दिवा मांगल्याचे प्रतिक आहे. काल झालेली दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते.
या निमित्ताने कल्याण येथील शाळेत झालेल्या सुंदर कार्यक्रमाचा हा वृत्तांत…..
दीप आमावस्या मोठ्या उत्साहात साजरी झाली. संस्कारक्षम वय असणाऱ्या आपल्या लहान विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची सणावारांची
ओळख व्हावी तसेच ते कशा पद्धतीने साजरे केले जातात हे माहित व्हावे यासाठी विविध प्रकारचे सण आणि उत्सव हे लहानग्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण (प) संचलित, नूतन ज्ञान मंदिर, कल्याण (पू) शाळेतील पूर्व प्राथमिक विद्या मंदिर या
शाळेत अतिशय उत्स्फूर्तपणे साजरे केले जातात. शाळेत असे सण, उत्सव साजरे केल्यामुळे मुलांना आनंद तर मिळतोच, त्याच बरोबर ते का साजरे केले जातात हे ही कळते.
या परंपरे प्रमाणे शाळेत काल दीप आमावस्या मोठ्या उत्साहात साजरी झाली.
घरात दररोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावून “शुभं करोति कल्याणम्” म्हणून घरातील वडीलधार्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यां पिढ्या चालत आला आहे. आता आधुनिक जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो. कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि मनाला ही सुखद, पवित्र वाटतो. दिवा मांगल्याचे प्रतिक आहे.
दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी, सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवतात. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटून फुलांची आरास करतात. सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून ते प्रज्वलित करतात. कणकेचे गोड दिवे (उकडलेले) बनवतात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात. या सर्वांची हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करतात. गोडाचा नैवेद्य दाखवतात. यावेळी खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।
गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥
हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे, प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडापिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दिप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते.
या लहानग्या विद्यार्थ्यांनी या दिव्यासमोर प्रार्थना, श्लोक आपल्या लडिवाळ अशा आवाजात म्हटले, काहींची म्हणता म्हणता समाधीही लागली. अतिशय निरागसपणे आपल्या बाई कशा नमस्कार करतात ते पाहून सर्व नमस्कार करत होते आणि सुंदर आणि पवित्र अशा क्षणांचा आनंद घेत होते.ज्ञान आणि आपली संस्कृती यांचा संगम साधणाऱ्या आमच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिकांचे कौतुकच आहे. प्रत्येक सण इतक्या सुंदर प्रकारे या लहानग्यांसाठी साजरा करतात की डोळ्याचे पारणे फिटते. या धकाधकीच्या जीवनात पालकांना हे सर्व सणवार साजरे करणे शक्य होत नाही. त्यामुळे बरेच विद्यार्थी हे या सर्वांपासून अनभिज्ञ असतात. असेच सुरू राहिले तर कालांतराने हे आपले सण-उत्सव रूढी परंपरा या पुढील पिढीला माहित होणार नाहीत परंतु या सर्वजणी आपल्या संस्कृतीचे सणांचे बीज विद्यार्थ्यांच्यात ज्ञानाबरोबर रुजवण्याचे कार्य करीत आहेत.
मुख्याध्यापिका सौ.भाग्यश्री जोशी. सौ.मंगला वाणी, सौ.दिपीका पवार, सौ.समिधा कदम, सौ.ज्योती महाजन. सौ.वीणा नातू, सौ.सविता बरबडे, सौ.शितल सोनावळे या साऱ्याजणी सर्वांना मायेने प्रेमाने जपतात आणि ज्ञान व संस्कारक्षम बनविण्यासाठी अविरत झटत असतात.
अशा या आमच्या पूर्व प्राथमिक विभागाला आपण नक्कीचं भेट द्या.
– लेखन : आस
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
👌👌👌 सुंदर
वेगळेपणं आवडतं