Monday, July 14, 2025
Homeसाहित्य"ओठावरलं गाणं" ( ५१ )

“ओठावरलं गाणं” ( ५१ )

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका आशा भोसले, स्वरकोकिळा लता मंगेशकर यांच्या समवेत, आपल्या आवाजाच्या वेगळया जादूची रसिक मनाला मोहिनी घालणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या प्रमाणेच मधुबाला जव्हेरी, उषा अत्रे, कैलासनाथ जयस्वाल, अरूण दाते यासारख्या अनेक गायक गायिकांनी घराघरातील रेडिओवरून वेळोवेळी उत्तमोत्तम गाणी देवून आपले कान तृप्त केले आहेत.

आज पाहू या कवी गुरूनाथ शेणई यांनी लिहिलेलं एक जुनं गाणं ज्याचे शब्द आहेत –

“कसे हे घडले नकळे मला
तुजवरी जीव माझा जडला”

प्रत्येकाच्या मनात प्रेम, हुरहूर, आकर्षण, विरह या तारूण्यसुलभ भावना तरूणपणी वरचेवर उठत असतात ज्यामुळे आयुष्य आणखीनच बहारदार होतं. या गाण्यातील तरूणीच्या मनाची अवस्थाही अशीच काहीशी झाली आहे. आपल्या प्रियकराबद्दल मनात निर्माण होणाऱ्या भावभावनांचं आंदोलन तिला एकीकडे हवंहवंसं वाटतं आहे पण “माझं तुझ्यावर प्रेम आहे” हे वाक्य उच्चारताना देखील तिची स्त्री सुलभ लज्जा आड येते आहे. “तुझ्यावर माझं प्रेम आहे …आपण लग्न करू या का “, असंही तिला त्याला विचारायचं आहे म्हणून तर ती त्याला आडून आडून विचारते आहे आणि हे कधी घडलं ते मला सांगता येत नाही अशी पुष्टी सोबत जोडते आहे.

हास्यातील तव भाव आगळा
जीवा माझिया लावतो लळा
अशी कशी ही तुलाच ठाउक मुलूख आगळी कला

तू माझ्याशी जेंव्हा बोलत असतोस तेंव्हां तुझं हसणं पहात रहावसं वाटतं. आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीशी बोलताना जो आनंद, जी उत्सुकता, जो उत्साह आपल्या चेहऱ्यावर दिसतो ना, तोच आनंद, उत्साह आणि उत्सुकता माझ्याशी बोलताना तुझ्या चेहऱ्यावर दिसून येते. तुझ्या चेहऱ्यावरही कित्येकदा तेच भाव, तू माझ्याशी बोलताना मी पाहिले आहेत. तू बोलत असताना मी वेड्यासारखी तुझ्याकडे पहात रहाते. हलकेच ओठांच्या स्पर्शाने ते भाव टिपून घ्यावे असं हजारदा वाटूनही एकदा देखील मी तसं काही केलं नाही कारण “हेच प्रेम आहे का” याबाबत मनाचा होणारा गोंधळ ! राहून राहून एकाच गोष्टीचं अप्रूप वाटत आलं…..ते म्हणजे दुसऱ्याचं मन आकर्षून घेणारी ही कला तू कुठे शिकलास रे.

कधी न बोलता एक अवाक्षर
फेकीशी मजवर नयनांचे शर
त्याच शरांनी व्याकुळ होतो जीव वेडावला

कधी कधी मात्र ही तुझी शब्द गंगा एकदम लुप्त होते. मला तर तू बोलत असताना तुझ्याकडे टक लावून बघत रहायची सवय झाली आहे. मी वेड्यासारखी तुझ्या बोलण्याची वाट पहात रहाते आणि तू मात्र अशा वेळेस काहीही न बोलता फक्त तुझ्या नजरेचे बाण माझ्यावर सोडत असतोस. तुझ्या नजरेच्या बाणांमुळे माझा जीव जेव्हढा वेडावतो तितकाच तो तुझं मनाला भुरळ घालणारं बोलणं ऐकण्यासाठी वेडापिसा देखील होतो. तुला मात्र त्याची काहीच क्षिती नसते. तुझे हे नयन शर माझं काळीज आणखीनच विध्द करतात. मी तुझ्या बोलण्याची वाट पहात तुझ्याकडे बघत रहाते आणि अशावेळेस एकही शब्द न बोलता तू तुझे नयनबाण माझ्यावर सोडत असतोस…

चित्र मानसी तुझे रेखिते
भावरंग मी त्यात निरखीते
त्या रंगातील तुझीच प्रतिमा ओढ लाविते मला

आपली भेट जरी झाली नाही तरी माझ्या आसपास तुझ्या असण्याचा आभास मला कायम होत रहातो. मग माझा मलाच प्रश्न पडतो की सारखा तुझाच विचार मनात येणं हे असं आपल्या बाबतीत कधीपासून घडायला लागलं? पण मग जास्त विचार न करता मी मनामध्ये तुझं चित्र रेखाटते आणि त्यात माझ्या प्रेमाचे आणि भावभावनांचे रंग भरत रहाते. माझ्या भावभावनांचे रंग भरलेली ती तुझी प्रतिमा माझ्या मनातली तुझ्याबद्दलची ओढ अधिकच तीव्र करते आणि मग त्या प्रतिमेकडे टक लावून बघत रहाणं हाच एक चाळा माझ्या मनात चालू असतो. तुझ्या या प्रतिमेकडे टक लावून पाहताना माझ्या लक्षात येतं की आपल्याही नकळत तुझा विचार माझ्या मनात येत रहाणं म्हणजेच “माझं तुझ्यावर प्रेम आहे” यावर शिक्कामोर्तब! प्रश्न एवढाच आहे की हे कधीपासून घडायला सुरुवात झाली ते मला आठवत नाही आणि तुझ्यासमोर ते कसं व्यक्त करायचं तेही समजत नाहीये ‌…. आता तूच काहीतरी समजून घे मला.

या गाण्याला संगीत दिलं आहे संगीतकार रंजना प्रधान यांनी आणि साध्या, सोप्या तरीही आकर्षक चालीच्या गाण्यातील भावना आपल्या सुरेल आवाजातून गायिका उषा अत्रे-वाघ यांनी आपल्यापर्यंत पोचवल्या आहेत.

विकास मधुसूदन भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

8 COMMENTS

  1. विकासजी खूप जुनं गाणं आहे हे. नेहमीप्रमाणे तुम्ही खूप छान रसग्रहण केलं आहे.

  2. अनेकविध समृद्ध आठवणी आपण जागृत केल्यात विकास भावे सर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments