माणसाचं येणं जाणं काही आपल्या हातात नाही. कोणास कधी कोठे कसे बोलावणे येईल हे ही सांगता येत नाही. मध्यंतरी असेच माझ्या जवळच्या मैत्रीणीचे वडील गेले म्हणून मी तिला भेटायला गेले. इथे राहून भारतात जर आपली जवळची व्यक्ती गेली तर काय प्रसंग ओढवतो याची मला चांगलीच कल्पना आहे. अर्थातच भेटल्यावर ती मला बिलगली आणि तिचाही बांध फुटला. मी आपली शांतपणे तिचा आवेग कमी होण्यासाठी ओल्या डोळ्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवित राहीले. अशा वेळी शब्दांची नाही तर कुणीतरी मायेनं आपल्या पाठीवरून हात फिरवावा आपलं दुःख समजून घ्याव याची नितांत आवश्यक्ता असते.
परदेशी असलेल्या मंडळीना अशी बातमी आली की एक तर तडकाफडकी निघता येत नाही. निघालो तरी आमच्यासारख्यांना यायला कमीतकमी २/३ दिवस जातात.
इतका वेळ भारतामधे ते पार्थिव ठेवणं शक्य नसतं, घरातल्या इतर लोकांचाही विचार करावा लागतो. आपण अशा प्रसंगी आपल्या जीवलगांबरोबर नाही याची खंतही मनाला बोचत असते. पण या साऱ्यावर मूकपणे सारे सहन करणे यापलिकडे इलाज नसतो. इथल्या मित्रमंडळींना कळल्यावर लगेचच जसे जमेल तसे ते ही येतात पण भारतात व परदेशात गोष्टी खूप वेगळ्या पडतात.
इथे कसलेच वातावरण नसल्याने ती व्यक्ती गेली आहे हे मन मानायला तयार होत नाही. खूप रडावसं वाटतं पण ती जाणीवच होत नाही. हल्ली सोय असल्याने तो अंतिम प्रवास व्हीडीओद्वारे पाहता येतो पण ते अतिशय दुःखद व प्रचंड गिल्ट आणणारे ठरते. आपल्या जवळच्या व्यक्तीला विशेषतः आई अथवा वडील एकदा तरी डोळेभरून पहावं अस खूप वाटतं. सर्वच बाजूने कुचंबणा होते.
परदेशातले पुष्कळ लोक आठवड्यातून एकदाच नियम केल्याप्रमाणे आपल्या आई वडीलांशी फोनवर बोलतात. जणु टी.व्ही. चा प्रोग्रॅम असावा तसे. पण आत्ताच सांगितलेल्या पाश्र्वभूमीप्रमाणे अस कृत्रीमपणे वेळ ठरवून बोलण्यापेक्षा उत्सफूर्तपणे मनाला वाटेल तेव्हा बोललं पाहीजे. अंतरानी जरी माणसे लांब असली तरी आवाजामधे एवढे सामर्थ्य आहे की बोलल्याने अंतर पार मिटून जाते. विशेषतः ७०/७५ च्या पुढच्या लोकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत हे जाणवून द्यायचं असेल तर शक्य तितक्या वेळा त्यांच्याशी सपर्कात राहीलं पाहीजे. मला विचारणारं कुणीतरी आहे हा विचारच दिलासा आणि उभारी देणारा ठरतो.
आणखी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे सांत्वन करायला आलेली माणसे नकळत तेच तेच पुन्हा विचारतात. आपल्यावर आलेल्या प्रसंगाची कहाणी सांगत बसतात. त्याने काय साध्य होतं ? मान्य आहे आपली जखम कोणाला तरी सांगावी असे वाटत असते पण समोरचा माणूस त्याच प्रसंगातून जातोय हे कळत असताना हे कटाक्षाने टाळलं पाहीजे. माझ्या मैत्रीणीला भेटायला आलेल्या वयस्कर बाईंची एक गोष्ट मला फार आवडली.
त्या म्हणाल्या, तुझ्या वडीलांच्या चांगल्या गोष्टी सांग. तुला त्यांच काय आवडायचं ते सांग. सुरवातीला तीने रडत रडत सांगायला सुरवात केली पण नंतर चक्क ती त्या आठवणीत रमली. काही काळ का होईना थोडीशी दुःखी विचारातून बाहेर आली. जे तिच्या दृष्टीने फार महत्वाचं होत. असा सूज्ञ विचार जर भेटायला आलेले सर्वच लोक करतील तर खरंच बर होईल.
सरतेशेवटी एव्हढच सांगावसं वाटतं देश काय किंवा परदेश काय भावभावना त्याच असतात. समोरच्याचा सहानुभूतीनं विचार करायची सवय आपण लावून घेतली पाहीजे. होता होईल तो माणसांशी बोललं पाहीजे. शेवटी पाठीवरून मायेनं फिरणाऱ्या हाताची, मायेनं येणाऱ्या कढाची सर so sorry to hear about the demise of so and so … etc. या मेसेजेस मधून येत नाही.
माणसाला गरज असते सच्च्या माणसाची. तिथे मग मान मरातब, पैसा या गोष्टी गळून पडतात. श्रीमंत असो वा गरीब दुःख आणि आतला माणूस सारखाच असतो.
– लेखन : शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छानच लिहीलयंस
धन्यवाद दिपाली !
छान लिहिले. वेळापत्रकप्रमाणे फोनवर बोलण्यापेक्षा अनपेक्षित वेळेत मधून मधून फोनवर आत्मीयतेने बोलणे हे छान सुचविले आहे. त्यावंग प्रमाणे गेलेल्या वक्ती सोबत भूतकाळात आतरल्या फक्त चांगल्या अनुभवांबद्दल विचारणे हे छान सुचविले आहे…
धन्यवाद श्रीकांतजी.
लेखनातील शिल्पाचे विचार खूपच प्रगल्भ वाटले.दुःखी अवस्थेत मायेने पाठीवरून हात फिरविणारे लोक थोडे असतात. सर्व विचार अगदी मनाला पटणारे.
धन्यवाद अरूणाताई !
अगदी हृदयाला भिडले लिखाण. अशा प्रसंगातून जाणे किती कठीण असते हे जेव्हा माणूस त्या क्षणाला पोचतो तेव्हाच कळते. आपण म्हटल्याप्रमाणे त्या काकूंसारखे सुज्ञपणे सगळेच वागले तर दुःखातून बाहेर पडायला प्रत्येकाला मदत होईल.
धन्यवाद तनुजा !