मागील भागात आपण कोकोलिझट्ली या जंतु संसर्गामुळे अझ्टेक आणि इन्का या साम्राज्यातील सैन्याची झालेली दैन्याव्यस्था आणि स्पेनने दोन्ही प्रांतावर केलेला कब्जा यावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे अमेरिकेचा उदय आणि प्लेगची साथ यावर देखील चर्चा केली.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच १७७० ते १७७२ या काळात रशियन प्लेगने डोके वर काढले होते. नागरिकांना सक्तीचे विलगीकरण, जमाव बंदी आणि इतर जाचक निर्बंधांमुळे मॉस्कोमधील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मॉस्कोमधील देवभोळ्या जनतेची थिऑटोकोस ऑफ बॉगोल्युबोवोच्या पवित्र प्रतिमेवर अफाट श्रद्धा होती. या प्रतिमेला फेरे मारले की अफाट शक्ती आणि रोगराईतून मुक्ती मिळते अशी त्यांची श्रद्धा होती. मॉस्कोचे आर्चबिशॉप अर्थातच धर्मगुरू असलेले ऍम्ब्रॉसिअस यांनी पवित्र प्रतिमेभोवती फेरे घालण्यासाठी नागरिक गर्दी करतील आणि त्यातून संसर्ग पसरेल या भीतीपोटी ती प्रतिमा गुप्तपणे हटविली ज्यामुळे जनतेत रोष निर्माण झाला आणि जमावाने ऍम्ब्रॉसिअसची हत्या केली.
ऍम्ब्रॉसिअस एक विज्ञाननिष्ठ लेखक आणि अनुवादक होते. त्यांनी मॉस्कोच्या गरिबी निर्मूलनासाठी मोलाचे योगदान दिले होते. एका महान धर्मगुरूला समाजाच्या अंधभक्तीमुळे प्राण गमवावे लागले.
रशियाची सम्राज्ञी कॅथरीन द्वितीय जी आपल्या नियोजनबद्ध दूरदर्शी निर्णयांमुळे रशियन इतिहासातील सर्वाधिक काळ राज्य करणारी एक यशस्वी महिला राज्यकर्ता ठरली, तिला देखील मॉस्कोमधील प्लेगच्या थैमानाने हताश केले होते. त्यातच मॉस्कोतील कारखाने इतरत्र हलविण्याचा तिचा निर्णय देखील जनतेच्या रोषामुळे मागे घेण्याची वेळ येऊ घातली होती.
मात्र याच दरम्यानच्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत मॉस्कोमधील जवळपास एक लक्ष लोकसंख्या मृत्यूच्या काळ्या खाईत लोटली गेली होती. त्यातच भर म्हणून की काय इसवीसन १७७३ च्या सुमारास येमेलॅन पुगाचेव नामक व्यक्ती जो स्वतःला पीटर तृतीय अर्थात साम्राज्ञीचा पती असल्याचा दावा करीत होता त्याने बंडखोरी केली ज्यात हजारो लोक मारले गेले होते.
काळाचा पडदा आणि दिशादर्शकाची सुई जराशी पुढे सरकते आणि अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे १७९३ दरम्यान यलो फिवर पसरलेला आढळतो. एवढ्या प्रगत देशाचे अधिकारी या गैरसमजात रहातात की गुलामांची रोग प्रतिकारशक्ती चांगली असते आणि त्यांना संसर्ग होणे शक्य नाही. डासांद्वारे पसरणाऱ्या या रोगाच्या निर्मूलनासाठी आफ्रिकन परिचारिकांची नियुक्ती केली जाते, मात्र तोवर पाच हजाराहून अधिक लोकसंख्येने रोगाला बळी पडून जीव गमावला.
वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे या रोगाच्या प्रादुर्भावाने इतर देशांना प्रभावित केलं आणि पाच आठवड्यात हा विषाणूजन्य तापाने रशिया आणि युरोपमधील जवळपास दहा लाख लोकांना मृत्यच्या पडद्याआड लोटले.
इसवीसन १९१६ मधे न्यूयॉर्क शहरामधे पसरलेल्या पोलिओच्या साथीने अमेरिकेतील जवळपास २७००० व्यक्ती बाधित झाल्या आणि ६००० जण मृत्युमुखी पडले. पोलिओसारख्या बऱ्याच रोगांवर प्रभावी लस तयार करण्यात आली. मात्र आयुष्यभराचे अपंगत्व देणाऱ्या या संसर्गाला वैश्विक पातळीवर आळा घालायला मात्र जवळपास एका शतकाचा कालावधी लागला.
यामागे कारण असं की स्वास्थ्याबाबतीत असलेली अनास्था आणि अंधश्रद्धा. महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘दो बुंद जिंदगी के!’ या पोलिओ अभियानातील ब्रीदवाक्याने प्रभावी कार्य केले आणि भारत पोलिओचे निर्मूलन करण्यात यशस्वी ठरला. दोस्तांनो, या तीन ऐतिहासिक घटना आपल्याला बरंच काही शिकवून जातात.
विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ही काळाची गरज आहे. आंधळी भक्ती आपल्या सोबत इतरांचं देखील नुकसान करू शकते. आजचे निर्बंध आपल्या भल्यासाठीच आहेत त्यामुळे ते आपण कटाक्षाने पाळूत. हे देखील लक्षात आलेच असेल की नोकर-मालक, श्रीमंत-गरीब हा फाजील भेदभाव महामारीच्या काळात किती महागडा ठरतो ! आणि हो कोरोनावर प्रशासनाने उपलब्ध केलेली लस घेण्यासाठी कोणत्याही महानायकाच्या अपिलाची वाट बघू नका. आपल्या वयोगटानुसार आपणास लस उपलब्ध होईल तेव्हा सर्व निकष पाळून स्वतःचे लसीकरण करून घ्या. अशीच अभ्यासपूर्ण माहिती आणि रोचक तथ्ये पुढल्या भागात बघू या.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/05/IMG-20210515-WA0012-150x150.jpg)
क्रमश…
– लेखन : तृप्ती काळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800