खासदार शांतारामजी पोटदुखे, बाबासाहेब वासाडे, विलासराव मुत्तेमवार यांसारख्या त्यावेळच्या दिग्गज राजकारणी रसिकांचा व माझा दृढ परिचय चंद्रपूर – गडचिरोली जिल्हा पत्रकार संघामुळेच झाला. या सर्व मंडळींनी त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये ‘ओंकार काव्य दर्शन’ या माझ्या शालेय कार्यक्रमांचे आयोजन तर केलेच शिवाय त्यांच्याशी संलग्न असलेल्या संस्थांमध्ये ‘कुटुंब रंगलंय काव्यात‘ या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचे आयोजनही केले होते, हे विशेष.!
‘चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेतील’ माझा एकपात्री प्रयोग सुरेश देशपांडेच्या आग्रहामुळे बाबासाहेब वासाडे यांनी आयोजित केला होता तर वडसा-देसाईगंज येथील एका कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माझा एकपात्री प्रयोग विलास मुत्तेमवार यांनी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी मी व सुरेश तिथे पोहोचलो. खास कलाकारांची व्यवस्था व्हावी म्हणून असलेल्या तिथल्या एकमेव लॉजवर आमची रहायची व्यवस्था केलेली होती.
लॉजच्या बाजूलाच असलेल्या घरात, सुरेशचे सासू-सासरे (सौ.पुष्पा व केशवराव धुळधुळे) ‘झाडी-पट्टी रंगभूमीचा’ सीझन सुरू झाला की नागपूर वरून येऊन रहात असत. सुरेश मला त्यांच्या घरी घेऊन गेला व माझी ओळखही करून दिली. (झाडी-पट्टी रंगभूमीवर एक लेख नंतर लिहिणार आहेच.) वडसा-देसाईगंज जवळच्या विसोरा गावचे कलाप्रेमी व बांबू पेंटिंग करणारे कलाकार श्री.धनंजय नाकाडे (सुरेशचे मित्र) आम्हाला भेटायला लॉजवर आले आणि आम्ही मुत्तेमवार यांच्याकडे कार्यक्रम सादर करण्यासाठी ठरल्या वेळी पेंडॉलमध्ये गेलो.
कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पेंडॉलमध्ये मोठी गर्दी केली होती. विलासरावांनी आमचा परिचय करून दिला. मला तबल्यावर साथ देत होते तिथल्या रंगभूमीचे कलाकार गुलाम सूफी ! ऐनवेळी बसूनसुद्धा सूफी यांच्या उत्कृष्ठ तबला साथीमुळे त्यादिवशी माझा प्रयोग इतका रंगला की दोन तास कसे गेले, हे कुणालाच समजले नाही.
कार्यक्रमानंतर निरोप घेताना नाकाडे आम्हाला म्हणाले, ‘येत्या शनिवार-रविवार प्रकाश आमटे यांनी आदिवासी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात स्वतः बाबा आमटे सर्व आदिवासींना संबोधित करणार आहेत आणि ‘चिपको आंदोलनाचा’ शुभारंभही करणार आहेत. या मेळाव्याला आपण सगळे जाऊया. एक वेगळा अनुभव घेता येईल.!’
फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या शनिवार-रविवारी हेमलकसा येथील आदिवासी मेळाव्याला आम्ही जायचे ठरवले होतेच ! त्यामुळे आम्ही तातडीने चंद्रपूर गाठले. डीएफ्ओ मित्र सुरेश केळकर, पत्रकार मित्र भास्कर भट व मोहन धनकर यांनी ‘लोक-बिरादरी प्रकल्प, भामरागड-हेमलकसा’ येथील आदिवासी मेळाव्याला जायची तयारीही केली होती. ‘आम्ही तिथल्या तयारी साठी पुढे जातोय, तुम्ही शुक्रवारी सायंकाळपर्यंत तिथे पोहोचा. रोज सकाळी १० वा. आलापल्ली वरून हेमलकसा जाणारी एसटी महामंडळाची एकमेव बस आहे, त्या बसने या.!’ असे सांगून ते सारे दोन दिवस आधीच पुढे निघून गेले. मित्र धनंजय विसोऱ्यावरून परस्पर तिकडे जाणार होतोच.! मी आणि सुरेशने शुक्रवारीच तिकडे निघायचे ठरवले.
(हेमलकसा येथील आदिवासी मेळावा, बाबा आमटे यांनी चिपको आंदोलनासाठी केलेले आवाहन जाणून घेण्यासाठी पुढील लेख क्र. ३४ अवश्य वाचा.)
क्रमशः
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2022/05/IMG_20220513_144254-150x150.jpg)
– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट. मुंबई.
(सादरकर्ते- ‘कुटुंब रंगलंय काव्यात’)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800