नमस्कार, मंडळी.
आजपासून दर बुधवारी, आपण “हलकं फुलकं” हे सदर सुरू करीत आहोत.
आजच्या पहिल्या सदराच्या मानकरी आहेत, शुभदा दीक्षित.
एमएससी (मायक्रोबायोलॉजी) असलेल्या शुभदाजींचे
पंचवीस वर्षे खोपोली येथे वास्तव्य असून त्या
पॅथॉलॉजी लॅब चालवत होत्या.
‘साहित्यानंद’ दिवाळी अंक, म.टा. मध्ये त्यांचे लेखन प्रसिध्द झाले आहे. डाॅ. शंतनू चिंधडे ह्यांनी संपादित केलेल्या पुस्तकात त्यांच्या कविता समाविष्ट झाल्या आहेत. तर सातारच्या रेडिओ तरंग वरून त्यांचे काही लेख वाचल्या गेले आहेत. तसेच बडोदा येथील साहित्य संमेलनात कविता वाचण्याचा मान त्यांना मिळाला आहे. आज लागलेला त्यांचा “राँग नंबर” आपल्याला नक्कीच पुन्हा लागावा, असा आहे !
शुभदाजींचे न्यूज स्टोरी टुडे त स्वागत आहे…. – संपादक.
राँग नंबर
रॉंग नंबर हा शब्द माझ्या अगदी पाचवीला पूजला आहे म्हणा ना. अहो, पाचवीला कसला जन्मापासूनच पूजला आहे. पाच दिवस तरी उशीर कशाला ? त्याचं असं झालं. माझ्या आईचे माझ्या वेळेस प्लॅन्ड सिझेरियन अमुक एका तारखेला ठरलेले होते. त्याच्या आदल्या दिवशी माझी आई सकाळी हॉस्पिटल ला ॲडमिट झाली होती. दिवसभर थांबल्यामुळे माझी आजी संध्याकाळी उशिराने आईला सांगून दोन तासासाठी घरी आली. आईची तब्येत उत्तम होती. सगळे आटोपून आजी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हाश्श हुश्श करीत खुर्चीत बसते न बसते तोच, एक नर्स हसत हसत म्हणाली, “घ्या आजी, पहिली बेटी धनाची पेटी.” आज्जी इकडे तिकडे बघू लागली म्हणाली, “माझ्या लेकीचे उद्या प्लँड सिझेरियन आहे. ‘रॉंग नंबर’. हे बाळ आमचे नाही.” त्यावर ती त्याहून मोठ्याने हसत नर्स म्हणाली, “अहो, तुम्ही घरी गेलात आणि थोड्याच वेळात ताईंच्या पोटात दुखू लागले. म्हणून त्यांना ऑपरेशन थिएटर मध्ये नेले. थोडा त्रास झाला. पण नॉर्मल डिलिव्हरी होऊन हे कन्या रत्न प्राप्त झाले. अस्मादिकांना या पृथ्वीतलावर अवतार घ्यायची जास्त जरा घाई झाली होती. त्याला कोण काय करणार ? असा हा जन्मापासूनचा रॉंग नंबर.
ग्राहम बेल ने आपल्याला कितीही लांबच्या अंतरावरून प्रियजनांशी बोलता यावे म्हणून टेलिफोनचा शोध लावला. इतकंच नव्हे तर ‘हॅलो’ हा शब्द ही देणगी खातर दिला. टेलीफोन चा शोध लागल्याच्या आनंदात पहिला फोन त्याने त्याची प्रेयसी-बायको हिला केला व ‘हॅलो’ अशी तिला हाक मारली. झालं. सा-या जगाला वाटलं फोनची सुरुवात करताना “हॅलो” च म्हणायचे. पण पुढे बिचा-या ग्रहेम बेलला रॉंग नंबर लागल्याने कसे घोटाळे होणार आहेत ते कुठे माहिती होतं ?
घरात मी एकटीच होते. फोन लागला जोरजोरात ओरडायला. मी फोन उचलताच पलीकडून, “मी मिसेस खोटे बोलते आहे” असं सांगितलं गेलं. “अहो, शैलाताई आज मला एक सुंदर कविता प्रसवलीय आणि ती कुणाला वाचून दाखवावी तर पहिलं नाव तुमचं पुढे आले म्हणून मी फोन केला”. असे त्या म्हणाल्या. मी मधून मधून नुसतेच हं हं करत होते. त्यांनी कविता वाचून दाखवली. माझा अभिप्राय मागितला. त्यावर मीही बोलले. अशा आमच्या छान गप्पा चालल्या होत्या. मलाही टाईमपास हवाच होता. शेवटी फोन बंद करता करता खोटे बाई म्हणाल्या, “मला तुमचे अभिनंदन करायचे होते. तुम्हाला तो पुरस्कार मिळाला ना त्याबद्दल.” मी म्हंटले ‘रॉंग नंबर’ आणि फोन ठेवून दिला. आता त्या खोटे बाईं च्या मनाला किती भोके पडली असतील ती मोजायला मात्र मी गेले नाही.
माझे नाव शैला. जे अगदी त्या काळी कॉमन होते. आत्ताच्या नेहा, आर्या, अवनी सारखे. त्यामुळे वर्गात चार तरी शैला असाय च्या. त्यात आडनाव कुलकर्णी म्हणजे तर विचारायलाच नको. कुलकर्णी, जोशी, देशपांडे या आडनावांचा पिक जास्तच असायचं. त्यामुळे बाईंची बोलणी खाण्याचे, शिक्षा होण्याचे, अगदी मार्कांचे ही रॉंग नंबर लागायचे आणि फजिती व्हायची.
एकदा तर मी एका माणसाच्या इतक्या शिव्या खाल्ल्या ना की काही विचारू नका. असाच सकाळी अकराच्या सुमारास फोन वाजला. मी उचलला. तोच पलीकडून जोरात शब्दांचे फायरिंगच सुरू झाले. “आमचा फोन बंद पडून आता पंधरा दिवस झाले. तुम्हाला किती वेळा फोन करायचा ? येतो येतो म्हणता आणि येत नाही. तुमच्या मॅनेजरचा फोन द्या. त्यालाच आत्ता फोन करतो. किती वाट पाहायची ?” अशा तऱ्हेची वाक्य तो असभ्य भाषेत बोलत होता. ती मी लिहिणे अशक्य. त्यात प्रत्येक वाक्यानंतर ‘भ’ ने सुरू होणारी शिवी. एवढे सगळे बोलल्यावर एका क्षणाचा पाॅज घेऊन म्हणाला, “आता का बोलत नाही ? जीभ टाळ्याला चिकटली का ? मी म्हटले, “रॉंग नंबर”. अन् फोन खाडकन ठेवून दिला. त्याच्या रागावर आणखी गरम पाणी पडले की गार पाणी पडले ते मात्र मला कळू शकले नाही.
आमच्या गल्लीत सारखी रस्त्यांची खोदाई चालू असते. कधी टेलिफोनच्या वायर टाकायच्या म्हणून, कधी दुरुस्तीसाठी म्हणून. पण त्या वायरमन ला कुठे ठाऊक रस्त्याच्या खाली लागलेल्या राँग नंबर मुळे किती घोटाळे होत आहेत ते ? हल्ली म्हणजे जसे मोबाईल फोन आले तसे रॉंग नंबर ची गंमत अनुभवायला कमी मिळू लागली. कारण बहुतेक फोन नंबर त्यात सेव्ह केलेले असतात.
रॉंग नंबर माझी पाठ कुठेही सोडत नाही. अगदी माझ्या छान गुलाबी दिवसात सुद्धा. मी कॉलेजमध्ये होते. एक मुलगा मला खूप आवडायचा. तो ही माझ्याकडे पाहून हसतो, असं निदान मला तरी वाटायचं. माझा आपला छुपे छुपे नजरेचा खेळ चालू होता. कारण बेधडक पणे जाऊन बोलणे मला जमण्यासारखे नव्हते. माझ्या जवळच्या मैत्रिणीच्या ते लक्षात आले. तिनेही मला प्रोत्साहन दिले. मला म्हणाली, “त्याची बहीण माझ्या बहिणीची मैत्रीण आहे. बघू काही जमतंय का.” माझ्या मैत्रिणीने यथावकाश त्याच्या बहिणीकडे सहज चौकशी केल्यासारखे करून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. पण त्या चाणाक्ष बहिणीच्या लक्षात आले. आणि ती पटकन म्हणाली, “रॉंग नंबर, तो ऑलरेडी एंगेज्ड आहे.” झालं ! इथेही रॉंग नंबर लागला. माझे पहिले वहिले मनातले प्रेम असे फसले !
बी. एस. सी. च्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेचा निकालाचा दिवस आठवला की अजूनही माझ्या पोटात गोळा येतो. त्या दिवशी अगदी गहजबच झाला. आधीच मी खूप टेन्शनमध्ये होते. आमच्या वेळी कुठल्याही वर्तमानपत्राच्या ऑफीसमध्ये आदल्या दिवशी संध्याकाळी रिझल्ट काढून आणता येत असे. माझा भाऊ रिझल्ट बघायला गेला. येताना अगदी चेहरा पाडून घरी आला. कारण माझा नंबरच यादीत नव्हता. मी चक्क नापास झाले होते. घरात एकदम तंग वातावरण निर्माण झाले. मला हे अगदी खोटे वाटत होते. पण भाऊच बघून आल्यामुळे मी काहीच बोलू शकत नव्हते. वडिलांचे मला बोलून झाले माझे. रडून डोळे सुजले. सकाळी पेपर आला मी सहज म्हणून रिझल्ट पाहिला. आणि काय सांगू माझे डोळे लकाकले. माझा नंबर तिथे चक्क होता. भावाने सांगितले, “शैला कुलकर्णी”. पण मधले नाव न सांगितल्यामुळे तेथील क्लार्कने दुसऱ्या शैला कुलकर्णीचा नंबर बघितला व रिझल्ट सांगितला. म्हणजे इथेही ‘रॉंग नंबर’.
हा रॉंग नंबर ना, माझा पिच्छा सोडत नाही. दिरां कडे खरे तर बरेचदा जाते. पण नेहमीच बारावा की तेरावा मजला हा घोटाळा होऊन मी चुकीच्या मजल्यावर जाते. घराची बेल वाजवते. त्या घरातली व्यक्ती ‘रॉंग नंबर’ म्हणून दार तोंडावर आपटते.
प्रवासात काय होते समजत नाही. नको तो बोगी नंबर मी लक्षात ठेवते. घाईघाईने ट्रेनमध्ये चढते. पाहते तो माझ्या नंबरच्या सीट वर कोणीतरी बसलेले असते. मी नम्रपणे त्यांना त्या जागेवरून उठण्याची विनंती करते.
पण ती व्यक्ती माझ्या मोबाईल मधील मेसेज पाहून माझ्यावर खेकसते ‘रॉंग नंबर’.
रॉंग नंबरचा नाट लागलेल्या मला, जेव्हा यमदूत न्यायला येईल, तेव्हा तोही असंच म्हणेल का ? ‘रॉंग नंबर’ !

– लेखन : शुभदा दिक्षित
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.