Wednesday, September 17, 2025
Homeयशकथालेखन तपस्विनी : डॉ.अनुराधा कुलकर्णी

लेखन तपस्विनी : डॉ.अनुराधा कुलकर्णी

लेखन ही एक तपश्चर्या आहे, असे डॉ. अनुराधा कुलकर्णी यांच्या लेखन कारकिर्दीवरून म्हणता येईल. संसारात राहून एखाद्या स्त्रीने सातत्याने संशोधनपर साहित्य लिहायचे म्हणजे सतत त्याचा ध्यास घेतल्याशिवाय ते होणार नाही. शास्त्र, पुराणे, संत चरित्रे, संतसाहित्य अभ्यासून अनुराधाताईंनी आपल्या संस्कृतीच्या उगमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एखाद्याचे संतपण नेमके कशात आहे, त्याने समाजाला काय दिले, समाजावर त्याचे संस्कार आहेत काय असे विचारमंथन करून त्यांनी नाना ग्रंथ लिहिले.

अनुराधा बालपणीच्या आठवणी सांगतात की, त्यांच्या आजोबांच्या प्रेरणेने अमळनेर येथे तत्वज्ञान केंद्राची स्थापना झाली. या केंद्रात पाश्चात्य तत्वज्ञान व पौर्वात्य तत्वज्ञान यांचा तौलनिक अभ्यास होत असे. साने गुरुजीही या केंद्रात काही काळ होते. साने गुरुजींनी अनुराधांच्या आजोबांचे म्हणजे सावळाराम नाईक यांचे चरित्र लिहिले आहे. सावळारामांचा मोठा पुतळा या केंद्रात आहे. त्यांचा विशेष सहवास जरी मिळाला नाही तरी अनुराधाताईंच्या वडिलांवर सावळारामांचे संस्कार होते. वडिलांकडे बरेचसे ज्ञान सुपूर्द झाले होते. वेद आणि उपनिषदे वाचणे हे वडिलांना आवडत असे. अनुराधालाही हे वाचणे आवडे.

वडिलांकडून संतचरित्रे ऐकून अनुराधाताईंना संतसाहित्याचे वेड लागले. मराठीत एम.ए. केल्यावर त्यांनी पीएच.डी.साठी विषय निवडला –‘संतांच्या विरहिणी आणि गवळणी‘. पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्यावर अनुराधाताईंचे मार्गदर्शक त्यांना म्हणाले, “ही पहिली पायरी आहे. यानंतर पुढील शिक्षण खऱ्या अर्थाने तुझे तूच घ्यायचे आहे.”

डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी लेखनाची सुरवात केली ती ‘अमृताची अक्षरे‘ लिहून. हे पहिले पुस्तक म्हणजे जणू त्यांची साहित्यातील पहिलीवहिली अक्षरे. त्यानंतर ‘हरिपाठाचे अमृतमंत्र’, ‘पारमार्थिक शब्दकोश’, ‘तुका सर्वांगे विठ्ठल’, ‘पंचतीर्थ’ अशी एकसे एक पुस्तके प्रगाढ अभ्यास करून लिहिली.

पुढेही त्या संतांच्या साहित्यातच रमल्या. संतांचा काळ, त्यांनी लिहिलेले अभंग, त्यातील तत्वज्ञान, त्यांचे चरित्र हे सगळं रिचवून निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्या सार्थ अभंगगाथा लिहून काढल्या. हे पुस्तक ‘पंचतीर्थ‘ या शीर्षकाने व्यास क्रिएशनने प्रकाशित केले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्या अभंगांचे अर्थ सांगणारे हे पुस्तक नव्या अभ्यासकांना उपयोगी पडणारे आहे.

अभंगांची भाषा त्या काळातील असते. शब्दांचे संदर्भही त्या काळातले असतात. कधी कधी संतांनी वापरलेल्या प्रतिमा कळत नाहीत. संत मुक्ताबाईचे अभंग तर कूट असतात. कित्येकांना त्यांचा अजून अर्थ लागलेला नाही. पण अनुराधाताईंनी अनेक ग्रंथ तपासून, संदर्भ तपासून तो मिळवला आहे. ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी’ या मुक्ताबाईच्या कूट अभंगाचा अर्थ सांगताना अनुराधाताई म्हणतात, “मुंगीही म्हणजे जीवमात्र किंवा साधक आणि सूर्य म्हणजे ब्रह्माचे प्रतीक आणि ‘गिळिले सूर्याशी’ म्हणजे जीव ब्रह्ममय झाला” असे एक एक अर्थ लावत अनुराधाताईंनी हे पंचतीर्थ रसिकांच्या हातावर ठेवले आहे. हे अर्थ शोधण्यासाठी एकांतात बसून, मौन पाळून कित्येक दिवस अभ्यास केला. संत गोरक्षनाथ यांच्या ‘गोरखबानी’ या ग्रंथातून काही संदर्भ मिळाले.

अनुराधाताईंच्या जीवनालाच संतसाहित्याचा स्पर्श झाला आणि त्या संतप्रवृत्तीने लेखनाशी एकरूप झाल्या. नव्या पिढीच्या मुलांना स्तोत्रांचा अर्थ कळावा आणि त्यांनी त्यांचे समजून वाचन पठण करावे असे वाटल्याने डॉ. अनुराधा यांनी अनेक लोकप्रिय स्तोत्रे त्याच्या अर्थभावार्थासहित ‘स्तोत्रांच्या गाभाऱ्यात’ या पुस्तकातून प्रकाशित केली.

लोकांना अजूनही जुन्या संस्कारांबद्दल आदर आहे. हळदीकुंकवांना, लग्नांना या पुस्तिकेला डझनांनी, शेकड्यांनी मागणी येऊ लागली. आजवर या पुस्तिकेच्या बारा आवृत्त्या प्रकाशित झाल्या.

डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी केलेले एक महत्वाचे काम म्हणजे त्यांनी पारमार्थिक शब्दकोश तयार केला. कोणतीही जुनी पोथी वाचताना किंवा अध्यात्मिक ग्रंथ वाचताना अभ्यासकाला कोणती अडचण येत असेल, तर शब्दांचे अर्थ कळत नाहीत. हे पोथीपुराणातील खास शब्द नेहेमीच्या वापरातील नसतात. योगमार्गातील साधुपुरुषांनी वा ऋषींनी बनवलेले असतात. तसेच काही प्रतिमाही वेगळ्या असतात. उदा. ‘दिवसा चांदणे, रात्री उन्हे’ असा उल्लेख एका ठिकाणी आहे. त्याचा अर्थ ‘ज्ञानरुपी दिवसात चंद्राच्या सतराव्या कलेचे शीतल चांदणे अनुभवता येईल आणि अज्ञानाच्या रात्री कडक उन्हे म्हणजे वासनांचा ताप सोसावा लागेल’.

अनुराधाताईंनी अनके ग्रंथ तपासून पारमार्थिक शब्द आणि त्याचे अर्थ शोधून एक शब्दकोश बनवला. या शब्दकोशाचे प्रकाशन महासंगणककार, वैज्ञानिक, पदमभूषण डॉ. विजय भटकर यांनी केले. प्रकाशन समारंभही पुण्याला सिम्बायोसिस येथे थाटात झाला. त्यानंतर, डॉ. रविन थत्ते यांनी या ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद केला.

अनुराधाताईंनी आधुनिक तंत्रज्ञानदेखील अवगत केले आहे. अनेक ऋषींची माहिती, तसेच ‘भागवदगीतेच्या गाभाऱ्यात‘ या शीर्षकाने त्या ब्लॉग लिहितात. त्यांच्या ब्लॉगचा वाचकवर्ग मोठा आहे. ऋषींच्या चरित्राचा अभ्यास करताना त्यांना व्यास या व्यक्तिरेखेबद्दल कुतूहल निर्माण झाले. पराशर ऋषी, मत्स्यगंधा या सर्व व्यक्तिरेखांचे संदर्भ, महाभारतावर लिहिलेल्या इतर ग्रंथांमधून तपासले. त्यांचे जन्म कसे झाले असतील यावर विचारमंथन केले. महाभारतात अनेक गोष्टी जनमानसातून कल्पनांच्याद्वारे समाविष्ट झालेल्या असतात. त्यामुळे व्यासांचे खरे चरित्र लिहिण्याची त्यांना निकड वाटली. गेली दोन वर्षे सातत्याने लिखाण करून अनुराधाताईंनी व्यासांचे चरित्र कादंबरीच्या ललित माध्यमातून पूर्ण केले आणि व्यास क्रिएशनने प्रकाशित केले. ‘भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक – महर्षी व्यास‘ असे त्या पुस्तकाचे नांव आहे. या पुस्तकाला अयोध्येच्या राममंदिराचे कोषाध्यक्ष व जागतिक गीता परिवाराचे प्रमुख पूजनीय गोविंद गिरी महाराज यांची प्रस्तावना लाभली आहे.

‘व्यासोच्छिष्ट्म जगतसर्वम’ असे महर्षी व्यासांबद्दल म्हटले जाते कारण जीवनाच्या प्रत्येक अंगाला व्यासांच्या लेखनाचा स्पर्श झाला आहे. व्यासांची माहिती सांगताना डॉ. अनुराधा म्हणतात,”ब्रम्हैक्यांच्या तत्त्वांपासून ते राजकारणाच्या डावपेचांपर्यंत, शास्त्रांच्या खंडन मंडणापासून ते भक्तिरसाच्या अमृतमय अनुभवापर्यंत सर्वांचे विवेचन व्यासांनी केले आहे. वेदज्ञानाच्या प्रचंड साठ्याचे सुलभ वर्गीकरण त्यांनी केले आहे. पुराणांच्या संहिता लिहून तो खजिना जनांसाठी नीटपणे मांडला तसेच त्यांनी ब्रह्मसूत्राचेही लेखन केले. अशा या थोर व्यासांनी आपल्या संस्कृतीचे व्यवस्थापनच केले असे म्हणावे लागेल.”

सदर पुस्तकात महर्षी व्यासांची चरित्रात्मक कहाणी आणि त्यांचे ज्ञानकार्य लालित्यपूर्ण भाषेत मांडले आहे. हे पुस्तक नुकतेच ‘व्यास क्रिएशन’ ने प्रकाशित केले आहे.

अनुराधाताईंच्या अनेक दैनिकात लेखमाला गाजल्या आहेत. त्यांना अनेक पुरस्कारही लाभले आहेत. व्यास क्रिएशन तर्फे ‘ज्येष्ठ रत्न‘ हा पुरस्कार, डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार यांच्यातर्फे ‘आदर्श डोंबिवलीकर‘, दै. ठाणे तर्फे ‘आदर्श महिला वैभवी पुरस्कार‘, पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे ‘कर्तृत्ववान महिला‘ असे पुरस्कार त्यांना लाभले आहेत. अनुराधाताईंच्या पुढील संशोधन, लेखन कार्यास मन:पूर्वक शुभेच्छा.

मेघना साने

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अनुराधाताईंना मानाचा मुजरा खरोखरचं त्याचें साहित्य थोर आहे .सर्व पुरस्कारांच्या त्या खऱ्या अर्थाने हक्कदार आहेत . परमार्थिक शब्दकोश काढणाऱ्या त्या पहिल्या साहित्यीक असतील त्यांंना त्रिवार अभिवादन
    🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं