अमृत मासिकात पूर्वी उपसंपादकाची डुलकी आणि मुद्रा राक्षसाचा विनोद अशा मनोरंजक चौकटी हमखास यायच्या. मी वाचनालयात जायचो तेव्हा आपल्याला हवा असलेला पेपर कोणीतरी बर्याच वेळेपासून एकच पान वाचत असल्यासारखे दिसायचे. जवळ जाऊन पहावे तर ते चक्क डुलकी काढत आहे असे लक्षात आल्यावर किती राग यायचा म्हणून सांगू. मग त्यांना हलवून ‘झाला का हो’ असे विचारावे तर तो आपल्या अंगावर पेपर भिरकावून पुन्हा निद्राधीन व्हायचा.
लहानपणी आई मला किर्तनाला घेऊन जायची तेव्हा मी बुवांच्या पुढे अशाच डुलक्या काढायचो. इतकेच कशाला हिराबाई सोनुलाल केला शाळेत शिकत असताना एक गुरुजी आम्हाला पाटीवर पाढे लिहायला सांगून कोपर्यात खिडकीशी वर्तमानपत्र उभे करुन पलिकडे चक्क डुलक्या घ्यायचे.
डुलकी तशी सर्वांनाच प्रिय असते. पुण्यात दुपारी चारपर्यंतची वेळ खास डुलक्या काढण्यासाठी राखीव असते हे सर्व ज्ञात आहेच. या वेळेत एकही दुकान तुम्हाला उघडे दिसणार नाही. दुकानावर चक्क लिहिलेले असते ‘वामकुक्षी दुपारी एक ते चार’ त्यामुळे वामकुक्षी काढूनच बाजारात गेलेले बरे असे ग्राहकही विचार करीत असतात.
काही ठिकाणी चक्क दुपारी मॅच लावलेली असते आणि चौकार षटकार बाँड्रिचा आवाज येत नाही तोपर्यंत डुलक्या काढण्याची प्रथा आहे. एखाद्या पाहुण्याला जर वाटले की मॅच पाहता पाहता सगळ्यांना झोप लागली आणि आता टिव्ही बंद करुन ठेवावा तर ती फार मोठी चूक ठरते. टिव्ही बंद व्हायचा अवकाश की कोणीतरी डुलकीतून जागं होऊन खेकसून विचारते ‘कशाला बंद केला’
डुलकी येणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हर आपल्या शेजारी कधीच बसू देत नाही हा नेहमीचाच अनुभव आहे. कारण एकाला डुलकी आली की दुसर्याला मग तिसऱ्याला हमखास डुलकी येते. चौथ्याला डुलकी नाही आली तरी कमीतकमी जांभाई तर नक्कीच येते. मलाही शेजारी कोणी झोपाळू असला की माझे डोळे जड व्हायला सुरुवात होते.
ड्रायव्हरला डुलकी परवडत नाही त्यामुळे तो मध्येच गाडी थांबवून डोळ्यांवर सपकारे मारुन पुन्हा गाडी चालवायला सिद्ध होत असतो. घाटातून जाताना हमखास कडेला लोटांगण घालणारे ट्रक पाहिले की डुलकी किती महागात पडू शकते याचा अंदाज येतो.
मी नवीन नवीन पंचवटी एक्स्प्रेसने अपडाऊन करायचो तेव्हा ती डबलडेकर होती. वर खिडकीत जागा मिळाली की मला इगतपुरी यायच्या वेळी हमखास डुलकी लागायची. इगतपुरीहून गाडी सुटायच्या वेळी जाग यायची मग धडपडत मी गाडीतून स्टेशनवर उतरायचो. आताही कल्याण येईपर्यंत कधी कधी हमखास डुलकी लागून जाते.
कार्यालयातही दुपारच्या वेळेत फाईल पुढे ठेवून त्यात विचारमग्न भासणारे महाभाग डुलकी काढून घेतातच. सरळ आडवे पडायला मिळाले नाही की माणूस बसल्या बसल्या डुलकी काढून घेतो. आपल्याकडे कामावर असताना कोणी डुलकी घेताना आढळले की शिक्षा करतात. पण पाश्चात्य देशात गुगलसारखी कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काम करताना डुलकी आली तर त्यासाठी परवानगी देत असते. छोटीसी डुलकी तुम्हाला ताजेतवाने करुन तुमच्यातील सृजनशीलता ऊर्जा वाढवते असे संशोधनही आहे. एक पक्षी तर उंचावरुन विहार करता करता डुलकी काढतो असे आढळून आले आहे.
काम करताना डुलकी लागत असेल तर कसे विनोद निर्माण होतात त्याचा एक किस्सा आठवतो. पूर्वी टाईपरायटरवर पत्रव्यवहार टाईप व्हायचा. एका पत्रावर ‘सोबत प्रत ऐवजी चुकून प्रेत जोडले आहे असे टाईप झाले. ते पत्र ज्याला पाठवले त्यानेही उलट टाईप करुन पाठवले’ तिरडीही पाठवून द्या म्हणजे पुढील व्यवस्था करता येईल. ‘
बसल्या बसल्या डुलकी घेणारी माणसे सुखी असतात. त्यांच्याकडे अजिबात झोप न येणारी माणसं हेवा करत पाहत असतात. मग अशा डुलक्या घेणार्याच्या नाकात काहीतरी पिस काडी फिरवून बघ, उघड्या तोंडात तंबाखू मावा टाकून बघ किंवा काहीच नसेल तर विडी काडी सिगारेट खोचून बघ असे उद्योग चालू होतात. अगदी डुलक्या घेणार्याच्या शर्टाची बटणे खोलून ठेव असेही प्रकार होत असतात. पण डुलक्या घेणारेही महावस्ताद असतात. आपली समाधी जराही भंग होऊ न देता ते आणखी जोरात डुलकी घेऊ लागतात. अशावेळी त्यांचे डोके चक्राकार अधिक गतीने फिरायला लागते.
डुलकी काढून जेव्हा ती डोळे उघडून एकेकाकडे बेत पाहण्याच्या उद्देशाने ताजेतवाने होऊन पाहतात तेव्हा आपल्याला अशी एखादी डुलकी काढायचा मोह झाला नाही तरच नवल म्हणावे लागेल.
झोप जितकी आवश्यक आहे तितकीच डुलकीही घेणे आवश्यक आहे. काही कुत्री दुपारची डुलकी काढता काढता कलंडतांना मी अनेकदा पाहिली आहे. तोल जाणार नाही अशी मजबूत बैठकव्यवस्था करुन पायांची आढी मारुन डुलकी घ्यायला सज्ज होणारे अनेकजण मी प्रवासात नेहमी पाहतो. पूर्वी मी बेसावधपणे डुलकी काढायचो तेव्हा हमखास माझा तोल जायचा. पण जसजसे डुलकी काढणार्यांच्या बसण्याच्या पद्धती आत्मसात केल्या तसतसा मीही डुलकी काढण्याच्या विद्येत पारंगत झालो. त्यामुळे कशीही डुलकी लागलेली असो माझा तोल जात नाही आणि डुलकीचा परमोच्च आनंद मी सहज उपभोगू शकतो.

– लेखन : विलास कुडके.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
डुलकी लेख फारच छान. अगदी पटला.
टी.व्ही.बघताना,वाचताना हमखास डुलकी लागतेच.
म. गांधीजी रात्री फक्त चार तास झोप घेत. मग दिवसा पाच मिनिटे जरी मिळाली तरी बसल्या बसल्या डुलकी घेत. मग आजूबाजूला कोणीही असो.
मला खाल्ल्यानंतर हमखास डुलकी येते.
शाळेत मला एकदा गुरूजींनी विचारले, कां हसलास ?
मी एका मुलाकडे बोट दाखवून म्हणालो , तो “डुकली”
घेतोय. सगळा वर्ग गुरूजींसह खो खो हसू लागला. मला वाटले त्या मुलाला हसताहेत. मीही हसलो.
नंतर समजले सारेजण माझ्या “डुकली”ला हसत होते.
आता जरा पडतो एक वाजायला आलाय.
चार नंतर भेटू.
“डुलकी” वरचा उत्तम लेख आहे तुमचा.
धन्यवाद
– शाम पंधरकर
मनापासून धन्यवाद सर, एक सुंदर किस्सा आपण शेअर केला आहे.
भारीच लिहिलंय, अगदी हलकं फुलकं, natural right up
खूप खूप धन्यवाद कुडके साहेब.
भारीच लिहिलंय, अगदी हलकं फुलकं, Natural write-up, खूप खूप छान कुडके साहेब आणि धन्यवादही
मनापासून धन्यवाद सर
खूपच सुंदर.दुलकीचे अतिशय बारकावे टिपले आहे.मी सुद्धा प्रवासात डुलकी अनुभतोय
अप्रतिम लेख
आपल्या संघटनेच्या समरणिकेत हा लेख देत येईल
धन्यवाद
नक्की द्या सर. मनापासून धन्यवाद सर
मनापासून धन्यवाद सर
खुप छान ललीत लेखन.
मला वाटत काही काही वेळेस एक छान डुलकी घेऊन ताज तवान होता येत.
मनापासून धन्यवाद सर
छान लिहीलय,पुर्वी कामाच्या ठिकाणी डुलकी हा सामाजिक गुन्हा मानला जात होता.पण गेल्या काही वर्षांत नवीन संशोधनानुसार ही क्षणभर विश्रांती माणसाची कार्यक्षमता वाढवते असे लक्षात आल्यामुळे आता डुलकीला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
थांबा, मी पण एक डुलकी घेवून ताजातवाना होतो आणि पुढच्या लेखाचा आस्वाद घ्यायला येतो.
मनापासून धन्यवाद सर
काही वेळा डुलकी पूर्ण आडवं पाडते
मनापासून धन्यवाद सर
मस्तच… कुडकेजी
मनापासून धन्यवाद सर
डुलकी खरेचं भारी 👌👌👌
मनापासून धन्यवाद मॅडम