मागील भागात आपण युरोपातील जस्टिनियन किंवा जस्टिनियासिक प्लेगची साथ आणि त्याचा युरोपवर झालेला दूरगामी परिणाम यावर चर्चा केली. मात्र त्याच काळातील काही रोचक घटनांवर या भागात बोलू या.
अशा रोगाची साथ असताना रुग्णसेवा देणाऱ्या सेवाकर्मींना या रोगाचा प्रादुर्भाव होतो हे आपण बरेचदा वाचले असेल. मात्र बिनझांटाईन राजाचा पुत्र असलेल्या जॉन ६ कंँटाकौझेनस या तेरा वर्षीय राजकुमाराचा याच रोगाने अंत झाल्याची नोंद आहे. या राजकुमाराने इसवीसन पूर्व पाचव्या शतकात आलेल्या ‘प्लेग ऑफ अथेन्स’चा संबंध तत्कालीन प्लेगशी असल्याचे आपल्या लेखणीतून मांडले असे संशोधक सांगतात. याच संशोधक वृत्तीला हवी तेवढी फारसी संधी मिळाली नसावी. त्यामुळेच विश्वाला या महामारीचा आणि साथीच्या रोगांचा वारंवार सामना करावा लागला आहे.
या साथीच्या रोगाचा युरोपवर बराच मोठा प्रभाव जाणवला तो सोळाव्या-सतराव्या शतकात देखील. इसवीसनाच्या १६६५-६६ काळात ‘ग्रेट प्लेग’ नावाने पसरलेल्या या महामारीने नव्याने उभ्या झालेल्या युरोपचे सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक जीवन पुनःश्च विस्कळीत केले होते. या रोगाची पाळंमुळं काळ्या प्लेगमधे आढळून येतात असे मानले जाते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस या रोगाने डोके वर काढले होते. आठवड्याला जवळपास हजार व्यक्ती या रोगाच्या संसर्गामुळे मृत्यूला कवटाळू लागल्या. सुबक सुंदर लंडन शहर जुलै १६५५ मध्ये एक भयंकर रूप धारण करू पहात होते. खुद्द राजा चार्ल्स- २ आपले कुटुंब आणि मंत्रिमंडळासह सॅलीसबरी मार्गे ऑक्सफर्डला निघून गेले. काही अधिकारी आणि लंडनचे मेयर सर लॉरेन्स यांनी मात्र शहरात राहून नागरिकांना मदत पुरविणे पसंद केले. व्यवसाय बंद पडले होते. सक्तीची बंदी घातली गेल्याने अर्थ व्यवस्था ठप्प झाली होती. रोज होणाऱ्या मृतांचे अंत्य संस्कार करणे कठीण होऊन बसले होते. ज्यांना जमले ते शहर सोडून गेले तर काहींनी तिथेच तग धरला. दुरावस्था झाली ती मात्र हातावरची कमाई असणाऱ्या कष्टकरी वर्गाची. या साथीने नुसत्या लंडन शहराचीच जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्या कमी केली होती.
याच काळात सुप्रसिद्ध इंग्रजी नाटककार शेक्सपिअर याने नाट्यक्षेत्रात आपला जम बसविलेला होता. त्या काळी त्या प्रांतात नाट्यक्षेत्र हे अभिजात अशा अमिरांचेच क्षेत्र मानले जाई. ती बड्यांचीच भूमी अन त्यांचीच शान. शेक्सपिअरने मात्र नाट्यक्षेत्राला आणि नाटकांना एक वेगळे व्यासपीठ मिळवून दिले. अचानक आलेल्या या बंदीमुळे मात्र खुद्द शेक्सपिअर देखील प्रशासनाला सहाय्य म्हणून समाज बंधन पाळत होता आणि या काहीशा निराशाजनक परिस्थितीचा त्याच्या नाटकांवर देखील परिणाम झाल्याची नोंद आहे. आज अनेक समाज माध्यमं आणि त्या माध्यमातून अनेक कवी, लेखक, अभिनेत्यांचा या बंदीच्या काळात उदय झाला. आधीच्या कलावंतांना देखील हवे तेव्हा लाईव्ह येता आले. हवे तसे व्हिडिओ तयार करून प्रेक्षकांना बांधून ठेवता आले आहे .मात्र त्याकाळी यातले काही नसताना देखील ऑथेल्लो, मॅकबेथ, हॅम्लेट, किंग लियर पुन्हा उभे राहिलेच ना! सकारात्मक ऊर्जा संकटातून नव्याने उभे राहण्याची ताकद देतेच.
दोस्तांनो, आजच्या महाभयंकर संकटांसारखीच जीवघेण्या महामारी विश्वाने यापूर्वी कैकदा अनुभवली आहे. तुलनेने आता विज्ञान अधिक विकसित झाले आहे. अशा अनेक संकटातून कित्येक संस्कृती नव्याने उभ्या झाल्याचे इतिहास सांगतो. मात्र त्यासाठी गरज आहे ती सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची.
यापुढील भागात आपण एकोणिसाव्या शतकातील महामारीचा भारतीय समाज व्यवस्थेवर झालेल्या दूरगामी परिणामावर चर्चा करू. काही रोचक तथ्यांसाठी पुढील भाग अवश्य वाचा.
क्रमशः
– लेखन : तृप्ती काळे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.