“नमस्कार बापट सर,
मी अमर आणि ही माझी पत्नी श्रद्धा.!” स्वतःचा परिचय करून देत अमर महाशब्दे माझ्याशी बोलू लागले. “गदिमांच्या अनेक अपरिचित कविता ज्यांच्या संग्रही आहेत, असे बापट सर कॉटन मार्केट परिसरातील एका लॉजवर उतरले आहेत, येवढेच समजल्या कारणाने आम्ही या परिसरातील सर्व लॉज फिरलो. शेवटी तुम्ही या ‘गोपाळ कृष्ण लॉजवर’ सापडलात !” १९८३ यावर्षी अमर आणि वहिनी मला हुडकत लॉजवर आले होते, अमरची व माझी ती पहिली भेट.!
श्रद्धा वहिनी गदिमांच्या कवितांवर पीएचडी करीत होत्या आणि माझ्या जवळच्या अपरिचित कविता घेण्यासाठी दोघेजण मला हुडकत लॉजवर आले होते.
नागपूरच्या महाल मधील नवयुग विद्यालयात झालेला माझा ‘ओंकार काव्य दर्शन’ हा शालेय कार्यक्रम मुख्याध्यापक सरांनी रेकॉर्ड करून घेतला होता. त्याशाळेत अमरच्या मातोश्री शिक्षिका होत्या आणि त्यांनी आणलेली माझी कॅसेट ऐकल्यावर त्यांना गदिमांच्या कविता माझ्या संग्रही असल्याचे समजले होते. त्यादिवशी रात्रीचे माझे जेवण महाशब्देंच्या घरी झाले, नंतर खूप गप्पाही रंगल्या, आणि मी त्यांच्या घरातीलच एक सदस्य बनलो. आमच्यातील अहोजाहोचे अंतर संपले आणि मी अमरचा ‘विसुभाऊ’ झालो.
अमर दै.नागपूर- पत्रिकेतील संपादकीय विभागात काम करीत होता. त्याचे हस्ताक्षर अप्रतीम होतेच शिवाय मराठी साहित्याची त्याला प्रचंड आवड व जाण होती. दै.नागपूर पत्रिकेत माझ्या शालेय कार्यक्रमाच्या बातम्या अमरनेच प्रकाशित केल्या. एका कोजागरीला जादुगार भावसार आणि “कुटुंब रंगलंय काव्यात” या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचा नागपुरातील पहिला प्रयोग अमरनेच आयोजित केला होता. नागपूर पत्रिकेच्या गच्चीवरील माझा एकपात्री प्रयोग तुफान झाला. दुसऱ्या दिवशी अमरने दिलेल्या माझ्या कार्यक्रमाच्या बातम्या नागपूर पत्रिका व नागपूर टाइम्स मध्ये फोटो सहित झळकल्या आणि मला व माझ्या कार्यक्रमांना संपूर्ण विदर्भात प्रसिद्धी मिळाली, ती अमरमुळेच.!
सुधीर पाठक, अनिल महात्में पासून सुरेश देशपांडे, शरद देशमुख, प्रवीण बर्दापूरकर पर्यंत सगळेच जिवाभावाचे मित्र मला अमरमुळेच मिळाले. कुटुंब रंगलंय काव्यात या माझ्या एकपात्रीला “नाटक परिनिरीक्षण मंडळाचे सर्टिफिकेट” घेण्याचा सल्ला मला अमरनेच दिला होता.
अमरनेच परिचय करून दिलेल्या सुधीर पाटणकर या दूरदर्शनच्या निर्मात्याने माझा पहिला कार्यक्रम नागपूर दूरदर्शनवर आणि दुसरा कार्यक्रम मुंबई दूरदर्शनवर घेतला होता. त्या कार्यक्रमांमुळे मला व माझ्या कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली .
आज मी मुंबईत राहून संपूर्ण जगभरात माझे कार्यक्रम सादर करतो आहे. या माझ्या यशाला अमर या माझ्या लाघवी मित्राची आणि संपूर्ण महाशब्दे कुटुंबाची साथ मिळाली आहे, मिळते आहे. ‘लढ’ म्हणणारा अमरचा हात आजही माझ्या पाठीवर आहे व सदैव राहील, याची मला खात्री आहे.

– लेखन : विसुभाऊ बापट. मुंबई
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800