघता बर्याच भरल्या की हो जागा.
थोड-थोड आयुष्य आता आकार घेऊ लागलेलं.
एक-एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला;
प्रत्येक धाग्यात तो आपसूकच गुंफत गेला;
आणि हळूहळू वीण घट्ट होत गेली.
तरीदेखील कसलीतरी कमी मात्र होती.
मग घेतला एक नाजूक प्रेमाचा धागा;
धागा होता फार सुंदर आणि रेशमी,
धाग्याने या आयुष्याला अर्थ आला लागूनच.
एक-एक घेतला धागा यशाचा, किर्तीचा आणि अस्तित्वाचा;
आयुष्याला ज्यामुळे एक नवा उद्देश मिळाला.
सगळेच धागे छान आणि प्रसन्न होते;
तरीदेखील त्यांच्यातल्या काहींचे मन मात्र अजूनही खिन्न होते.
काही धागे पहुडले होते निवांत असेच,
म्हणटलं बघुया तरी यांच्यामुळे आयुष्य होतयं का सुरेख ?
मग घेतला एक-एक धागा दु:खाचा आणि निराशेचा;
एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा;
हे चारही धागे विणता एकमेकांमध्ये, आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे.
अपयशाशिवाय यश नाही;
दु:खाशिवाय सुख नाही.
पराजयाशिवाय जय नाही आणि,
निराशेशिवाय आशा नाही.
महत्त्व पटलं आहे सर्व धाग्यांचं आज मला,
फक्त सुंदर सुंदर धाग्यांनीच मजा नसते आयुष्याला.
साध्यासुध्या लोकरीच्या विणकामातही रंगसंगती ही लागतेच.
मग आयुष्य विणतानाच आपल्याला भिती का बरे वाटते?
सर्व धागे एकमेकांत विणूनच एक परिपूर्ण आयुष्य बनत असतं;
पण कुठला धागा कुठे आणि कसा वापरायचा
हे मात्र ज्याचं त्याच्यावर अवलंबून असतं !
✍🏼डाॅ. कल्याणी मसादे. रशिया.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
डाॅ. कल्याणी मसादे यांची आयुष्य ही कविता सुंदरच आहे.
पण ती स्वरचित नक्कीच नाही.
मीडीयावर ती अनेकवेळा वाचलेली आहे
खूप खूप सुंदर कविता