स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार -:
स्मृतीकाळात मनुने केलेल्या स्त्रीच्या वचनाने स्त्रीला केवळ रक्षणीय बनविले नाही, तर तिचे अवमूल्यन केले. तसेच स्त्री ही दुबळी, परावलंबी, अप्रेमी , चंचल, व्यभिचारी , पुरुषाला मोहात पाडणारी व पृथ्वीच्या उत्पत्ती पासून काम, क्रोध, निंदा दोषादी गुणांनी युक्त व म्हणून वेदोक्त संस्कारास अपात्र आहे. परंतु ती
रती सुखासाठी व संततीसाठी आवश्यक म्हणून तिच्यावर निगराणी ठेवून जन्मभर तिचे रक्षण करावे, असे वर्णन केलेले आहे .
म्हणजे स्त्रीला केवळ देहमूल्यच उरले. ती पुरुषाची एक भोगवस्तू बनली. मनुच्या या स्त्रीच्या प्रतिमेचा वचनाचा पगडा पिढ्या्नपिढ्या् कायम राहिला. विवाह हा एकमेव वैदिक संस्कार स्त्रीसाठी शिल्लक राहिला. वेदाभ्यास ,वेदमंत्र तिला त्याज्य ठरले. यादवकाळात तर मनुवचनांचा फारच अतिरेक झाल्याचे दिसून येते. स्त्रीचे सर्वच स्थितीतील जीवन शास्त्रवचनांनी व रूढीपरंपरांनी बांधले गेले. यादवकाळातील स्त्रीचे जीवन रूढीबद्ध अशा बालविवाह, कुमारीजरठ विवाह, हुंडा, सती, वैधव्य , केशवपन या अनिष्ट रूढींना बळी पडलेले होते. अतिशय अपमानास्पद असुरक्षित आणि बंदिस्त असे जीवन तिच्या वाट्याला आले होते. अशा विषम परिस्थितीत महाराष्ट्रात महानुभाव संप्रदायाने स्त्रीविषयी उदारतेचा दृष्टिकोन स्वीकारला.
श्रीचक्रधर स्वामींनी स्त्रियांना भक्तीचा , ज्ञानाचा व मोक्षाचा अधिकार असून हा अधिकार प्रदान करण्याचा क्रांतीकारी विचार देऊन तो आचरणातही आणला . स्त्रियांना सक्षम, स्वावलंबी ,विद्वान चर्चक, जिज्ञासू बनविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला . “का हो तुमचे जीव आहेत आणि स्त्रियांच्या का जीवलिया आहेत ?” “तुमचे काय दुसरा देव रक्षण करतो आणि यांचे काय दुसरा देव रक्षण करतो?” म्हणून सारंगपंडितांना प्रश्न विचारून स्त्रियांचा कैवार घेणारे व स्त्रियांना आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात समानत्वाचा अधिकार देणारे स्वामी स्त्री- स्वातंत्र्याचा विचार करण्यामध्ये अग्रणी व्यक्ती ठरतात . यावरून स्त्रियांना समान अधिकार देणारा महाराष्ट्रातील हा पहिलाच संप्रदाय म्हणावा लागेल.
“धर्मामुळे स्त्रियांचे रक्षण होते” हे अतिशय महत्त्वाचे तत्व स्त्रियांना समजावून सांगून लज्जा रूप धर्माचे पालन करण्याचा आदेश दिला. प्रापंचिक स्त्रियांना सुद्धा उपकारक शिकवण दिली.
“बाई स्त्रीचे पाच गुरु असतात माता- पिता, सासू-सासरा आणि पती या पाचांचे म्हणणे ऐकले तर प्रेम मिळते”. हा स्वामींचा उपदेश स्त्रियांच्या विकासास उपयुक्त असाच आहे . “पुरुषांपेक्षा स्त्रिया प्रेमळ असतात. “मातेचे प्रेम ते नैसर्गिक असते”. असा स्त्रीच्या मातृत्वाचा यथोचित गौरव करून पुरुषांपेक्षा स्नेहाच्या, ममतेच्या बाबतीत स्वामींनी स्त्रियांना श्रेष्ठत्व प्रदान केल्याचे दिसून येते.
क्रमशः
– लेखन : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800