नमस्कार 🙏
“ओठावरलं गाणं ” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. प्रेमाची भाषा आणि प्रेम भावना मनात निर्माण झाली की मग ते प्रेम धर्म पहात नाही. अशीच तारूण्य सुलभ प्रेम भावना या गाण्यातील तरूणीच्या मनात निर्माण झाली आहे. शब्दप्रभू ग.दि. माडगूळकर यांनीही या तरूणीच्या मनाची अवस्था ज्या गाण्यातून सांगितली आहे त्या गाण्याचे शब्द आहेत-
“राजहंस सांगतो किर्तीच्या तुझ्या कथा
ह्रदयी प्रीत जागते जाणता अजाणता”
माझ्या मनीचा हंस तुझ्या किर्तीच्या कथा सारखा मला ऐकवत असतो आणि तुझी किर्ती ऐकून तुझं व्यक्तीमत्व माझ्या डोळ्यासमोर मी कल्पनेनं उभं केलं आणि आपला जोडीदार ही असाच असावा असंच तुझ्या चित्राकडे पाहिलं की मला वाटायचं. हळूहळू माझ्याही नकळत मी तुझ्यावर प्रेम करायला लागले. तुझं चित्र जेंव्हा जेंव्हा मी पहाते तेंव्हा तेंव्हा तुझ्या विषयीचं प्रेम कळत नकळत माझ्या ह्रदयात फुलत रहातं. स्वतःच्याही कळत नकळत फुलणाऱ्या या प्रीतीचं वर्णन गदिमांनी “ह्रदयी प्रीत जागते जाणता अजाणता” या शब्दातून केलं आहे.
पाहिले तुला न मी तरीही नित्य पाहते
लाजूनी मनोमनी उगीच धुंद राहते
ठाऊका न मजसी जरी निषद देश कोणता
तू कसा दिसतोस ते मला ठाऊक नाही पण तुझी किर्ती ऐकून तुझं रूबाबदार व्यक्तीमत्व मी माझ्या मनात उभं केलं आणि तुला अजुन पाहिलेलं नसूनही “तूच माझ्या स्वप्नातला राजकुमार आहेस” हे मनाशी पक्कं ठरवून मी तुझ्या प्रेमात पडले. माझी ही अवस्था मी आईलाही सांगू शकत नाही किंवा कुणा मैत्रीणी जवळही बोलू शकत नाही. पण तुला सांगते, तुझ्यावर जडलेल्या माझ्या प्रेमामुळे मी कधी कधी स्वतःशीच लाजते, हसते, कधी कधी प्रेमाची ही धुंदी मनाचा इतका ताबा घेते कि कुणीतरी विचारलेल्या प्रश्नाला मी भलतंच काहीतरी उत्तर देते आणि मग सावरून घेता घेता माझी फटफजिती होते. तुला अजूनही मी पाहिलेलं नाही, तू खरंच किती रूबाबदार दिसतोस, कुठे रहातोस हे काही ठाऊक नसतानाही तुझ्यावरील प्रेमामुळे जर माझी अशी अवस्था होते आहे तर प्रत्यक्ष आपली भेट होईल तेंव्हा माझी काय अवस्था होईल तेच मला समजत नाहीये.
दिवसरात्र ओढणी या मनास लागते
तुझीच जाहल्या परी मी सदैव वागते
मैत्रीणीस सांगते तुझी अमोल योग्यता
मी जरी तुला अजून एकदाही पाहिलेलं नसलं तरी मी जसं तुझं चित्र माझ्या मनाशी रंगवलं आहे अगदी तस्साच तू असणार याची मला खात्री आहे. रात्रंदिवस मला फक्त तुला पहाण्याची ओढ लागून राहिली आहे, तुझ्या भेटीची आस लागून राहिली आहे. आपण दोघं लांब कुठेतरी फिरायला गेलो आहोत आणि तुझ्या बरोबरीनं मी जणू काही सप्तपदीच तुझ्या सोबत चालते असं स्वप्न मी सारखं पहात असते आणि ते पूर्ण होणार याची मला पूर्ण खात्री आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे जरी मी माझ्या मैत्रिणींना बोलले नसले तरी तुझा मोठेपणा, तुला मिळणारा मानसन्मान, तुझी योग्यता याबद्दल मी इतकं भरभरून बोलत असते की माझ्या प्रेमाबद्दल वेगळं काही सांगायची गरजच नाही.
निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
नाद चित्र रेखितो तुझेच मंद कूजनी
वेड वाढवून तो उडून जाय मागुता
तुझ्या किर्तीचा राजहंस मी न बोलावताच माझ्या मनाच्या सज्जात येऊन बसतो आणि तुझं असं काही चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं करतो की जणूकाही तूच त्या चित्रातून माझ्या कानाशी गुंजन करतो आहेस असा भास मला होत रहातो. म्हणूनच तुझी किर्ती ऐकून तू कसा दिसत असशील याची कल्पना करून माझ्या मनाने रेखाटलेल्या या चित्राला मी “नाद चित्र” असं नाव ठेवलं आहे. तासनतास मग मी फक्त तुझ्या चित्राकडे पहात रहाते; नव्हे मनाला तोच एक चाळा लावून हा हंस हळूच अदृश्य होतो. माझं तुझ्यावर जडलेलं हे एकतर्फी प्रेम तुझ्यापर्यंत कसं पोचवायचं हाच एक विचार फक्त माझ्या मनात रुंजी घालत असतो.
ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी, सुवासिनी चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आशा भोसले यांनी आपल्या जादुई आवाजाने रेडिओच्या काळात प्रसिध्दीच्या शिखरावर नेऊन ठेवलं होतं.
– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छान रसग्रहण.
धन्यवाद विराग 🙏
धन्यवाद 🙏
गाण्यांची निवड योग्य. प्रेमात पडलेल्या तरुणीच्या मनाची अवस्था माडगुळकर यांनी उत्तम प्रकारे वर्णन केली आहे. अशा भोसले यांनी त्यांच्या सुरेल आवाजांनी त्यात जान आणली आहे. आपण गाण्याचं केलेलं रसग्रहण नेहमीप्रमाणे उत्तम झाले आहे.