केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज ६५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पवित्र गंगा नदीच्या शुध्दीकरणात त्यांनी बजावलेली भूमिका, म्हणजे त्यांचा एक वेगळाच पैलू आहे. हे सर्व विशद करताहेत ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख. श्री विनोद देशमुख यांचे आपल्या पोर्टलवर स्वागत करू या….
– संपादक
बरोब्बर तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. अलाहाबाद हे परकीय नाव जाऊन त्या जागी प्रयागराज झाल्यानंतरचा पहिला अर्ध कुंभमेळा तेथे जानेवारी ते मार्च 2019 याकाळात पार पडला.
या महाकुंभाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे 15 जानेवारीला (मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी) गंगा नदीत पवित्र स्नान करणारे लाखो भाविक जाम खुश झाले होते. एकूणच व्यवस्था उत्तम असल्याने सारेच आनंदले होते. पण सर्वाधिक आनंदाने सर्वांचे चेहरे फुलून गेले होते, ते गंगेच्या स्वच्छ, निर्मळ पाण्यामुळे ! गंगेत डुबकी मारून बाहेर येणारा प्रत्येक जण स्वच्छ पाण्याची मुक्तकंठाने प्रशंसा करीत होता. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्याचे योगी सरकार या दोघांनाही भरभरून धन्यवाद देत होता. वर्तमानपत्रे, दूरदर्शन वाहिन्या यांनी भाविकांचे हे समाधान जगभर पोहोचविले.
या समाधानाचे खरे शिल्पकार होते केंद्र सरकारमधील सर्वात चर्चित मंत्री नितीन गडकरी ! दिल्लीतील मंत्रिपदाच्या पहिल्या कारकीर्दीत त्यांच्याकडे गंगा पुनरुज्जीवन खातेही होते. त्यांनी नेहमीच्या धडाक्याने गंगा शुद्धीकरण मोहीम राबवून भाविकांना हे स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले.
गंगेच्या संदर्भात अनेकानेक वर्षांमध्ये असे प्रथमच घडले. वर्षभर दररोज गंगास्नान करणारे हजारो आणि दर सहा/बारा वर्षांनी होणाऱ्या अर्ध कुंभ/कुंभ मेळ्यात येणारे लाखो भाविक यांच्या सहभागामुळे गंगेचे पाणी हळूहळू दूषित होत गेले. त्यात भर पडली गंगेच्या अवतीभवती उभ्या राहिलेल्या कारखानदारीचे प्रदूषण, गावांचे मलनिस्सारण वगैरेंची… और गंगा मैली हो गयी ! त्यामुळे मोठ्या श्रद्धेने गंगास्नान करणारे भाविक अनेक वर्षांपासून प्रदूषित पाण्याचा सामना करीत होते.
पूर्वी वाराणसी, प्रयागराज आदींची तीर्थयात्रा करणारे बहुतांश भाविक, दूषित गंगेचा अनुभव घेऊनच परतत असत. गंगेचे पाणी स्नान करण्यालायक राहिलेले नाही, अशी खंतही ते व्यक्त करीत. त्यामुळेच, स्वच्छ पाण्याच्या स्नानाने एकजात सारेच सुखावले. एकूण अडीच हजार किलोमीटर लांबीची गंगा नदी सर्वाधिक एक हजार किमी अशी एकट्या उत्तरप्रदेशात वाहते आणि येथेच ती सर्वात जास्त दूषित झाली. उत्तराखंडमधील रामगंगा आणि काली या दोन उपनद्या कन्नौजजवळ गंगेला मिळतात. या टप्प्यातच सर्वाधिक प्रदूषण झाले. पुढे प्रयागराजला, आधीच प्रदूषित यमुनेशी संगम झाल्यानंतर हे प्रदूषण आणखी वाढले आणि वाराणसी, पाटणा मार्गे कोलकात्यापर्यंत गंगेचे पाणी भयंकर अस्वच्छ झाले. गंगेच्या किनारी वसलेल्या सुमारे शंभर मोठ्या शहरांमधून दररोज तीस कोटी लिटर सांडपाणी नदीत सोडले जायचे आणि त्यापेक्षाही जास्त प्रमाणात औद्योगिक प्रदूषण होते. गंगा शुद्धीकरणाचे काम किती जिकिरीचे आणि आव्हानात्मक होते, याची यावरून कोणालाही कल्पना येते.
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने हे आव्हान स्वीकारले आणि पाच वर्षांच्या पहिल्या कारकीर्दीत शुद्धीकरणाचे तीनचतुर्थांश काम पूर्णही केले. त्यामुळेच 2019 च्या अर्ध कुंभ मेळ्यात आणि पुढे 2021 च्या हरिद्वार मेळ्यातही स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ शकले. यासाठी गंगा पुनरुज्जीवन खात्यांतर्गत “नमामि गंगे” नावाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. प्रारंभी उमा भारती या खात्याच्या मंत्री होत्या आणि त्यांनी प्रकल्पाच्या योजनेला गती देण्याचे प्राथमिक काम केले. तब्येतीच्या कारणाने त्यांनी मंत्रिपद सोडल्यामुळे नंतर या खात्याचा अतिरिक्त कारभार नितीन गडकरी यांना देण्यात आला. त्यांनी आपल्या धडाकेबाज पद्धतीने काम सुरू करून अनेक गोष्टी विक्रमी वेळात पूर्ण केल्या. त्याच्याच परिणामी प्रयागराज अर्ध कुंभ मेळ्यात लाखोंना स्वच्छ स्नानाचा आनंद उपभोगता आला.
मुळात “नमामि गंगे” प्रकल्पासाठी पाच वर्षात वीस हजार कोटी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात 2018 संपतानाच हा आकडा पंचेवीस हजार कोटींवर गेला. यावरून गडकरींचा कामाचा धडाका लक्षात यावा.
नमामि गंगा मोहिमेत पंधरा विषयांचे अडीचशेवर प्रकल्प हाती घेण्यात आले होते. त्यातील सर्वाधिक दीडशे कामे जल-मल शुद्धीकरणाची, चौसष्ट कामे घाट आणि स्मशानभूमी सौंदर्यीकरणाची, तसेच बावीस वननिर्मिती प्रकल्प यांचा मोहिमेत समावेश होता.
एकेकाळी कसातरी वाटणारा गंगेचा काठ, ही कामे पूर्ण झाल्यानंतर आज किती सुंदर आणि प्रेक्षणीय बनला आहे, याचे अनुभव वाराणसी, प्रयागराज येथे 2019 नंतर जाऊन आलेला कोणीही सांगेल, इतका गंगेचा आता कायापालट झालेला आहे. हाच गंगा पुनरुज्जीवित झाल्याचा भक्कम पुरावा होय.
देशाची सर्वात मोठी नदी आणि प्रामुख्याने उत्तर भारताची जीवनवाहिनी असलेल्या गंगेचा एकप्रकारे पुनर्जन्मच झालेला आहे, असे म्हणता येऊ शकते.
परंतु, गंगा फक्त शुद्ध करण्यावरच थांबले तर ते गडकरी कसले ? ते जलवाहतूक मंत्रीही होते आणि गंगेतून जलवाहतूक करण्याचा धाडसी निर्णयही त्यांनी घेतला. त्यामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच नदीतून मालवाहू जहाज चालले ! पश्चिम बंगालमधून निघालेले मोठे मालवाहू जहाज गंगेतून प्रवास करीत वाराणसीला सुखरूप पोहोचले. जलमार्ग वाहतूक प्रकल्पांतर्गत गंगेच्या व्यावसायिक वापराचे नवे दालनही यानिमित्ताने उघडे झाले, हे महत्त्वाचे आहे.
गंगा ही पाच राज्यांमधून वाहणारी, अकरा राज्यांमध्ये खोरे पसरलेली भारतातील सर्वात मोठी नदी आहे. देशाची त्रेचाळीस टक्के लोकसंख्या गंगेच्या पाण्यावर जगते. भारताच्या एकूण शेतीपैकी सत्तावन्न टक्के शेतीचे सिंचन गंगा करते. म्हणजे गंगा ही भारताची मुख्य जीवनदायिनी आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून भारतीय समाज गंगेला पवित्र मानून तिची पूजा करीत आला आहे.
शुद्धीकरणामुळे गंगेचे पावित्र्य आणखी झळाळून उठले आहे, यात शंकाच नाही. नमामि गंगे ! जय जय गंगे !!
तथापि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या सरकारमध्ये गडकरी यांना गंगा आणि जलवाहतूक ही दोन खाती पुन्हा मिळाली नाही. त्यामुळे या विषयात त्यांना आणखी मोठे काम करता आले नाही. रस्ते वाहतूक हे खाते मात्र त्यांच्याकडे कायम राहिले आणि गेली आठ वर्षे देशभरात रस्ते, पूल, उड्डाणपूल यांचे जाळे विणण्यात ते दिवसरात्र मग्न आहेत. भारतातील रस्ते येत्या दोन वर्षात अमेरिकेच्या तोडीचे होतील, असा आत्मविश्वास गडकरी व्यक्त करतात. हा संपूर्ण देशासाठी मोठाच दिलासा आहे.

आधी महाराष्ट्रात आणि नंतर केंद्रात गडकरींसारखा विलक्षण बांधकाम मंत्री यापूर्वी कधीही झाला नाही, हाच जनतेचा अनुभव आहे अन् त्याला इतिहास साक्षी आहे. अशा ऐतिहासिक आणि वर्कोहोलिक नेतृत्वाचे आज 65 व्या वाढदिवशी समस्त भारतीयांकडून अभिनंदन ! लाखांचा पोशिंदा शतायुषी होवो !!

– लेखन : विनोद देशमुख. ज्येष्ठ पत्रकार. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
माननीय. श्री. नितीन जी गडकरी म्हणजे कामाचा वसा घेतलेले नेते.
अशक्य काम फक्त त्यांनीच कराव.
उत्तम लेख
🌹धन्यवाद 🌹
अशोक साबळे
अंबरनाथ
माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी हे देशाला लाभलेले उत्तम, कर्तव्यनिष्ठ, हुशार, प्रयोगशील मंत्री हे सर्वमान्य आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन. आजच्या दिवशी त्यांचे खरे खुरे कौतुकास्पद गुणगान हे देशमुखजींच्या निर्मल मनाचे उदाहरणं आहे.