लहानपणीच आई वारलेल्या, गावी बालपण गेलेल्या आणि पुढे मुंबईत चाकरमानी झालेल्या व्यक्तीचं हृद आत्म कथन...
माझा जन्म दि.१७ नोव्हेंबर १९६५ रोजी मायानगरी मुंबई मधला. माझे वडील मुंबईत मिल कामगार होते. चिंचपोकळी स्टेशन जवळच पश्चिमे कडील सातरस्ता, ऑर्थर रोड (दोन रस्त्यांच्या) मध्ये तीन मजली चाळ वजा इमारत, जी आजही अस्तित्वात आहे तिथला माझा जन्म. वडिलांची स्वतःची खोली नव्हती. आम्ही आजीच्या खोलीत राहत होतो. आजही मला आठवते मी चार वर्षाचा असेन, माझी मोठी बहीण सहा वर्षाची असेन व छोटा भाऊ सहा महिन्याचा असेन त्याच वेळी आमच्या आईचे निधन झाले. अंत्यसंस्कार होईपर्यंत आम्हाला बाजूचे शेजारी श्री मेनन कुटुंबीय यांच्याकडे ठेवण्यात आले. माझ्या आईला सख्खा भाऊ अथवा सख्खी बहीण नसल्याने आम्हाला सख्खे मामा व मावशी नव्हती. फक्त आजी होती (आईची आई ). नंतर तिच्याकडे आम्हाला सोपविण्यात आले.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/05/IMG_20210505_190114-150x150.jpg)
आम्हा तिघा भावंडांना आमच्या आजीनेच लहानाचे मोठे केले. आजी आम्हाला १९६९ मध्ये आमच्या गावी, म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा येथे घेऊन आली. वडील एकटेच मुंबईला रंगारी बदक चाळीत खाणावळीत खायचे व गावच्या मंडळाच्या खोलीवर राहायचे.
आम्ही चौघे जण आमच्या गावचे सख्खे चुलते यांच्या बरोबर राहू लागलो. त्यांच्या बरोबरीने जमेल ती कामे शेतात करू लागलो. बहीण शाळेत जाऊ लागली. मी व माझा एक चुलत भाऊ सहा वर्षाचा झालो तेव्हा आम्हा दोघांनाही गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घातले. पहिली, दुसरी इयत्ता मजेत गेली. त्याच वेळी १९७२चा दुष्काळ पडला. खायची मारामार होऊ लागली. आजी दुष्काळी कामावर जात असे. संध्याकाळी तीला सुकडी मिळे. ती खायला मिळायची. त्या वर्षा पासून शाळेत ही संध्याकाळी सुकडीच्या पुड्या मिळू लागल्या. तिसऱ्या इयत्ते पासून संध्याकाळी शाळेतून घरी आले की मला पहिला माझा व नंतर चुलत भावाचा घरचा अभ्यास पूर्ण करावा लागे. मग जनावरासाठी वैरण तोडून ठेवावी लागे. तिसरी, चौथी पूर्ण झाली. १९७५ मध्ये आमचे आजोबा (वडिलांचे वडील) वारले.
१९७६ मध्ये वडील व आमचे चुलते यांच्यात वाटण्या झाल्या. आमच्या वाटणीला गावातील जुन्या वाड्यातील घर आले व चुलत्यांना शेतातील नवीन घर आले. आम्ही चौघे जण ( आजी, बहीण, मी व भाऊ ) जुन्या घरात राहू लागलो. वडील मुंबईला असत. आमच्या वाट्याला आलेल्या शेतीत आजी काम करायची. सुट्टीच्या दिवशी आम्ही तीला मदत करायचो. संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर बहीण चुलीवर भात शिजून ठेवायची. मी शेतीत जाऊन आजीच्या डोक्यावरील सरपण आपल्या डोक्यावर घेऊन येत असे. लहान भाऊ दुधाची किटली घेत असे. रात्री आजीचे जेवण तयार करून होईपर्यंत आम्ही तिघे रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात घरचा अभ्यास पूर्ण करून घेत असे. जेऊन झोपी जात असे. सकाळी लवकर सहा वाजता उठून ग्रामपंचायतच्या सार्वजनिक नळावर पाणी भरावे लागे.
सुट्टीच्या दिवशी जनावरे चारायला घेऊन जावे लागे. आमच्या प्रमाणेच वाडीतील इतर मुलेही जनावरे घेऊन येत असत. तेव्हा आम्ही सर्वजण खेळ खेळायचो. खेळायच्या नादात जनावरे दुसऱ्याच्या शेतातील माल खायचे. आम्ही मात्र शिव्या नाहीतर मार खायचो.
उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यास नसायचा, शेतात पिके नसायची. जनावरे मोकळी सोडून द्यायची. फक्त दोन वेळेस पाणी पाजायचे एव्हढेच काम. मग डोंगराला जाऊन करवंदे, आवळे काढून खायचे, एखाद्याचे आंबे उतरायला जायचे. त्याच्या बदल्यात मिळालेले आंबे घरी घेऊन यायचे. दुपारचे कधी कधी शिवपारुंब्या खेळ खेळायचे, संध्याकाळी चिल्ली, गोट्या, विटी दांडू, आबा दाबी, लिंगोरच्या खेळ खेळायचो. सर्व लहान मुले मामाचे पत्र हरविले खेळ खेळायचे, लपंडाव खेळायचे. लपायला अडचणीच्या ठिकाणी गेल्यावर कधी कधी विंचू दंश व्हायचा. पावसाळ्यात जमीन ओली असल्याने तीर तीर खेळायचे. खोकड (भवरा) खेळ खेळायचे. चकार / सायकल टायर फिरवत पळायचे. पावसाळ्यात सुटीच्या दिवशी घरातच चिंचोके एकी बेकी नाहीतर पाणी चुळ घालणे खेळ खेळायचे.
कधी कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत मावस मामा, मावस मावशी यांच्या गावी जायचो. आम्हाला आई नसल्याने तिकडे आमचे भरपूर लाड व्हायचे. आजही वेळ मिळेल तेव्हा मी त्यांच्याकडे जातो. अथवा फोनवर संपर्क करतो.
उन्हाळ्यात रात्री बहुदा आजूबाजूचे सर्वजण बाहेर अंगणातील ओट्यावर येऊन रात्रीचे जेवण जेवायचे. कालवण, मिरची, ठेचा, पिठलं यांची देवाण घेवाण व्हायची. तेव्हा आमच्या कडे मातीच्या मडक्यात दूध, कालवण, पिठलं शिजविले जायचे. त्याची चव काय न्यारीच असायची. इर्जिकच्या दिवशी (एकाच शेतकऱ्याकडे इतर शेतकऱ्यांनी बैल व आप आपली शेतीची अवजारे घेऊन जाऊन एकाच दिवशी शेतीची संपूर्ण कामे पूर्ण करणे) त्या दिवशी ज्या शेतकऱ्याकडे इर्जिक आहे त्याने रात्री सर्वांना जेवण द्यावे लागे. पितृ पक्षात पित्राचे जेवण, दिवाळीचे फराळ, तुकाराम बीजला कौल आंबील, गूळ काला खाण्यासाठी एकमेकांच्या घरी जायला एक वेगळीच मजा होती.
उन्हाळ्यात शेतातील मांडावामध्ये झोपायला जायचो. जनावरांना वैरण घातली की आंथरुणावर येऊन झोपायचे. वर आकाशाकडे बघत राहायचे. काळ्या कुट्ट अंधारात आकाशातील चांदण्या, तारे पाहत राहायचे. सप्तर्षी, ध्रुव तारा, तिकांडे शोधून काढायचे. जो पर्यंत जनावरे वैरण खात आहेत तो पर्यंत त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा, घंटीचा आवाजाचा एक वेगळाच आनंद मिळायचा. कोणाकडे तरी दिल्ली मॉडेल रेडिओ असायचा. बिनाका गितमाला कार्यक्रम ऐकायचा. किंवा गप्पा मारायच्या. अंधाऱ्या रात्री आकाशात लाल लाईट लूक झुक करत ठराविक वेळेस उंचावरून विमान जाताना दिसायचे. त्यावरून किती वाजले अचूक टाईम कळायचा. पहाटे झुंजू मुंजू झाल्यावर गार वारा सुटे. कोणीतरी उठून जनावरांना खायला घातल्याने जनावरांच्या घुगरांच्या आवाजाने जाग येई. पुन्हा अंथरुणातून आकाश निरीक्षण चालू. आकाशातील चांदण्या लुकझुक करीत त्यांच्या घरी चालल्याचा भास व्हायचा.
वडिलांची १९७९मध्ये नजर कमजोर झाली म्हणून त्यांना सर्व्हिसचा राजीनामा द्यावा लागला. त्याच वर्षी बहिणीचे लग्न झाले. मग मात्र माझे सर्व खेळ बंद झाले. कारण शाळा सुटल्यावर आजीला घरकामात मदत, रात्री अभ्यास पूर्ण करावा लागे. सातवी, आठवी, नववीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही दोघे , मी व माझा भाऊ दररोज डोंगरावर जाऊन सरपण तोडून मोळी बांधून डोक्यावर घेऊन घरी येत असे. वर्षभर पुरेल इतके सरपण उन्हाळ्याच्या सुट्टीतच जमा करायचो. शेणाच्या गोवऱ्या थापायचो, शेणाच्या गोवऱ्या सुकल्यावर त्याचा कलोड लावायचो.
१९८२ सालीला दहावी बोर्ड परीक्षा संपल्यावर त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत खोटे वय सांगून रोजगार हमी योजनेत सडकेच्या कामावर काम केले. दहावी पास झालो. गावात तितपर्यंतच शिक्षण होते. पुढे अकरावीसाठी आमच्या गावापासून १६ कि. मी. अंतरावरील ओतूर गावी पायी चालत जावे लागले.
ओतूर गावी श्री कपर्दिकेश्वर म्हणून भगवान शंकराचे भव्य मंदिर आहे .तेथे श्रावण महिन्यात दर सोमवारी मोठी यात्रा असते. शाळेत असताना दर वर्षी तिसऱ्या सोमवारी यात्रेला पायी चालत जायची व परत यायची सवय होतीच.
पुढील शिक्षणासाठी पैसे हवेत म्हणून वडील पुन्हा नाक्यावर लोडींग / अनलोडींग काम करण्यासाठी मुंबईला आले. ते नातेवाईकांकडे राहायचे. त्यांचा खर्च भागवून मला, आजी व भावाला पैसे पाठवायचे. ओतूर येथे कॉलेजला आम्ही पाच जण मित्र मिळून खोली भाड्याने घेऊन राहायचो. माझी जेवणाची सोय श्री मुरादे म्हणून एक फॉरेस्ट कर्मचारी यांच्याकडे केली होती. त्यांना कधी पैसे दिले, कधी नाही दिले. कारण एकदा वडील लोडींग करताना टाकीवरून खाली पडले त्यांच्या पायाला मोठी जखम झाली होती. दोन तीन महिने कामावर गेले नाही. माझी खानावळ दिली गेली नाही. मी श्री मुरादे कुटुंबियांचा कायम ऋणी आहे कारण पैसे दिले नाही म्हणून त्यांनी माझे कधीही जेवण बंद केले नाही. खाणावाळीच्या पैश्यांच्या बदल्यात आम्ही त्यांना उन्हाळ्यात खळ्यावरील सर्व चारा, कडबा, वैरण, भुसा, दिला.
१९८४ला बारावीची परीक्षा दिली. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिघे जण सायकलने ११० किलोमीटर प्रवास करून शिर्डीला गेलो. साईचे दर्शन व आशीर्वाद घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सायकलने घरी पोहचलो. त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या मित्राच्या घरची विहीर खोदण्याचे काम केले. काळ्या पाषाणावर पहारीने सुरुंग घेण्याचे काम केले. हात फुटायचे. हाताला कापड बांधून काम केले. जेव्हा मी बारावी सायन्स पास झालो तेव्हा वडीलांनी पत्र पाठविले व कळविले आता मला पूर्वी सारखे काम मिळत नाही तेव्हा पुढील शिक्षण करता येणार नाही. कामधंदा करण्यासाठी मुंबईला निघून ये …………
क्रमश
– लेखन : एम. बी. आरोटे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
अंतःकरणाला भिडणारे.
पुढच्या भागाची वाट पहात आहे
खूपच हद्य निवेदन.. भावस्पर्शी