Thursday, September 18, 2025
Homeसेवाराष्ट्रप्रेमी गुरुकृपा

राष्ट्रप्रेमी गुरुकृपा

नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची आणि स्वतःच्या कर्तव्यांची भावना निर्माण व्हावी, ती सतत वाढती रहावी या मुख्य उद्देशाने १९९४ मध्ये, गुढीपाडव्याला गुरुकृपा संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून, अखंडपणे गुरुकृपा कार्य करीत आहे.

वयाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये व्यक्तीची वेगवेगळी गरज असते. सोबतच व्यक्तीने आपले जीवन निसर्गाला पूरक अशा पद्धतीने जगणे आवश्यक असते. याचा तपशीलवार विचार करूनच गुरुकृपा संस्थेच्या कार्याची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.

गुरुकृपा संस्था चालवत असलेल्या समाजोपयोगी प्रकल्पांमागे सुसंस्कृत बाल, सशक्त युवा, समाधानी वृद्ध, निरोगी मानव, मजबूत मन, एकसंध समाज आणि समृद्ध पर्यावरण ही सप्तसूत्री आहे. त्याला अनुसरूनच, संस्थेचे अध्यक्ष श्री पंकजनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची निश्चित दिशेने वाटचाल सुरू आहे.

नाथमहाराज यांचा जगातल्या प्रमुख धर्मांविषयी गाढा व्यासंग आहे. सामाजिक सुधारणांविषयी त्यांचा सखोल अभ्यास आहे. आधुनिक विज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान यांची डोळस समीक्षा करून, त्यापैंकी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला काय उपयुक्त आहे, याचा विचार ते सतत करतात. जनसामान्यांच्या कल्याणासाठी, त्यांना कमीत कमी वेळ, पैसा आणि शक्ती खर्च करून ह्या साऱ्याचा कसा उपयोग करून घेता येईल, याविषयी संशोधन करतात.

अगदी लहान वयापासूनच मुलांवर चांगले संस्कार व्हावेत आणि त्यांना सुजाण नागरिकत्वाचे बाळकडू लाभावे, यासाठी गुरुकृपा संस्था पुढीलप्रमाणे उपक्रम राबवित असते.

सुभाषा अभियान
आजची बरीच कोवळी मुले जे काही बोलतात त्यामध्ये अपशब्द, शिव्या यांचा भरणा वाढलेला आहे. भले त्या शिव्यांचा अर्थ न कां कळेना, पण ठसक्यात शिवी द्यायची प्रवृत्ती मुलांमध्ये रूढ होऊ होत आहे. या समाज विघातक सवयीला आळा घालण्यासाठी संस्थेने ‘सुभाषा अभियान‘ सुरू केले आहे. या अभियानात नेहमी चांगले बोलण्याचे महत्त्व मुलांच्या मनावर बिंबवले जाते आणि त्यांच्या तोंडातले अपशब्द, शिव्या कमी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

सुभाषा अभियान

या उपक्रमाचा परिणाम इतका चांगला आहे, की शाळा पुन्हांपुन्हां हा कार्यक्रम ठेवत असतात. या उपक्रमात बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका प्रा. मृदुला कर्णी यांचा विशेष सहभाग आहे.

चला मैदानाकडे
‘सशक्त युवा’ प्रकल्पांतर्गत हा उपक्रम चालवला जातो. या उपक्रमात, मुलांनी मोबाईल, टीव्ही यांचा अतिरिक्त वापर टाळावा आणि मैदानावर खेळावे, व्यायाम करावा, डोंगर-किल्ले चढावेत, निसर्गात बागडावं ; यासाठी एका अनोख्या पद्धतीने मुलांचे प्रबोधन केले जाते. प्रख्यात गिर्यारोहक श्री. विश्राम कुलकर्णी यांनी सह्याद्रीच्या काळ्याकभिन्न डोंगर-दऱ्यांपासून ते अगदी हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत उदंड गिर्यारोहण केलेले आहे. त्या भ्रमणादरम्यान त्यांनी स्वतः काढलेल्या सुंदर फोटोंच्या स्लाइड्स् दाखवून त्या सफरीमधून प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव मुलांना सांगण्यात येतो. या कार्यक्रमामुळे ही मुले मोबाईल व टीव्हीच्या आभासी जगातून बाहेर पडून उंच गिरिशिखरांवर जाण्यासाठी उद्युक्त होतात. खरंतर हा कार्यक्रम मोठ्यांसाठीसुद्धा उपयुक्त आहे, असा अभिप्राय अनेकांनी दिलेला आहे, हे विशेष.

चला मैदानाकडे

सैनिक-नागरिक मैत्री अभियान
सैनिक आणि नागरिक यांच्यातली जवळीक वाढावी, सैनिकांचा त्याग आणि बलिदानाची जाणीव लहान वयातच मुलांना व्हावी, आणि सैनिकांमधली शिस्त बालक आणि पालक या दोघांनीही आत्मसात् करावी; यासाठी हे अभियान चालवले जाते. ‘आपला सैनिक, आपला व्हॅलेंटाईन’ ही कल्पना घेऊन हा उपक्रम चालवला जातो जेणेकरून नागरिकांच्या मनावर हे ठसावं, की सैनिक हेच आपले खरे व्हॅलेंटाईन आहेत, जे आपल्यासाठी अक्षरशः जीव ओवाळून टाकायला तयार असतात. तसेच ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या नावाखाली चालणारे विपरीत प्रकार कमी व्हावेत, हाही एक उद्देश आहे.

सैनिक-नागरिक मैत्री अभियान

सुगम संस्कृत अभियान
संस्कृत या भाषेमध्ये प्रचंड ज्ञानभांडार दडलेले आहे. ते सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी आणि मुळातच संस्कृत भाषेची गोडी सर्वांना लागावी यासाठी सुभाषिते व अन्य माध्यमांतून संस्कृतचा प्रचार आणि प्रसार केला जातो.

हिम्मत का तराना
जुनी अर्थपूर्ण गाणी, शेरोशायरी आणि कविता यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा ‘हिम्मत का तराना‘ हा गुरुकृपा संस्थेचा एक ठोस प्रयत्न आहे. मानवी मनात दाटलेले नैराश्य व उदासीनतेचे मळभ दूर करण्यासाठी हा कार्यक्रम विविध ठिकाणी, विशेषतः वृद्धाश्रमांमध्ये सादर केला जातो. त्याचे अतिशय उत्तम परिणाम दिसत आहेत.

सप्तपदी
सध्या आपण पाहतो, की नवरा-बायकोतले वाद, भांडण, दुरावा आणि घटस्फोट ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्थेवर आणि विशेषतः लहान मुलांवर होत असणारे भयंकर परिणाम यांना आळा घालण्यासाठी गुरुकृपा संस्था ‘लग्नानंतरची सप्तपदी’ हा सेमिनार सार्वजनिकरित्या आयोजित करते. यामध्ये वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा विचार करून पती-पत्नीने एकमेकांमधला जिव्हाळा कसा वाढवावा आणि टिकवून ठेवावा यासाठी भारतीय संस्कृतीला अनुसरून आणि मानसशास्त्रीय, वैद्यकीय, व्यावहारिक, समाजशास्त्रीय तसेच धार्मिक दृष्टीकोनातून सांगोपांग विवेचन केले जाते. या सेमिनारचा श्रोत्यांच्या मनात खोलवर परिणाम होतो.

तंबाखू विरोधी अभियान
हे अभियान सशक्त युवा प्रकल्पांतर्गत चालवले जाते. यामध्ये तंबाखू , सिगरेटपासून युवकांनी दूर राहावे म्हणून शॉर्ट-फिल्म, नाटक, बॅनर्स, स्टीकर्स, पोस्टर्स, पत्रके अशा विविध माध्यमांचा वेगवेगळ्या वयोगटांनुसार परिणामकारक वापर केला जातो. लहान वयातच मुलांच्या मनात तंबाखूविषयी तिटकारा निर्माण व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न केला जातो. शॉर्ट-फिल्मच्या सिडीचे शाळा-कॉलेजांमध्ये मोफत वितरण केले जाते.

शाकाहार
अन्नामधूनच शरीराची बरीचशी वाढ होत असल्याने, गुरुकृपा संस्था शाकाहाराचा पुरस्कार करते. मात्र यामध्ये कुणावरही सक्ती न करता शाकाहाराचे फायदे आणि मांसाहाराचे तोटे हे समजावून दिले जातात. त्याशिवाय ‘चवीने नॉन-व्हेज पण शुद्ध शाकाहारी ‘ हे श्रीमती आशालता वाघमोडे यांचे पाककृतींचे पुस्तक गुरुकृपा संस्थेने प्रकाशित केले आहे. हे पुस्तक मांसाहाराचा त्याग करून शाकाहारी बनू पाहणाऱ्यांना नक्कीच एक मदतीचा हात ठरत आहे.

वनौषधी संशोधन
आयुर्वेद आणि वनौषधी यांच्यावर गुरुकृपा संस्था दीर्घकाळापासून व्यापक संशोधन करीत आहे. मानवी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी या गोष्टी अत्यंत उपयुक्त आहेत.

गुरुकृपा वनौषधी संशोधन
या उपक्रमात रूग्णाच्या प्रकृतीची गहन चिकित्सा करून व्यक्तिनुरूप वनौषधी , आहार-विहार व अन्य माध्यमांतून उपचार केले जातात. त्यातून रूग्ण सहजगत्या व्याधिमुक्त होतो. या पद्धतीने बहुतेक सर्व आजार नष्ट होऊ शकतात, आणि निरोगी, निरामय, निकोप जीवन जगता येते.

समृद्ध पर्यावरण
या प्रकल्पांतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण करून ती रोपे व्यवस्थित वाढावीत, याची काळजी घेतली जाते. तसेच ओला कचरा घरीच जिरवून कंपोस्ट खत तयार करणे, सण साजरे करताना त्यातला धार्मिक आशय न गमावता पर्यावरणाचे संतुलन सांभाळणे, प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाक्यांना विरोध इत्यादी अनेक उपक्रमांमधून पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

प्रकाशन
गुरुकृपा संस्थेतर्फे अनेक लोकोपयोगी विषयांवर तसेच वैदिक ज्ञानावर मूलगामी संशोधन केले जाते. त्यातील निवडक भाग हा जनजागृती व ज्ञानप्रसार या हेतूने छोट्या छोट्या सामाजिक व धार्मिक पुस्तकांमधून प्रकाशित केला जातो . आजवर अशी पुष्कळशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि कित्येक वाचकांपर्यंत पोहोचली आहेत. त्याचा जनसामान्यांना आपल्या दैनंदिन जीवनाला सुकर करण्यामध्ये व ते सावरण्यामध्ये अतिशय मोलाचा उपयोग होत असतो .

रक्तदान
गुरुकृपा संस्थेमार्फत रक्तदानासाठी शिबिरे आयोजित केली जातात. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना रक्त मिळावे, यासाठी प्रयत्न केला जातो. तसेच रक्तदान करण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या संपर्क याद्या तयार केल्या जातात. रक्तदानाविषयीचे गैरसमज दूर व्हावेत, आणि नवीन रक्तदाते तयार व्हावेत, यासाठी रक्तदान या विषयावरील पुस्तकाचे गेली अनेक वर्षे संस्था प्रकाशन करून विनाशुल्क वितरण करीत आहे.

नेत्रदान
नेत्रदान करण्यासाठी प्रचार केला जातो. त्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचे तत्संबंधीचे इच्छापत्र तयार करून घेतले जाते. नेत्रदानाविषयीचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातात. परिचितांपैकी कोणाचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांचे समुपदेशन केले जाते आणि मृत व्यक्तीचे नेत्रदान करवून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

समुपदेशन
हल्ली आपण पाहतो , की आपले आरोग्य, आपले आयुष्य, आपले अर्थकारण इत्यादींसंबंधी मानसिक ताणतणाव वाढलेले आहेत. घरच्या माणसांशी मोकळ्या मनाने बोलण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. अशा व्यक्तींचे संस्थेचा प्रशिक्षित कार्यकर्ता दूरध्वनीवर संभाषण करून समुपदेशन करतो आणि त्यांच्यामध्ये जीवनाविषयीची सकारात्मकता वाढवण्याचा प्रयत्न करतो.

सज्जन संपर्क अभियान
असं दिसतं की जगामध्ये वाईट वागणुकीची माणसं कमी आहेत. पण सर्वसाधारण माणसांची स्वतःपुरते पाहण्याची, संकुचित प्रवृत्ती आसुरी वृत्तीला शक्तिमान तसेच चांगल्या माणसांना कमजोर बनवण्यास अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरत असते. त्यामुळे सज्जनांचा परस्पर संपर्क वाढावा, त्यांचे सामर्थ्य वाढावे आणि आपापले अहंकार, मतभेद, अभिनिवेश बाजूला ठेवून त्यांनी जगाच्या भल्यासाठी एकत्रितपणे कार्य करावे, यासाठी गुरुकृपा संस्था सज्जन संपर्क अभियान चालवते.

गुरुकृपा संस्थेचे पुणे कार्यवाह, श्री प्रशांत थोरात म्हणतात, “खरी गरज आहे, ती समाजातल्या सर्व घटकांनी हे काम आपलं स्वतःचं आहे, त्यामध्ये आपलंच हित आहे, आपल्याच पुढच्या पिढीचं कल्याण आहे, हे‌ समजून घेण्याची. हे जर लक्षात घेतलं तर गुरूकृपा संस्था करीत असलेल्या कार्याला समाजातील प्रत्येकजण मनापासून भरीव सहकार्य दिल्याशिवाय राहणार नाही. मग तो स्वतःचा वेळ, अनुभव, ज्ञान, जागा, अथवा आर्थिक सहयोग अशा कुठल्याही माध्यमातून का असेना” !

गुरुकृपा संस्थेची मूळची चौकट कायम राखून अनेक उपक्रम यांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात. हे उपक्रम जर मोठ्या प्रमाणात चालवता आले, तर संपूर्ण मानव जातीसाठी वरदान ठरतील आणि सद्यस्थितीत लक्षणीय सुधारणा निश्चितपणे होऊ शकेल.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

12 COMMENTS

  1. गुरुकृपा संस्थेचे किंमत करताना हा कार्यक्रम मी पाहिला आहे संस्थेचे कामकाज खूपच कौतुकास्पद आहे आज कोकण आहे.
    कलियुगात सुद्धा समाजासाठी अविरत श्रम करणारे संस्था व व्यक्ती आहेत म्हणूनच समाज जीवन सुखी व समृद्ध आहे .आपल्या संस्थेला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

  2. मानव व निसर्ग आधारित व माणुसकीचे सर्व पैलू संभाळताना सामाजिक कार्याची विकसित दिशा गुरुकृपामुळे लक्षात येते अत्यंत निस्वार्थ व निष्ठेने काम करणारे श्री प्रशांत थोरात यांच्यामुळे गुरुकृपा संस्थेशी संपर्क झाला आजच्या लेखामुळे समग्र गुरुकृपेची चौकट व चौकटीतील लवचिकता लक्षात आले

    • मनापासून धन्यवाद, अश्विनीताई…!
      आपल्याला मिळून अजून अशी बरीच कामं करायची आहेत…!

  3. खुपचं सुंदर ,,गुरुकृपा ,,सुस्थ ,,👌👌👌👌

    • मनापासून धन्यवाद, आशाताई…! गुरुकृपा संस्थेचे कार्य हे तुमचं आमचं सर्वांचंच आहे . तुम्हांला जर यात कुठल्याही प्रकारे सहभाग द्यावासा वाटला तर, किंवा एरवीसुद्धा अवश्य संपर्क साधू शकता …
      … प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
      9921447007

  4. देवेंद्रजी…….. खुपचं सुंदर शब्दांकन करून गुरूकृपा संस्थेचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केलेत. चपखल शब्द व मुद्देसूद लिखाण हे आपले वैशिष्ट्य आहे. आपल्या या लेखनामार्फत सामाजिक कार्य वृध्दिंगत होण्यास नक्कीच मदत होईल यात तिळमात्र शंका नाही. गुरूकृपा संस्थेच्या वतीने आपले खुप खुप धन्यवाद. विश्राम (संजू) व शुभांगी कुलकर्णी, पुणे.

  5. वाह देवेंद्र जी…!
    खूपच सुंदर…!
    गुरुकृपा संस्थेच्या कार्याला तुम्ही इतकं चांगलं कव्हरेज दिलं आहे ; की आता हे काम चांगल्याच गतीने घोडदौड करेल , असं वाटतंय.
    मनापासून धन्यवाद…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा