अहेरीच्या शाळांत मी ‘ओंकार काव्य दर्शन’ ह्या माझ्या शालेय कार्यक्रमाचे प्रयोग सादर करीत फिरत असताना तेथील रसिकांच्या बरोबर घरी भेटी-गाठी भोजन गप्पा वगैरे चालूच होते. एकदिवस डोर्ले साहेबांच्या (डीएफ्ओ, आलापल्ली) घरी बसलेलो असताना साहेब मला म्हणाले, “विसुभाऊ, आमच्या आलापल्ली भागात वन विभागाच्या चार-पाच वसाहती आहेत. तेथे आमचे कांहीं आर एफ्ओ आणि त्यांचे सहकारी कामगार राहून तिथल्या जंगलात काम करीत असतात. त्या आमच्या कर्मचारी वर्गाला कसलेच मनोरंजन मिळत नाही. त्यांच्या साठी तुम्ही तुमचा ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ एकपात्री कार्यक्रम सादर करायला जाणार कां ? तुमची सर्व व्यवस्था मी स्वतः करून देतो.!” डोर्ले सरांच्या या प्रस्तावाला मी होकार दिला.
अहेरीचे कार्यक्रम करून मी वन विभागाच्या वसाहती मधील कार्यक्रम सुरू केलें. जिमलगट्टा आणि तीन वसाहतीत (बाकी इतर वसाहतींची नावे आठवत नाहीत.) माझे एकपात्री प्रयोग यशस्वीपणे सादर करून मी ‘तोंदेल’ येथील वसाहतीत पोहोचलो.. त्रिनागरे आणि परदेशी या तिथल्या आरएफ्ओनी माझे स्वागत केले व त्यांच्या रेस्ट हाऊसवर माझी रहायची व्यवस्थाही केली.
तोंदेल ला ‘ओपन जेल’ होते आणि जन्मठेपेची शिक्षा भोगणारेच तिथे कामगार म्हणून काम करीत होते. ते दिवस तसे उन्हाळ्याचे होते, ऊन तापू लागले होते. त्यामुळे रात्री पाण्याच्या शोधात त्या जंगलातले वाघ वसाहतीतील विहिरीवर पाणी पिण्यासाठी वरचेवर येत असतात, अशी माहिती मला त्रिनागरे सरांनी दिली. तोपर्यंत मी जंगलातला वाघ पाहिला नव्हता, तो पाहण्याची इच्छा मी सरांना बोलूनही दाखवली.
दिवसभराच्या विश्रांती नंतर रात्री नऊ वाजता मी कार्यक्रम सादर करण्यासाठी हॉलवर पोहोचलो. तबलावादकाने तबला सुरात लावून दोन टेबलावर व्यवस्था करून घेतली. हळूहळू रसिक प्रेक्षक जमू लागले. साधारण दहाच्या सुमारास मी कार्यक्रम सुरू केला. हॉल खेरीज सगळ्या वातावरणात शांतता होती. माझा कार्यक्रम साधारणपणे पाऊण तास झाला असेल तेंव्हा मागे बसलेली कांहीं तरूण मंडळी कार्यक्रमातून उठून गेली. मी थोडा अस्वस्थ झालो आणि थोड्याच वेळात मध्यंतर केला. पाहतो तर उठून गेलेली मंडळी परत आली होती. मी जरा चौकशी करताच त्यातील कांहीं तरूण म्हणाले, ‘विहिरीवर वाघ आला होता, आम्हीं पहायला जाताच तो निघूनही गेला.!’ ‘अरे मलाही वाघ पहायचा होता, कार्यक्रम थांबवून मी पण तुमच्याबरोबर तो पहायला आलो असतो!’ असे मी त्यांच्याशी बोललो आणि मध्यंतरानंतरचा कार्यक्रम पुन्हा सुरू केला.
समोरचे रसिक दाद देत असल्याने तिथून पुढे मी अडीच तास कार्यक्रम सादर केला. नंतर आभार प्रदर्शन वगैरे सोपस्कार झाले आणि कार्यक्रम संपताच सर्व मंडळी घरी निघून गेली. रेस्ट हाऊस वरच चार आरएफ्ओ व त्यांचे मोजके सहकारी यांच्या समवेत आम्ही एकत्र जेवण केले. नंतर गप्पांच्या ओघात त्रिनागरे साहेब म्हणाले, ‘विसुभाऊ, वाघ नुकताच येऊन गेला असल्याने आत्ता जवळपास असू शकतो. तुम्हाला तो पाहायचा असेल तर आत्ता जंगलात फिरून बघायचं कां? तुमची तयारी असेल तर जाऊया.!’
मी तयारी दर्शवताच चार साहेबांच्या चार मोटार-सायकली सज्ज झाल्या. परदेशी साहेबांच्या मागे मी बसलो, तर बाकी तीन गाड्यांवर मागे तीघेजण सर्चलाईट घेऊन बसले. पुढे दोन गाड्या मध्ये आमची गाडी आणि मागे एक गाडी अशा थाटात आमची जंगल सफारी सुरू झाली. मागे पुढे सर्चलाईट चालू झाले आणि आम्हाला ससा आडवा गेला. ‘ससा दिसला म्हणजे आसपास वाघ दिसणार नाही, हा जंगलातला आमचा अनुभव आहे. तरीही आपण फिरून वाघ दिसतो कां ते बघूया.’ असे म्हणत आमची जंगल सफारी सुरूच राहिली. जवळजवळ दोन तास आम्ही तिथले जंगल फिरलो पण वाघ कांहीं दिसला नाही. जंगल सफारी करून आम्ही रेस्ट हाऊसवर परतलो तेंव्हा पहाटेचे चार वाजून गेले होते. त्यावेळी मला वाघ पहायला मिळाला नाही पण पहाटेच्या वेळी जंगल सफारीचा थरारक अनुभव मी घेतला, तो अनुभव मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.
क्रमशः
– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट.
(सादरकर्ते- कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मस्त 👌👌👌 वाघ 🐯🐅 तर नाही ससा तरी 🐰 पाहिला ना 🐇 आनंद मिळाला हे महत्वाचा छान 👍👍