यापूर्वीच्या भागात आपण युरोपातील प्लेगच्या साथींमुळे झालेला सांस्कृतिक, आर्थिक ऱ्हास आणि त्यातून झालेला नवोदय यावर प्रकाश टाकला.
मित्रांनो, आपल्या देशात अनेक राजवटी येऊन गेल्या. त्यांचा मूळ उद्देश व्यापार करणे हा होता. मात्र एकीचा अभाव, शिक्षणाचा अभाव आणि त्यातूनच आलेले मागासलेपण यामुळे ब्रिटिशांनी दिडशे वर्ष आपल्यावर राज्य केले. त्यात राज्य करणे सोयीचे जावे म्हणून ब्रिटिशांनी भारतात रेल्वे, टपाल खाते, शिक्षण सारख्या काही जीवनावश्यक सुविधा पुरविल्या. मात्र त्यासोबतच प्लेग सारखा जीवघेणा रोग भारतात एकदा नव्हे तर दोनदा आला. त्यापैकी पहिल्यांदा आला तो एकोणिसाव्या शतकात परकीय व्यापारी जहाजांमधून आणि दुसऱ्यांदा पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांद्वारे वापरल्या गेलेल्या भारतीय सैन्यामार्फत.
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी देखील प्लेग साथीचा प्रादुर्भाव आणि त्यातून मानवहानी झाल्याचे संशोधनात आढळून आले. साधारण १८५० च्या दशकात चीनच्या युनान प्रांतात या प्लेगची सुरुवात झाली. ही साथ मुख्यतः आशिया आणि भारतीय उपखंडात पसरली. तिचा काळ १८५५ ते १८५९ एवढा मानला जातो. त्यामध्ये जवळपास १.२ कोटी मृत्यू झाले. त्यापैकी १ कोटी मृत्यू फक्त भारतीय उपखंडात झाले. १८९६ ला मुंबई प्रांतात तर त्यांनतर दोन वर्षांनी कोलकाता प्रांतात प्लेगने धुमाकूळ घातला होता.
याच काळात भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश राजसत्तेवर निरनिराळ्या प्रकारांनी दडपण आणले जाऊ लागले. इसवीसन १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्यात भरविण्याचे सुनिश्चित झाले होते. मात्र त्यावेळी पुण्यात प्लेगची साथ असल्याने हे अधिवेशन मुंबईत भरविण्यात आले. पुण्यात ही साथ बराच काळ टिकून असावी असे इतिहास सांगतो. कारण इसवी सन १८९७ साली पुण्यात ‘स्पेशल प्लेग कमिटी’ची स्थापना करण्यात आली होती जिचा मूळ हेतू पुण्यातील प्लेगवर नियंत्रण ठेवणे आणि रोगी तसेच सर्वसामान्य नागरिकांना या साथीपासून वाचविणे हा होता. वाल्टर चार्ल्स रँड हा या कमिटीचा अध्यक्ष होता. सुरवातीला काही काळ या संस्थेच्या माध्यमातून रँडने काही चांगले कार्य केल्याची इतिहासात नोंद असली तरीही नंतर त्याने त्या कमिटीच्या सेवाकर्मींना नको तेवढे अधिकार देऊन ठेवले होते ज्यातून ते कर्मी अगदी कोणत्याही वेळी विना परवानगी कुणाच्याही घरात घुसत आणि पुरुषच काय पण महिला बालक यांची शारीरिक तपासणीच्या नावाखाली अवहेलना होऊ लागली. या बाबींची तिखट शब्दात वाच्यता फोडली गेली ती टिळकांच्या केसरीमधून ! परखड निडरपणे टिपतात ती खरी वृत्तपत्रे बाकी नुसती रद्दी ! वर्तमानपत्रातील त्या लेखांमुळे चाफेकर बंधू प्रभावित झाले. पुण्यात मृत्यूचे थैमान चालले असताना ब्रिटिश अधिकाऱ्यांना भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करावे हे कसे सुचले असावे? याचे उत्तर खरंतर आजही मिळणे अशक्यच! काळ दोन शतके पुढे येऊन आणि बरीच स्थित्यंतरे होऊनही प्रश्न मात्र बदलेला नाहीच.
असो. तर अशाच एका कार्यक्रमावरून परतत असताना चाफेकर बंधूनी कट करून एका निर्दयी अधिकाऱ्याची हत्त्या केली. ही क्रांतीची ठिणगी या प्लेगमुळे पडलेली असली तरी याच प्लेगने आम्हाला शिक्षणाची संधी मिळवून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीस आमच्यापासून कायमचे दुरावले होते ! १० मार्च १८९७ रोजी रुग्णसेवा करत असतानाच ही ज्योत मालवली!
यापुढील लेखात अमेरीका रशियातील साथीचे रोग आणि त्या त्या संस्कृतींचे पुनरुज्जीवन याचा उहापोह होईल!
क्रमशः
– लेखन:तृप्ती काळे
– संपादक: देवेंद्र भुजबळ. 9869484800.