भारतातील अतिशय प्राचीन देवभाषा संस्कृतच्या गर्भातून प्रकटून प्राकृत व पुढे मराठीत स्थिरावलेल्या हृद्य वृत्त-छंदांची, पूर्वापार मायबोलीत रुजलेल्या नादमधुर पद्यरचनेची पुरेशी जाण नसलेल्यानी मुक्त-छंदाच्या नांवावर सर्रासपणे गद्य तद्वतच सुरेश भटांसारखी सालंकृत मराठी गझल लिहिण्याऐवजी ‘पझल’ चा पोरखेळ मांडला आहे. तशात (वर्तमान संगीतकारांनी आखून दिलेल्या ‘डडडडा’ चाकोरीत कोंबलेली अथवा कुडमुड्या ‘गझलगों’च्या गळ्यातून निघणारी तकलादू शब्दरचना म्हणजेच गीत वा गझल असा काही हौशी शब्दजुळव्यांचा गैरसमज झालाय !
अशा नवागतांना मूलभूत मराठी गेय कवितेकडे वळवून तिचा जीर्णोध्दार करण्याच्या सद्हेतूने इंदूर येथील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार श्री श्रीकृष्ण बेडेकर यांच्या ‘पत्र-सारांश प्रतिष्ठान‘ सांस्कृतिक संस्थेने एक अभिनव उपक्रम हाती घेतलाय.
तो म्हणजे, जो कवी वा जी कवयित्री मूलभूत मराठी वृत्त-छंदांशी इमान राखून, १०-१५ ओळीतील दोन वेगवेगळ्या वृत्त-छंदांत सुचलेल्या लयबध्द, शास्त्रशुध्द कविता टाईप करून, ई-पत्ता shrikrishn.bedekar@ gmail.com वर PDF फाईल पाठवेल, तसेच त्यांच्या अनुभवंत परीक्षकांच्या चिकित्सक निर्णयानुसार जो कवी वा जी कवयित्री या पुरस्कारास पात्र ठरेल त्या विजेत्याच्या बँक खात्यात आगामी विश्व कविता दिनास (२१ ऑगस्ट २०२२) पत्र सारांश प्रतिष्ठान, इंदूरतर्फे कालीदास वृत्त- छंद संवर्धन पुरस्काराची रक्कम रु.५०००/- जमा होईल.
इतकेच नव्हे; तर विजेत्यास ‘पत्र-सारांश प्रतिष्ठान‘ च्या वतीने एक सुंदर प्रशस्ति-पत्रही पाठवले जाईल.
तरी या स्पर्धेत अधिकाधिक कवी/कवयित्रीनी भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
– टीम एनएसटी. 9869484800