इंग्रजी पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव असलेले श्री दिलीप चावरे आपल्या पोर्टलसाठी नियमित लेखन करणार आहेत. आज त्यांचा पहिला लेख प्रसिद्ध करीत आहे. श्री दिलीप चावरे यांचे मन:पूर्वक स्वागत करू या.
– संपादक
आधुनिक मुंबईची पायाभरणी करणारे एक प्रमुख महानुभाव जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांची उद्या, ३१ जुलै रोजी १५७ वी पुण्यतिथी आहे.
पण त्यांच्या अफाट कामगिरीची आज आपल्याला अपवादानंच आठवण येते. ज्या महापुरुषानं मुंबईत रेल्वे, महापालिका, विद्यापीठ आणि मुलींची पहिली शाळा आदी उभे करण्यात सिंहाचा वाटा उचलला, ते नाना शंकरशेट यांचं यथोचित स्मारक आजही या महानगरीत उभं राहू नये हे दुर्दैवच म्हणावं लागेल. कालाय तस्मै नमः असं म्हटलं जातं. नानांच्या बाबतीत ते पुरेपूर लागू होतं.
नानांचा जन्म १८०३ साली मुरबाड इथं झाला तर त्यांचं निधन झालं १८६५ या वर्षी. नानांचे वडील व्यापारासाठी मुंबईत आले. त्यांची आई भवानीबाई यांचं ते लहान असतानाच देहावसान झालं. पण शंकरशेट यांनी नानांचं शिक्षण योग्य प्रकारे व्हावं यासाठी भारतीय पारंपरिक आणि इंग्रजी शिक्षणाची सोय घरीच केली.
नाना अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. ते मराठी प्रमाणेच संस्कृत आणि इंग्रजीत उत्तम लिखाण करीत असत. नानांचे वडील १८२२ साली वारले तेव्हा ते फक्त १९ वर्षांचे होते. नानांवर सर्व जबाबदारी पडली आणि ती त्यांनी समर्थपणे पार पाडली.
या ६२ वर्षांच्या आयुष्यात नानांनी केलेलं कार्य पाहिलं की आजही आपण अचंबित होऊन जातो. त्यांची कामगिरी वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. नानांचं एक ठळक कार्य म्हणजे बॉम्बे असोसिएशन या नागरी संघटनेची स्थापना. त्यातूनच स्फूर्ती घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं बीजारोपण झालं. याच मुंबईत १८८५ साली या काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं.
मुंबईत शिक्षणाचा पाया घातला १८१९ साली माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन या गव्हर्नरनं. नानांचं सामाजिक स्थान, पुरोगामी वृत्ती आणि प्रगल्भता पाहून एल्फिन्स्टननं नंतर या प्रयत्नामध्ये नानांना सहभागी करून घेतलं. बॅाम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी १८२४ साली स्थापन झाली. पुढे सदाशिव छत्रे आणि जगन्नाथ शास्त्री यांच्या सहकार्यानं नानांनी मुंबईत अनेक शाळा उघडल्या. त्यामुळे शिकणार्या मुलांची संख्या आणि शिक्षणाचा प्रसार वाढविण्यात मदत झाली. पुढे रेव्हरंड विल्सन यांच्या सांगण्यावरून नानांनी आपल्या एका इमारतीत मुलींच्या शाळेला जागा दिली.
नानांचा आग्रह आधुनिक शिक्षण स्थानिक मुलांना देता यावं यासाठी असे. नेटीव्ह स्कूल सोसायटी समाजाच्या काही पुढार्यांसह त्यांनी स्थापन केली. याचाच परिपाक नंतर मुलींसाठी पहिली शाळा काढण्यात झाला. स्वाभाविकच परंपरेच्या जोखडात अडकलेल्या मुखंडांनी त्यास विरोध केला. पण नानांचा प्रभाव एवढा होता की कालांतरानं ही शाळा सुरू झालीच. नानांनी अर्थातच त्यासाठी आवश्यक तो पाठिंबा आणि आर्थिक आधार दिला. मात्र त्याबरोबरच एक संस्कृत पाठशाळा आणि वाचनालय सुरू करण्यासाठीही प्रयत्न केले. नानांचं योगदान पाहून सरकारनं स्थापन केलेल्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मुंबई विद्यापीठ स्थापन झालं तेव्हा त्याच्या पहिल्यावहिल्या नियामक मंडळावर नाना एक सदस्य म्हणून नेमले गेले.
नाना आणि एल्फिन्स्टन मातृभाषेत शिक्षण दिलं जावं म्हणून आग्रही असत. म्हणूनच मराठी, गुजराती आणि हिंदी भाषांमध्ये प्रथमच क्रमिक पाठ्यपुस्तकं छापली गेली. त्यामुळे आधुनिक शिक्षणाची कवाडं सर्वांना खुली झाली. एल्फिन्स्टन इंग्लंडला परत जाण्यासाठी १८२७ साली निघाले तेव्हा त्यांच्या सत्कारासाठी जो निधी गोळा केला गेला त्यातून एल्फिन्स्टन कॉलेज आणि शिक्षण संस्था उभ्या झाल्या. याच एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पुढे शिक्षणाचा वटवृक्ष फोफावला.
मुंबईत १८४५ मध्ये जे. जे. रुग्णालय आणि ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना, १८४९ मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय आणि अन्य संस्थाद्वारे एतदेशीयांसाठी कल्याण शाळा, १८५१ मध्ये सर्वांना संस्कृतचे शिक्षण खुले करणारे पूना संस्कृत कॉलेज म्हणजे आजचे डेक्कन कॉलेज, १८५५ मध्ये पहिले विधी महाविद्यालय, १८५७ मध्ये जे.जे.स्कूल ऑफ आर्ट आणि मुंबई विद्यापीठाची स्थापना अशा सर्व महाकार्यामागे नानांचं कर्तृत्व फार उपयुक्त ठरलं.
आज समाजसेवक म्हटलं की लोक तुच्छतेनं त्या व्यक्तीकडे बघतात. मात्र नाना सच्चे समाज सेवक होते. नानांनी समाजाला किती देणग्या दिल्या याचे अनेक संदर्भ आजही सापडतात. मात्र त्यांनी समाजाकडून काहीही घेतलं नाही. भारतातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यासाठी आपली एक इमारत त्यांनी दिली. हेच नाना सामाजिक सुधारणा व्हाव्या म्हणून सक्रीय असले तरी आपला धर्म आणि परंपरा यांच्याबाबत विलक्षण आग्रही असत. याचं एक उदाहरण म्हणजे मरीन लाइन्स इथल्या हिंदू दहनभूमीतील धुरामुळे त्रास होत असल्यानं ती अन्यत्र हलवावी अशी मागणी गोर्या सोजीरांनी केल्यानंतर ती पूर्ण करण्याचा मनसुबा मुंबईच्या गव्हर्नरनं व्यक्त केला. तेव्हा ठाम भूमिका घेऊन हे नानांनी घडू दिलं नाही.
नाना प्रत्येक सामाजिक कार्यात आघाडीवर असत. पण इंग्रज सरकारच्या जुलमाचा रेटा वाढू लागला तसं नानांच्या पुढाकारानं १८५१ साली बॉम्बे असोसिएशन स्थापन झालं. सरकारचे निर्णय पडताळतानाच समाजानंही आधुनिकतेची कास धरावी असा दुहेरी उद्देश ही संघटना स्थापन करताना होता. तिचे नानाच अध्यक्ष बनले. देशात प्रत्येक इलाख्यात कायदे मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मुंबई इलाखा विधान परिषदेवर नाना नेमले गेले. सनदशीर आणि अहिंसक संघर्ष हे प्रथमपासूनच नानांचं ब्रीद होतं. ब्रिटिश अधिकारी आणि पार्लमेंट यांना कोणत्या प्रकारे आपलं म्हणणं मान्य करण्यास भाग पाडावं याचा त्यांना अचूक अंदाज असे. त्यामुळे नानांनी केलेल्या मागण्यांकडे सरकारला सहज दुर्लक्ष करणं शक्य नसे.
तेव्हाच्या वर्णनावरून असं दिसून येतं की नानांची देहयष्टी भव्य होती पण त्यांची वाणी सौम्य होती. नानांच्या दानशूरपणाच्या कथा प्रसिद्ध होत्या. त्यामुळे अनेक नागरिक त्यांची भेट घेत असत आणि ती सहज होऊ शकत असे. एखाद्याची अडचण रास्त वाटल्यास त्याला मदत मिळू शके. त्यामुळे नानांचा हा प्रभाव वापरून सरकारनं सामाजिक सुधारणा करताना लोकांचं सहकार्य मिळवलं. नाना आहेत म्हटलं की इथल्या समाजानं या सुधारणा बिनतक्रार स्वीकारल्या. मात्र त्यामुळेच मुंबईतल्या प्रत्येक सार्वजनिक प्रकल्पात त्यांचा सहभाग अनिवार्य ठरला.
आता जगप्रसिद्ध असलेल्या राणीच्या बागेची कल्पना त्यांचीच. ती आरंभी शिवडी वडाळा इथं होती. नंतर ती भायखळा इथं आणण्यात आली. तिचं उद्घाटन झालं त्यावेळी नानांना व्यासपीठावर गव्हर्नरनं मानाचं स्थान दिलं होतं.
नानांच्या जीवनातील एकमेव किटाळ म्हणजे १८५७ च्या उठावानंतर त्यांच्यावर आलेला वहीम. या उठावामुळे देशभर मोठे हादरे बसले आणि संशयाचं धुकं निर्माण झालं. सर्वत्र धरपकड झाली. मुंबईतही किंचितसा परिणाम झाला पण त्याचे फार पडसाद उमटले नाहीत. आताच्या आझाद मैदानात दोन कथित बंडखोरांना जाहीरपणे फाशी चढवण्यात आलं. नानांचा या उठावास छुपा पाठिंबा असल्याचा वहीम आला आणि त्यांची चौकशीही करण्यात आली. तथापि त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. उलट नानांची प्रतिमा आणखी झळाळून उठली. त्यानंतर मात्र सरकारनं त्यांचं कायम गौरवच केला.
मुंबई शहराची आजची भरभराट आणि विकासामध्ये नाना शंकरशेट यांचा वरदहस्त सतत लाभत आला आहे. मुंबईतील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. त्याचप्रमाणे बॉम्बे स्टीम नॉव्हिगेशन कंपनीची स्थापना, पहिलं नाट्यगृह, महापालिका, बँक आणि मुंबईत सार्वजनिक ठिकाणी गॅसबत्तीची सोय त्यांच्याच प्रयत्नानं झाली.
आपल्या देशातील काही अयोग्य चालीरीती अशा होत्या की त्यामुळे निर्बल समाजावर अन्याय होत असे. त्यातील एक म्हणजे सतीची प्रथा. बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांनी सतीच्या अमानुष प्रथेविरुद्ध सरकारनं हस्तक्षेप करावा यासाठी प्रयत्न केला होता. नाना शंकरशेट यांनी त्यास पाठिंबा देत पार्लमेंटकडे अर्ज करून या प्रथेचे उच्चाटन करण्याची विनंती केली होती.
नाना विविध कार्यासाठी सढळ हस्ते देणग्या देत असत. त्यांना मुंबईचा दानशूर या बिरुदानं ओळखलं जाई. एशियाटिक सोसायटी, राणी बागेतील वस्तुसंग्रहालय, मुंबई विद्यापीठ अशा अनेक संस्थाना त्यांनी देणग्या दिल्या. मात्र त्यांची अजरामर झालेली देणगी म्हणजे अत्यंत प्रतिष्ठित जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती. शालांत परीक्षेत संस्कृत विषयात सर्वप्रथम येणार्या विद्यार्थ्यास ती दरवर्षी देण्यात येते. आजही ती प्राप्त करण्यासाठी तीव्र स्पर्धा असते.
नाना शंकरशेट यांचं योगदान इतकं महान होतं की कृतज्ञ मुंबईकरांनी लोकवर्गणी काढून त्यांची एक पूर्णाकृती अप्रतिम प्रतिमा इंग्लंडमध्ये संगमरवरात घडवून मुंबईत आणली.
आज नानांचा हा पुतळा एशियाटिक सोसायटीच्या तळघरात स्थापन करण्यात आला आहे .वास्तविक त्याचं स्थान मध्य रेल्वेच्या मुख्यालयासमोर आहे. ही रेल्वे मुंबईत यावी म्हणून नानांनी जीवापाड मेहनत केली. कृतज्ञ इंग्रजांनी नानांचा चेहरा मध्य रेल्वेच्या मुख्य प्रवेशद्वारी कोरला आहे. पण ते पुरेसं नाही. त्यांचा पूर्णाकृती पुतळा रेल्वेच्या दर्शनी भागातच उभारला गेला पाहिजे.
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेस बहुमत मिळून १९८५ साली छगन भुजबळ महापौर झाले तेव्हा त्यांच्याकडे इतरांबरोबर मी सुद्धा नानांच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा मध्य रेल्वेच्या मुख्यालयात प्रवेशस्थानी व्हावी असे प्रयत्न केले. भुजबळ यांनीही त्यास सक्रीय सहाय्य केलं. मात्र असं घडणं कदाचित तेव्हा नानांच्याच नियतीत नसावं. मात्र अजूनही उशीर झालेला नाही. नानांना यथोचित मानवंदना द्यायची असेल मध्य रेल्वेच्या प्रांगणातच त्यांना स्थान मिळाले पाहिजे. तेच त्यांचं उचित पुण्यस्ममरण ठरेल.
– लेखन : दिलीप चावरे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800