Thursday, September 18, 2025
Homeकलाआठवणीतील पं. शिवकुमार शर्मा

आठवणीतील पं. शिवकुमार शर्मा

काही वर्षांपूर्वी पुण्याच्या सुप्रसिद्ध सवाई गंधर्व महोत्सवात पं. शिवकुमार शर्मा यांचा संतुरवादनाचा कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकायची संधी मला मिळाली होती. सुरेख, देखणा, काश्मीरी सफरचंदासारखा टवटवीत चेहरा, धवल केसांचा पसरलेला झाप, अंगातला जरकाडीचा सोनेरी कुर्ता, पायजमा, खांद्यावरची वेलबुट्टीची शाल पांघरलेला हा संगीतयोगी पाहताना मन भरुन गेले. वादनापूर्वी त्यांनी त्या अफाट श्रोतृवर्गाला नम्रपणे अभिवादन केले आणि म्हणाले, “हे माझं भाग्य आहे की ज्या महान गायकाने सुरु केलेल्या या संगीत महोत्सवात मला माझी कला सादर करण्याची संधी मिळत आहे. मै पुरी कोशिश करुंगा..!!”

इतक्या महान कलाकाराची ही नम्रताच सदैव लक्षात राहण्या सारखी होती. नंतरचे दीड दोन तास त्या तंतुवाद्यातून निर्माण होणार्‍या संगीत लहरीवर श्रोते नुसते तरंगत होते. स्वर्गीय आनंदाचीच ती अनुभूती होती.

पंडीत शिवकुमार शर्मा हे मूळचे जम्मु काश्मीरचे. त्यांचे वडील ऊमा दत्त हे प्रसिद्ध गायक व तबला वादक होते. वयाच्या पाचव्या वर्षीच शिवकुमारजींना त्यांनी गायन व तबलावादनाचे धडे द्यायला सुरवात केली. संतुर हे काश्मीरी लोकसंगीतातलं तंतुवाद्य. त्यांच्या वडीलांनीच असा निश्चय केला की, शिवकुमार हे भारतीय बनून प्रतिष्ठित भारतीय शास्त्रीय संगीत संतुरवर वाजवतील. वयाच्या तेराव्या वर्षापासून शिवकुमारजींने संतुर वादनाचे शिक्षण सुरु केले.

संगीतात संतुर व बासरीला आज मान्यता मिळाली असली तरी पूर्वी शास्त्रीय सभेमध्ये यांना समाविष्ट करुन घेण्यात विरोध होता. ही वाद्ये लोकसंगीतातील मानली जात होती. पार्श्वसंगीतात, पडद्यावर कुणी पहाडावर असेल तर, बासरी आणि खळखळत्या झर्‍याच्या काठी असेल तर संतुर अशीच धारणा त्यावेळी संगीत क्षेत्रात होती. परंतु हरीप्रसाद चौरसिया आणि पंडीत शिवकुमार शर्मा या जोडीने मात्र या लोकसंगीतातल्या वाद्यांना शास्रीय संगीताच्या प्रवाहात आणले.

संगीत हा ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे. तपश्चर्या आणि साधनेच्या मार्गाने पंडीतजींनी प्रचंड यश मिळविले आणि संतुर या वाद्याला सांगितीक प्रतिष्ठा मिळवून दिली. नवं परिमाण दिलं. तसेच पुढच्या पीढीसाठी एक आयता रंगमंच मिळवून दिला.

या त्यांच्या योगदाना बद्दल कुणी भरभरून कौतुक केलं तर ते एव्हढंच म्हणत, “मी फक्त प्रयत्न केला…!”
किती ही नम्रता ! तिळमात्रही अहंकार नाही.

वयाच्या सतराव्या वर्षी त्यांची कारकिर्द सुरु झाली. व्ही. शांताराम यांनी त्यांच्या “झनक झनक पायल बाजे” या चित्रपटाचे पार्श्वसंगीत करण्यासाठी त्यांना पाचारण केले. त्यानंतर त्यांनी संतूरवादनाचे खासगी कार्यक्रम सुरु केले.
ते उत्तम तबला वाजवत. गाईड मधील, ‘पिया तोसे नैना लागे रे..’ या गाण्यात त्यांनी तबला वाजवला आहे. पं.
जसराजजींनाही त्यांनी तबल्याची साथ दिली आहे. तरुणपणी मिळालेल्या यशाने त्यांना ग ची बाधा झाली नाही. टीम वर्कचे महत्व त्यांना माहीत होते आणि म्हणूनच ते एस डी बर्मन, खय्याम, लक्ष्मीकांत प्यारेलाल, पंचमदा यांचे आवडते वादक होते.!
त्यांनी इराणी संतुरचाही अप्रतीम वापर केला. बॉबी, दाग, एक नजर या चित्रपट गीतांत हे विलक्षण, सुंदर संतुर वादन ऐकायला मिळतं.

प्रतिभा आणि अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट गीतांना अप्रतीम चाली दिल्या. आणि त्या लोकप्रिय झाल्या. सिलसिला या चित्रपटातली गाणी सर्वज्ञातच आहेत.

आंतरराष्ट्रीय संतुर वादक म्हणून ते तुफान प्रसिद्ध झाले. पद्मश्री, पद्मविभूषण, संगीत नाटक ऍकॅडमी च्या
पुरस्काराने ते सन्मानित झाले.
ज्या शास्त्रीय संगीतात संतुर वाद्याला स्थान नव्हते, त्या संगीत सभा या वाद्याविना अपूर्ण ठरू लागल्या. या वाद्यावर दरबारी, मालकंस सारखे कठीण, अशक्य रागही त्यांनी सहजपणे वाजवले. संगीतातला मिंड हा बहारदार प्रकारही त्यांनी लीलया हाताळला. काश्मीर संगीतातलं संतुर वादन काहीसं सूफी प्रकारातलं असतं. पण पंडीतजींनी या वाद्याची परिभाषाच बदलली. आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रवाहात या वाद्याला उच्च स्थान मिळवून दिलं. त्यांच्या वडीलांचं स्वप्नही पूर्ण केलं. चित्रपट सृष्टीतल्या झगमगत्या प्रसिद्धीकडे त्यांनी पाठ फिरवली. आणि भारतीय शास्त्रीय संगीतातच लक्ष केंद्रीत केले. सर्व तंत्र आणि परंपरेच्या पलीकडे त्यांचं वादन होतं. त्यांचं
संतुर वाजत नसे तर गात असे…

१३ जानेवारी १९३८ ला जम्मु शहरात जन्मलेल्या या संगीतदूताची प्राणज्योत १० मे २०२२ ला अनंतात विलीन झाली. पण हा संगीतात्मा अमर आहे. मृत्यु हे सत्य आहे पण अस्तित्व हे चिरंजीव आहे. त्याला अंत नाही.
या महान कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली !!

राधिका भांडारकर

– लेखन : राधिका भांडारकर. पुणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. पं. शिवकुमार शर्मा यांच्याविषयी सविस्तर माहिती वाचून त्यांच्या विषयी आदर आणखिन वाढला .त्यांच्या नम्रतेला त्रिवार अभिवादन .खरोखरचं ते अमर आहेत
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🌹🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा