Wednesday, February 5, 2025
Homeसाहित्यपुस्तक परीक्षण : दुसऱ्या पिढीचे आत्मकथन

पुस्तक परीक्षण : दुसऱ्या पिढीचे आत्मकथन

मुंबई मराठी साहित्य संघाने १९७५ साली ‘एका पिढीचे आत्मकथन’ हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यात अठ्ठावीस लेखकांचं आत्मकथन होतं. त्यानंतर २००८ साली म्हणजेच ३३ वर्षांनी ‘दुसऱ्या पिढीचे आत्मकथन’ हे पुस्तक प्रसिद्ध केले.

पहिले वाचनात आले नसले तरी दुसऱ्या पिढीतील १९४५ ते २००८ या साठ वर्षाच्या काळातील ३७ लेखकाचे आत्मकथन त्यात आहे. या दुसऱ्या पिढीतल्या लेखकात कथा, कादंबरी लेखकापासून कवी, नाटककार, निबंधकार, संपादक, पत्रकार, समीक्षक, संशोधक, भाषा शास्त्रज्ञ, संगीततज्ञ यांचा समावेश आहे. साहित्यिकांच्या या पिढीनेही मराठी साहित्याला अतिशय मौल्यवान देणगी दिली आहे.

या ग्रंथात माजी आमदार, प्रा ग.प्र प्रधान, सदानंद भटकळ, के.ज.पुरोहित, गंगाधर गाडगीळ, म.श्री. दीक्षित, स.ह.देशपांडे, गोविंद तळवलकर, रा.अ. कुंभोजकर, ज्योत्स्ना देवधर, रवींद्र पिंगे, अर्जुनवाडकर, नारायण सुर्वे, हातकणंगलेकर,
शंकर वैद्य, सरिता पदकी, प्रल्हाद वडेर, मंगेश पाडगावकर, शिरीष पै, यू.म.पठाण, रा.चिं.ढेरे, द.पं जोशी, मधु मंगेश कर्णिक, माधवी देसाई, विजया राजाध्यक्ष, रोहिणी कुलकर्णी, आनंद यादव, सुभाष भेंडे, ग्रेस, विद्या बाळ, पानतवणे, रा.ग.जाधव, अशोक रानडे, राजेंद्र बनहट्टी, रत्नाकर मतकरी, रा.रं.बोराडे., भा.ल.भोळे, शेषराव मोरे यांनी आपले आत्मकथन अत्यंत निरलसपणे, मनमोकळेपणाने लिहिलेले आहे.

जीवनात फार पुढे आल्यानंतर मागे पडलेल्या आयुष्याचा मागोवा घेतला आहे. आपले लेखन, यशापयश, पुरस्कार, राहून गेलेले प्रकल्प, लहान पणापासून आपल्यावर झालेले संस्कार आणि
या संस्काराचे आपल्या लेखनात उमटलेले पडसाद, लेखनकाळातील आजुबाजूची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, परिस्थिती, आणि तिचे आपल्या लेखनावर झालेले परिणाम, आपल्या लेखामुळे उठलेली वादळे, आपला झालेला गौरव किंवा क्वचित प्रसंगी स्वतः वर अन्याय झाल्याची भावना, वाचकापर्यंत आपले विचार पोहचू शकले किंवा नाहीत याबद्दलचे समाधान, किंवा असमाधान, अशा विविध द्रुष्टीकोनातून स्वतः ची मनोगते या ग्रंथात जेष्ठ व श्रेष्ठ साहित्यिकांनी मांडली आहे ती अत्यंत ह्रुद्य आहेत.

विशेष म्हणजे बालपणाच्या प्रारंभीच्या काळात यातील बहुतेक लेखकांच्या घरची परिस्थिती अतिशय सामान्य व लेखनाला अनुकूल नव्हती. आजुबाजूचे वातावरण प्रतिकूल होते. अशात या सर्वांनी अखंड वाचनातून, अभ्यासातून आणि परिश्रमाने जे स्वतःला घडविले आणि नवनवीन साहित्य क्रुतीला कसा जन्म दिला त्याचे अनोखे दर्शन या अनुभव कथनातून होते म्हणून हे पुस्तक रसिक व डोळस वाचकांना निश्चितच मोलाचे वाटेल.

पण माझ्या अल्पमते या पिढीतील अनेक मान्यवर साहित्यिक राहून गेलेले दिसून येत आहेत. या सर्वच साहित्यिक मंडळींच्या जीवन व प्रतिभाविष्कार आणि कल्पना शक्तीविषयी सामान्य वाचकाला जे कुतहूल असते ते या ग्रंथात प्रकटपणे दिसून येईल असे वाटते.

या ग्रंथाच्या संपादक उज्ज्वला मेहेंदळे आणि त्यांच्या समितीतील उषा तांबे, अनुपमा उजगरे, अशोक बेंडखळे, आणि मोनिका गजेंद्रगडकर या सर्वांनी अनेक अडथळ्यातून मार्ग काढून केलेल्या अथक परिश्रमाचे कौतुक केलेच पाहजे.

सुधाकर तोरणे

– लेखन : सुधाकर तोरणे.
निव्रुत्त माहिती संचालक, नाशिक.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी