लोकमान्य टिळक यांची जयंती आज आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख…
लोकमान्य टिळक म्हणजे लोकांनी मान्यता दिलेलं एक प्रखर – परखड असं जहालमतवादी व्यक्तिमत्व. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क, आणि ते मी मिळवणारच” असे ठणकावून सांगण्याचं धारिष्ट्य कोणी दाखवलं असेल, तर ते लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळकांनी ! अशा महान देशभक्ताचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला अन् जणू भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य उदयास आला.
टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत तर, आईचे पार्वतीबाई. सत्यभामाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. रामराव टिळक अन् श्रीधर टिळक हे त्यांचे द्वय सुपुत्र. गंगाधरराव यांची रत्नागिरीत प्रख्यात संस्कृत शिक्षक म्हणून ख्याती होती.
शिक्षणाच्या बाबतीत बोलायचे झालं तर, लोकमान्य टिळक बालपणापासुनच बुद्धिमान होते. गणित हा त्यांचा आवडता विषय होता. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील एका अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूलमध्ये झाले. तर डेक्कन कॉलेजमध्ये टिळकांनी बी.ए.पदवी संस्कृत, गणित विषयात संपादन केली. १८८२ मध्ये त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून एल.एल.बी. ची पदवी संपादन केली.
पुण्याला शिकत असतानाच त्यांच्या मनात ब्रिटिश राजवटीविरुद्ध असंतोष धुमसत होता. तो असंतोष त्यांनी आपल्या वृत्तपत्रांतून भारतीय जनतेपर्यंत पोहोचविला. आणि ते “भारतीय असंतोषाचे जनक” ठरले. सर्वधर्मीय भारतीयांना त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी उद्युक्त केलं. लोकशिक्षण अन् जनजागृती हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी शिव जयंती व गणेशोत्सव हे उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करण्याची प्रथा सुरू केली.
भारतीयांच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित व्हावी, या उद्देशाने टिळकांनी गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या सहकार्याने १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली.
१८९६ चा भीषण दुष्काळ अन् त्या पाठोपाठ प्लेगची साथ पसरली असता, ब्रिटिश सरकारने दोन्ही आपत्तींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं. त्यामुळे तेव्हा असंख्य लोक मृत्युमुखी पडले. परिणामी टिळकांचा राग अनावर झाला. त्यांनी “उजाडले पण सूर्य कोठे आहे ?” “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?” ; “राज्य करणं म्हणजे सूड उगविणे नव्हे” या मथळ्यांचे अग्रलेख लिहिले. इंग्रज सरकारविरुद्ध आपत्तीजनक लिखाण केल्याने राजद्रोहच्या गुन्हाखाली टिळकांना मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.तथापि, कारावासात कैद्यासारखे जीवन जगण्यास पसंदी न देता, टिळकांनी तेथे गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. वेळेचा सदुपयोग कसा करावा, ही गोष्ट यातून लोकांना शिकण्यासारखी आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल टिळकांना नितांत आदर होता. महापुरुषांचे स्मरण करणं, हे राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे, हा विचार त्यांनी सर्वधर्मीय लोकांना दिला. या पार्श्वभूमीवर टिळकांनी १५ एप्रिल १८९६ रोजी पहिला शिव जयंती महोत्सव रायगडावर मोठ्या थाटामाटात साजरा केला. शिव छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या महान कामगिरीची माहिती जनतेला व्हावी, या उद्देशाने हा उत्सव केवळ पुण्यातच नव्हे तर, महाराष्ट्रासह साऱ्या देशात साजरा करण्यास त्यांनी चालना दिली. टिळक हे शिवरायांचे पाईक होते, हे यावरून दृष्टोत्पत्तीस येते.
टिळकांनी स्वराज्य व स्वदेशीचा अंगिकार तर, विदेशी वस्तूंचा बहिष्कार या त्रिसूत्रांचे महत्व भारतीयांच्या मनात बिंबविले. आणि त्यातून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जनआंदोलनाची उभारणी केली. cherity begins at home या म्हणीनुसार टिळक हे आपल्या वृत्तपत्रांच्या छपाईसाठी स्वदेशी कागदाचा वापर करत. यालाच खऱ्या अर्थाने जाज्वल्य राष्ट्रप्रेम अन् निस्सिम देशाभिमान म्हणतात.
टिळकांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल,फर्ग्युसन कॉलेज अन् डेक्कन एज्युकेशन सोसायटीची निर्मिती केली. जेणेकरून समाजातील सर्व जाती- धर्मातील लोकांच्या पाल्यांच्या शिक्षणाची सोय होईल.
टिळक हे भारतीय स्वातंत्र्याचे जनक म्हटले गेले. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी टिळकांनी दिलेल्या बहुमूल्य योगदानाच्या आधारावर महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे निर्माते या शब्दात गौरविले, तर पंडित नेहरूंनी त्यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक म्हणून संबोधिले.अशा महान कार्यकर्तृत्वामुळे टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आद्य नेते म्हणून जनमानसात गणले गेले.
विशेष म्हणजे लोकमान्य टिळक यांचा नातू, श्रीधर टिळक यांचे सुपुत्र स्व.जयंतराव टिळक हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सलग १६ वर्षे सभापती होते.
तर पणतू श्री दीपक टिळक हे केसरीचे संपादक आहेत. टिळक परिवाराच्या रोमा-रोमात देशभक्ती भिनली आहे.
भारतीय असंतोषाचे जनक, महान देशभक्त वंदनीय लोकमान्य टिळक यांना जयंती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली !

– लेखन : रणवीर राजपूत. ठाणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खुप सुंदर माहिती टिळकांन विषयीचा आदर आणखी वाढला !!!
🌹लोकमान्य टिळक हे महान पुरुष होते. आपण सुंदर शब्दात सविस्तर विचार मांडले आहेत.
धन्यवाद 🌹🌹