Thursday, February 6, 2025
Homeलेखमहामारी आणि विश्वाचा नवोदय- भाग - ५

महामारी आणि विश्वाचा नवोदय- भाग – ५

यापूर्वीच्या भागात आपण जगभरात आणि विशेषतः महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील प्लेगचे थैमान, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अस्त आणि चाफेकर बंधूंचे क्रांतिकारी पाऊल यावर चर्चा केली.

सोळाव्या शतकातील एका विचित्र साथीमुळे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील जवळपास १.५ करोड लोकसंख्येला मृत्युच्या खाईत लोटले. यापैकी बहुतांश जन समुदाय अत्यंतिक अवर्षणामुळे आधीच अशक्त झालेला होता. शरीरातील विविध अवयवप्रणालींना कमकुवत करणाऱ्या या महामारीचे नाव देखील तितकेच विलक्षण! कोकोलिझट्ली महामारी जिला कॅटॅस्ट्रोफीक असेही संबोधले जाते. काही वर्षांपूर्वी या रोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या कवटीचा डिएनए अभ्यासला गेला आणि असा निष्कर्ष निघाला की तत्कालीन बाधितांना सॅलमोनेला नावाचा जंतु संसर्ग झालेला होता ज्यामुळे ताप, टायफॉईड, अतिसार आणि जठर-आतड्या संबंधीचे आजार संभवतात. हा जंतु संसर्ग आजही जीवघेणा आहेच ज्यावर अजूनही प्रभावी आणि खात्रीशीर उपाय उपलब्ध नाही. मात्र असे असले तरीही योग्य वैद्यकीय उपचार आणि तज्ञाच्या देखरेखीखाली या संसर्गातून पुर्णतः बरे होता येते.

दोस्तांनो, ज्या अमेरिकेचे आजच्या युवा पिढीला जबरदस्त आकर्षण आहे त्याच अमेरिकेने सोळाव्या शतकात प्लेगचे पाशवी थैमान अनुभवले आहे. अमेरिकन प्लेग हा युरेशियातील साथीच्या रोगांचा असा समूह आहे जो युरोपवासीयांकडून अमेरिकेत पसरला. ज्यात चेचक अर्थात देवी रोगाने इंका आणि अझ्टेक या दोन्ही संस्कृतींचा ऱ्हास केला. काही अभ्यासकांच्या मते तर या संसर्गामुळे पश्चिम गोलार्धातील जवळजवळ ९०% जन समुदाय मृत्यूच्या काळोखात लोटला गेला. इतिहास हे देखील सांगतो की या महामारीचा फायदा झाला तो स्पॅनिश फौजेला ज्याचे नेतृत्व करीत होता हरनन् कोर्टस् ज्याने १५१९ मधे अझ्टेकवर कब्जा केला. फ्रांसिस्को पिझारो जो दुसऱ्या स्पॅनिश फौजेचे नेतृत्व करीत होता त्याने इसवीसन १५३२ मधे इंकास ताब्यात घेतले. दोन्ही प्रांतातील सैन्य संसर्गामुळे मुकाबला करू शकले नाही आणि त्यांना आपले साम्राज्य गमवावे लागले. पुढे ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगाल आणि नेदर्स नागरिकांनी पश्चिम गोलार्धात शोधास्तव भटकंती करून तो भूभाग काबीज केला आणि अधिपत्य स्थापित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या असे ध्यानात आले की संसर्ग अतिवेगाने जन समुदाय नष्ट करतो आहे आणि संसर्गाचा प्रतिकार करू पहाणाऱ्या स्थानिक जनतेला तो जीवघेणा ठरतो आहे. दोनही साम्राज्य नष्ट झाली कारण संसर्गामुळे सैन्य हतबल ठरले.

दोस्तांनो, आपली भिस्त देखील आपल्या तिन्ही दलांवर आहे. सद्यस्थितीत कोणतीही परकीय शक्ती हावी होऊ नये यासाठी प्रशासनाने निर्देशित केलेले सर्व निर्बंध आपण पाळूत. जेणेकरून निदान आपल्यावर नियंत्रणासाठी वेगळ्या व्यवस्थेची गरज भासू नये. अस्तानंतर उदय आहेच!  पुढील भागात अशाच रोचक मात्र अभ्यासपूर्ण पद्धतीने काळाचा एक पडदा उलगडून बघूत.

क्रमशः

-लेखिका : तृप्ती काळे
-संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी