निरोप समारंभ म्हटले की सहसा आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो सेवा निवृत्तीच्या वेळचा समारंभ !
नोकरीतून निवृत्त होताना बरोबरच्या सहकाऱ्यांनी आपल्याला शेवटच्या दिवशी दिलेला निरोप. हा निरोपाचा समारंभ काही आगळा वेगळाच असतो. सर्वांची ह्रदये त्यावेळेस हेलावून गेलेली असतात, आपला एक सहकारी उद्यापासून कामाच्या ठिकाणी आपल्याबरोबर नसणार म्हणून.
तसे पाहायला गेले तर निरोपाचे म्हणजेच निरोप द्यायचे व निरोप घ्यायचे याचे अनेकविध प्रकार आहेत. मुख्य म्हणजे आपण एकमेकांना टाटा, बाय बाय करून हात हलवण्यामध्येही किती विविधता?
अगदी रोजच्या जीवनात ही आपण कितीतरी वेळा ही देवाण घेवाण करत असतो. अगदी मूल शाळेत जायला लागल्यापासून याची जी सुरुवात होते ती अगदी शेवटपर्यंत संपत नाही. किंबहुना, प्रत्येक वेळी कुठेही जाता येताना आपण अगदी सवयीने याचा स्वीकार करतो. थोड्या वेळा करता असो अगर खूप जास्त दिवसांचा विरह असो, त्या त्या वेळी आपण थोडेसे भावनावश तरी नक्कीच होतो.
शाळेचा पहिला दिवस म्हणजे त्या बालकांसाठी त्यांच्या जीवनात केवढी मोठी उलथापालथ असते. अगदी प्रथमच काही काळाकरीता का होईना, पण त्याला त्याच्या आईपासून दूर जायचे असते. यामध्ये नुसते ते बालकच नव्हे तर त्याच्या मातेच्या हृदयातही प्रचंड कालवाकालव निर्माण होत असते. नंतर मात्र सवयीने दोघेही या गोष्टीला सरावतात. परंतु, तरीही त्यांच्या हाताने करण्याच्या टाटा, बाय बाय मध्ये मात्र काहीही फरक पडत नाही.
शाळेत जाताना, ऑफिसला जाताना, काही कामासाठी बाहेर जाताना, परगावी जाताना, अगदी मित्रांबरोबर पिकनिकला जाताना, नातेवाईकांकडे जाताना, एखाद्या समारंभासाठी जाताना, कुठेही, अगदी कोणाही कडे, कशाही साठी जाताना, म्हणजेच घरातून बाहेर पडताना सवयीने आपला हात हलतोच आणि याची आपल्याला एवढी सवय होऊन गेलेली असते की कधीतरी, घाई गडबडीत जाताना घरातील कुणी आपल्याला न सांगता बाहेर गेले की अगदी चुकचुकल्या सारखे होते. आणि परत आल्यावर त्या व्यक्तीला त्याचा जाबही विचारला जातो. तेव्हाच मनाचे समाधान होते, अशासाठी की परत त्या व्यक्तीकडून अशी चूक होणार नाही.
खूप दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणी देखील जेव्हा निघायची वेळ येते, तेव्हा आपोआपच त्यांचे निरोप घेण्याचे क्षण लांबले जातात. एकमेकींना परत परत लवकरच भेटण्याचे आश्वासन देऊन अगदी एकमेकांचे हात पकडतच त्या निरोप घेतात. माहेरी गेलेल्या मुलीला जेव्हा परत घरी निघायची वेळ होते तेव्हा तिचे मन देखील भरून येत असते. पाय माहेरच्या उंबरठ्यावरून निघता निघत नाही. परगावी असलेल्या आपल्या आप्तेष्टांना जेव्हा आपल्या घरातून परत निघायची वेळ येते, तेव्हा अगदी जड अंतःकरणाने आपण हात हलवायचे देखील विसरून जातो. भरून आलेले डोळे आपल्याला परत परत विरहाची जाणीव करून देत असतात.
परंतु, तरीही एक गोष्ट मात्र निश्चितच आहे की, जिकडे विरहाचे दुःख आहे तिकडेच परत मिलनाचे अपार सुख आहे. व्याकुळतेपायी जाणवणारी विलगीकरणाची व्यथा प्रत्येक वेळी पुनर्मिलनाचा अनोखा आनंद भरभरून देत असते. यामुळेच डोळ्यांत अश्रू तर ओठांवर हसू हेच दृश्य बहुतेक वेळा निरोपाच्या देवाण घेवाण प्रसंगी असते. खूप लिहून झाले. आता मीही आपला निरोप घेते !
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/04/IMG_20210429_155517-150x150.jpg)
– लेखन : मानसी लाड.
-संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800