Thursday, February 6, 2025
Homeसाहित्यमाझं जीवन- भाग - २

माझं जीवन- भाग – २

– मायानगरीत परत –
दि. ४ जुन १९८४ रोजी बारावीचा निकाल लागला. आमच्या पाच रूममेट पैकी फक्त मी एकटाच पास झालो. पास झालो म्हणजे क्लास वगैरे न लावता नुसताच पास झालो. ४५% मार्क्स मिळाले. बाकीचे माझे रूममेट नापास झाले. त्यामुळे खुप वाईट वाटले.

पुढे वडिलांच्या सांगण्यावरून मी कॉलेजला रामराम ठोकला. मित्रांनी, मात्र सायन्स सोडून आर्ट्स शाखेत प्रवेश घेऊन पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून बी एड केले. आज ते सर्वजण शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक, सुपरवायजर, मुख्याध्यापक म्हणून यशस्वी काम करत आहेत.

दि.१४ जुन १९८४ रोजी दहावी, बारावी, मार्कशीट, कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट पावसाने भिजू नये म्हणून एका प्लास्टिक पिशवीत व दोन ड्रेस एका कापडी पिशवीत व दोन्हीही पिशव्या एका शबनममध्ये कोंबून घाटकोपरला राहणाऱ्या एका गाववाल्याबरोबर एसटीने मुंबईला निघालो. सुदैवाने खिडकीची जागा मिळाली. तब्बल १५ वर्षांनी पुन्हा एकदा मी मायानगरीत पाऊल ठेवणार होतो.

गावावरून येताना प्रथमच माळशेज घाटातील पाऊस आणि पावसाळ्यातील मनमोहक नजारा पाहिला. थंडगार वारा, प्रचंड धुके, जोराचा पाऊस, उंच डोंगरावरून रस्त्यावर कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे दुपारी २ वाजताही दाटलेला अंधार व प्रचंड धुक्यामुळे लाईट लावून संथ गतीने चालणारी वाहने प्रथमच पाहत होतो. सर्व गाड्या ढगातून चालल्यासारखा भास होत होता.

माळशेज घाट संपला. पाऊस चालूच होता. मनात विचार चालू झाले. माझा लहान भाऊ व आजी एकटे कसे राहतील? मायानगरी मुंबईत आपल्याला नोकरी मिळेल का? राहायचे कुठे? जे मिळेल ते काम करायचे असे मनोमन ठरवून टाकले.

सायंकाळी ७ वाजता कल्याणला पोहचलो. गाववाल्याने त्याची बॅग माझ्याकडे दिली मला एका ठिकाणी उभे केले व ते रेल्वेचे तिकीट काढायला गेले. गर्दी जास्त असल्याने तिकीट मिळायला वेळ लागला. रात्री ८ वाजता रेल्वे पकडून घाटकोपरला पोहोचलो. पाऊस पडतच होता. त्यांच्या घरी रात्रीचे जेवण केले. गाववाल्याने रात्री वडिलांनी दिलेल्या पत्त्यावर वडिलांकडे मला सुखरूप पोहोच केले. मी त्यांचे आभार मानले.

दुसऱ्या दिवशी सकाळी वडील मला विक्रोळी टागोरनगरला माझ्या बहिणीकडे घेऊन गेले. माझी काही दिवस माझ्या बहिणीकडे राहण्याची सोय केली. बहिणीची रूम, छोटीच हौसिंग बोर्डची १२ बाय १२ ची पार्टीशन करून दोन भाग केलेली सेल्फ कंटेन्ट रूम होती. संध्याकाळी माझे भावोजी कामावरून घरी आले. ते बॉम्बे टेलिफोन्स माटुंगा टेलिफोन एक्सेंज मध्ये टेक्निशियन म्हणून काम करत होते. आल्यावर चहापाणी झाल्यावर माझी मार्कशीट बघितली आणि सांगितले आजच १५ जुन १९८४ रोजी बॉम्बे टेलिफोन मध्ये शॉर्ट ड्युटी टेलिफोन ऑपरेटरच्या भरती साठी ऍड आली आहे. उद्याच अर्ज करून टाक. मी ईश्वराचे मनोमन आभार मानले. व दुसऱ्याच दिवशी अर्ज भरून टाकला. आठ दिवस असेच गेले.

भावोजीचा लहान भाऊ पण गावावरून मुंबईला आला होता . भावोजीनी आम्हा दोघांना विक्रोळी ते व्हिटी रेल्वेचा पास काढून दिला. जेवण झाल्यावर घरी थांबायचे नाही. रेल्वेने व्हिटी पर्यंत जायचे. दररोज एक एक ठिकाणी फिरायचे. मुंबईची माहिती झाली पाहिजे, अशी सक्त ताकीद दिली.

प्रथम दिवशी भायखळा राणीचा बाग बघितला. दुसऱ्या दिवशी गेट वे ऑफ इंडिया बघितला, तिसऱ्या दिवशी भावोजीच्या माटुंगा ऑफिसला गेलो. असे दररोज कुठेना कुठे फिरलो. पंधरा दिवस कसे गेले कळलेच नाही.
एक दिवस मी वडिलांना म्हणालो मला एकदा चिंचपोकळीला जन्म ठिकाणी घेऊन चला. एके रविवारी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास वडील मला त्या जुन्या ठिकाणी घेऊन गेले. चौकशी अंती श्री मेनन कुटुंबीय तेथेच राहतात असे समजले. आम्ही दोघे त्यांच्या घरी गेलो. बऱ्याच वर्षांनी गेलो असलो तरी त्यांनी माझ्या वडिलांना बरोबर ओळखले. घरात घेतले. चहा नास्ता पाणी दिला. जुन्या आठवणी निघाल्या. बोलण्याच्या ओघात त्यांनी माझ्याबद्दल विचारले. वडिलांनी सांगितले हा माझा मोठा मुलगा. कामधंद्या निमित्त मुंबईला आला आहे. मेनन आजीने लगेच माझे नाव घेतले. मला जाणवले किती शार्प स्मृती होती त्यांची. बऱ्याच वेळ गप्पा झाल्यावर आम्ही निघालो. निरोप देताना मेनन आजी हसून म्हणाल्या वेळ मिळेल तेव्हा येत जा आमच्याकडे.

जुलै १९८४च्या पहिल्याच आठवड्यात भावोजी म्हणाले, आमच्या ऑफिसमधील एक कॅज्युअल लेबर बऱ्याच दिवसापासून गैरहजर आहे. त्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी साहेबांनी कोणी आहे का म्हणून विचारले आहे. ते काम करण्याची तुझी तयारी आहे का? मी ताबडतोब हो म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी मी भावोजी बरोबर माटुंगा टेलिफोन एक्सेंज मध्ये गेलो. हुसेन नावाचे जे ई साहेब होते. भावोजी मला त्यांच्याकडे घेऊन गेले. हुसेन साहेबांनी मला सांगितले सकाळी ७ वाजता येऊन ऑफिस मध्ये झाडू मारायचा, साफसफाई करायची, फिनेल टाकून ऑफिस, एक्सेंज पुसून घ्यायचे हे काम आहे. करणार का? गावावरून येताना निश्चय केलेलाच होता. जे मिळेल ते काम करायचे. मी हो म्हणालो. त्याच दिवसा पासून मी कामाला सुरुवात केली. कामात कधीही कसूर केली नाही.

तीन महिन्यानंतर हुसेन साहेबांना कळले कि, मी १२ वी पास आहे. त्यांनी मला बोलावून स्टोरमध्ये काम करायला सांगितले. जेमतेम पाच महिने काम केले असेल नसेल तोच सरकारी ऑर्डर आली. मार्च १९८४ नंतर ज्यांना कामावर ठेवले आहे त्या स्टाफला त्वरित काढून टाकावे. जुलै ते नोव्हेंबर फक्त पाच महिने काम केले व पहिला ब्रेक मिळाला.

लेखक : श्री. मोहन अरोटे.

क्रमश ….
– लेखन : मोहन आरोटे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी