सा क व्य व्हॉट्सॲप समूहाच्या दुसऱ्या परदेशस्थ मराठी ऑनलाईन कवी संमेलनात कवयत्री अरुणा मुल्हेरकर यांच्या कवितेचे “कुटुंब रंगलंय काव्यात” फेम प्रा विसुभाऊ बापट यांनी केलेले रसग्रहण…
“विश्वास…..प्रेमाने जिंकण्याचा.!”
‘प्रेम’ अडीच अक्षरांचा एक शब्द ! या प्रेमाबद्दल
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आपल्या कवितेत म्हणतात…
“प्रेम कर भिल्लासारखं, बाणावर्ती खोचलेलं |
मातीमध्ये उगवून सुद्धा, मेघापर्यंत पोचलेलं ||
प्रेयसीच्या उत्कट, उदात्त व उन्नत प्रेम-लहरीं बद्दल सांगण्याचा कवयित्रीने “विश्वास” या कवितेत केलेला प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.
तिच्या ‘सखयाचं’ लहरी वागणं, त्याचे वागण्यातले नखरे सहन करून सखयाचे प्रेम जिंकण्याची ताकद प्रेयसीच्या प्रेमात आहे. त्याच्या नामाचा तिने गुंफलेला सुगंधी हार त्याला जिंकून घेईल, याची तिला खात्री आहे. तिच्या बरोबरच्या त्याच्या वागण्याने तिचे डोळे पाणावत असले तरी तिच्या शिवाय तो सखया राहू शकणार नाही, ती ‘पाणि-ग्रहण करेन’ असेही ती सांगते आहे.
मराठीवर प्रचंड प्रेम करणाऱ्या सौ. शामला पंडित (दीक्षित) यांनी ‘शामलाक्षरी‘ हा नवा काव्यप्रकार लिहून मायमराठीची केलेली सेवा मराठी काव्यरसिकांना मनापासून आवडणार, याबद्दल तिळमात्र शंका नाही. “शामलाक्षरी” या शामलाजींच्या काव्यप्रकाराचे नियम त्यांनी आपल्या कविते नंतर दिलेले आहेतच.!
– विसुभाऊ बापट. मुंबई
पुढे “विश्वास” ही कविता वाचू या….
विश्वास (शामलाक्षरी काव्य)
लहरी उठल्या सागरात
प्रीत तशी माझ्या अंतरात
लहरी वागतोस का असा ?
नकळे काय तुझ्या मनात
भेट व्हावी अपुली वाटते
सांग तू या इथे येशील का ?
भेट प्रीतीची घेऊनी करी
प्रेमभरे मज देशील का ?
हार गुंफिला तव नामाचा
सुगंध त्याचा दरवळला
हार नाही मानणार कधी
जिंकून घेईन मी प्रेमाला
कर तू किती नखरे असे
सोडणार मुळीच नाही मी
कर प्रेमाचा भरणे आहे
जिंकून तुलाच घेणार मी
पाणी येते माझ्या नयनी
वागतोस का सखया असा
पाणि~ग्रहण मी करणार
मजविण तू राहसी कसा ?
– रचना : अरूणा मुल्हेरकर, अमेरिका.
१ ) लहरी~लाटा
स्वभाव विशेष
२) भेट~भेटणे
भेट वस्तू
३) हार~माला, माळ
पराजय
४) कर~करण्याची क्रिया
सारा, टॅक्स
५) पाणी~जल
हात
शामलाक्षरी काव्य प्रकार नियम
काव्य प्रकार निर्माती – सौ.शामला पंडित(दीक्षित)
१ ) पहिल्या व तिसऱ्या ओळीत समान शब्द अर्थ भिन्न असलेला शब्द सुरुवातीला घेणे.
२) दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक.
३) चार ओळींचे कडवे.
४ ) प्रत्येक ओळीत वर्ण संख्या समान.
५ ) २० ओळींची रचना.
समान दोन शब्द, अर्थ भिन्न काव्यरचना.
अरुणाताई मुल्हेरकर यांची शामलाक्षरी खूपच छान.सुरेख लयबद्ध अर्थपूर्ण शब्दरचना. भाषेचा सुंदर लहेजा.
विश्वास या कवितेचे विसुभाउंनी केलेलं रसग्रहणही खूप सुंदर आणि शब्दसंपन्न!
धन्यवाद देवेंद्रजी माझी ही कविता आपण
प्रसिद्ध केलीत.