नाबाद ५०☺️
नमस्कार,
रसिक श्रोते हो .🙏 आज मी ज्या गाण्याचं रसग्रहण करणार आहे ते गाणं “ओठावरलं गाणं” या सदरातलं ५० वं गाणं आहे. गाण्याचं रसग्रहण करण्यापूर्वी न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ सरांचे मन:पूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी दिलेल्या संधीमुळे आणि प्रोत्साहनामुळे आज मी ५० गाण्यांवर रसग्रहण लिहिण्याचा टप्पा पूर्ण करू शकलो.
मित्रहो, ज्येष्ठ कवी भा रा तांबे यांनी “कशी काळनागिणी”, “तिन्ही सांजा सखे मिळाल्या”, नववधू प्रिया मी बावरते”, “घन तमी शुक्र बघ राज्य करी”, अशी एकापेक्षा एक सरस गाणी दिली, त्याच भा रा तांबे यांनी लिहिलेलं हे आणखी एक सुंदर गाणं ज्याचे शब्द आहेत –
डोळे हे जुलमी गडे रोखूनी मज पाहू नका
जादूगिरी त्यात पुरी येथ उभे राहू नका
डोळे ! चेहेऱ्यावरचा एक असा अवयव जो तुमच्या मनातील राग, लोभ, प्रेम, मत्सर, विकार, वासना या सर्व भावना व्यक्त करतो. या तरूणीचा नियोजित पती कोण काय म्हणेल याची पर्वा न करता पहिल्याच भेटीत तिच्या दर्शनाने घायाळ होऊन तिच्याकडे टक लावून पहातोय. त्याच्या अशा पहाण्याने तिच्याही ह्रदयात गुदगुल्या होतायत आणि कितीही जरी हवंहवंसं वाटलं तरी ती त्याला विनवणी करते आहे कि अहो, असं माझ्याकडे टक लावून बघत राहू नका. तुम्ही असं बघत राहिलात कि तुमच्या डोळ्यांच्या जादूचा माझ्या मनावर असा काही प्रभाव पडतो की मलाही त्या डोळ्यांचा जुलूम हवाहवासा वाटतो. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही इथून निघून जा कसे म्हणजे ते जनरीतीला धरून होईल.
घालू कशी कशिदा मी
होती किती सांगू चुका
बोचे सुई फिरफिरूनी
वेळ सख्या जाय फुका
अहो, आईने मला एका वस्त्रावर कशिदा काढायचं काम दिलंय. आता तुम्ही माझ्याकडे असे टक लावून बघत राहिलात त्यामुळे माझं कामात लक्ष लागत नाहीये. तुमच्याकडे दुर्लक्ष करायचं असं मनाशी ठरवून मी तुमच्याकडे पाठ करून काम करायला लागले पण माझ्या पाठीनं मला सांगितलं “अगं वेडे, तुझा नियोजित पती अजूनही जागेवरून हललेला नाही आणि तो तिथेच उभा राहून तुझ्याकडे एकटक बघतो आहे”. तरीही मी तिकडे दुर्लक्ष करायचं ठरवून काम करायचा प्रयत्न केला तर ४-५ वेळ हातातला दोरा सुईत ओवला न जाता, नुसताच सुईच्या बाजूने गेला. एक-दोन वेळा तर सुई हातातल्या वस्त्रामधे न जाता चक्क माझ्या बोटात शिरली आणि “स्स….हाय” असा चित्कार हळूच माझ्या तोंडून बाहेर पडला. अहो सख्या, तुमच्या या नजरेमुळे माझ्या मनाची चलबिचल होऊन माझं लक्ष सारखं तुमच्याकडे जातंय. तुम्हाला माझी विनंती आहे की कृपया इथे थांबू नका, तुम्ही मघापासून असं टक लावून माझ्याकडे बघताय पण त्यामुळे तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ फुकट जातो आहे.
खळबळ किती होय मनी
हसतील मज सर्वजणी
येतील त्या संधी बघूनी
आग उगा लावू नका
तुम्ही माझ्याकडे टक लावून बघत इथे उभे राहिला आहात खरे पण त्यामुळे माझ्या अस्वस्थ मनात जी काही खळबळ माजली आहे त्याचा तुम्हाला गंधही नाहीये. मला तासा दोन तासात हे कशिदा काम पूर्ण करायचं आहे असं सांगून मी माझ्या मैत्रिणींना जायला सांगितलं. तुम्ही जर माझ्याकडे टक लावून बघत राहिलात आणि तुमच्या डोळ्यातल्या जादुमुळे माझ्या मनावर गारूड होउन मी देखील अशीच तुमच्याकडे पहात राहिले तर कशिदा काम पूर्ण होणारच नाही. दोन तास भुर्रकन उडून जातील आणि माझ्या मैत्रिणी आल्यावर त्यांनी जर तुम्हाला इथे पाहिलं तर मग त्या आपली अशी काही मस्करी करतील की मला बोलायला काही संधीच मिळणार नाही. तुम्ही नंतर जरी निघून गेलात तरी माझी चेष्टा मस्करी करायला आयता विषय तुम्ही मागे सोडून जाणार आहात, त्यापेक्षा तुम्ही अगोदरच इथून निघून गेलात ना तर ही चेष्टा मस्करीची आगही लागणार नाही आणि माझं कामही पूर्ण होईल.
भा रा तांबे यांनी अतिशय संयत शब्दांत या तरूणीच्या मनाची अवस्था वर्णन केली आहे. संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आशा भोसले यांनी गायलेलं असून आपल्या मोहक आवाजातून त्यांनीही त्या भावना आपल्यापर्यंत पोचवल्या आहेत.

– लेखन : विकास मधुसूदन भावे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
50शी करता अभिनंदन। गाण्यांचे रसग्रहण समर्थक झाले आहे।
रसग्रहण छान झाले आहे. बघता बघता 50 गाण्यांचे रसग्रहण केलेस याबद्द्ल तुझे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
नमस्कार विकासजी, बोलबोलता पन्नास गाण्यांचं रसग्रहण तुम्ही पूर्ण केलंत. त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. सातत्याने लिहिण्यासाठी चिकाटी लागते. वेळेवर ते लेखन लिहून संपादकांकडे पाठवावे लागते. आपण हेसातत्य चिकाटी दाखविली म्हणूनच हा टप्पा गाठलात.शुभेच्छा पुढील लेखनासाठी.
मेधा सोमण.
धन्यवाद मेधा मॅडम 🙏
वसंत प्रभू यांनी अनेक गाणी अजरामर केली, त्यातील हे भा.रा.तांबे यांचे एक गीत. आशा भोसले यांच्या सुरेल आवाजात ऐकताना मन मंत्रमुग्ध होते. सातत्याने ५० प्रसिद्ध गाण्यांचे रसग्रहण करुन आपण अर्धशतक पूर्ण केल्याबद्दल आपले अभिनंदन.
धन्यवाद विवेकजी 🙏