भारत आणि पाकिस्तान दरम्यान कारगिल-द्रास सेक्टरमध्ये लढले गेलेले चौथे युद्ध मे ते जुलै असे तीन महिने चालले होते. आजच्याच दिवशी २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते.
६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या युद्धामध्ये भारताचे ५२७ जवान शहीद झाले. १९६५ आणि १९७१ पेक्षा या युध्दाचे स्वरुप वेगळे होते. या दोन्ही युद्धामध्ये भारतीय सैन्य सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते. पण कारगिल युद्धाच्या वेळी भारताने आपल्या हद्दीत राहून पाकिस्तानी सैन्याने बळकावलेली ठाणी आणि भूप्रदेश पुन्हा ताब्यात घेतला.
कारगिल युद्धामध्ये भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता सर्वोच्च पराक्रम दाखवला, ज्यामुळे शत्रू फक्त चीत झाला नाही तर, त्याला तिथून पळ काढावा लागला. या लढाईत तोलोलिंग आणि टायगर हिलवरील ताब्यानंतर कारगिल युद्धाचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने वळले. चार जुलैला भारताने टायगर हिलवर ताबा मिळवला. हा पाकिस्तानसाठी रणनितीक आणि मानसिक दृष्टया मोठा धक्का होता.
कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिल-द्रास सेक्टर आणि नवी दिल्लीत कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
या दिवशी इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती येथे पंतप्रधान शहीद जवानांना आदरांजली वाहतात.

– लेखन : संजीव वेलणकर. पुणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800