Thursday, September 18, 2025
Homeलेख'भावलेली गाणी' ( ९ )

‘भावलेली गाणी’ ( ९ )

..रिमझिम गिरे सावन ..

गीत : रिमझिम गिरे सावन
चित्रपट : मंज़िल (१९७९)
दिग्दर्शन : बासु चटर्जी
गीतकार : योगेश
संगीतकार : आर.डी.बर्मन
कलाकार : अमिताभ बच्चन, मौशमी चटर्जी
गायक : किशोर कुमार, लता मंगेशकर

श्रावण महिना सुरू झाल्याचे कालनिर्णयने सांगितले तेव्हा मस्त बाहेर पावसाने हजेरी लावल्याचे लक्षात आले आणि त्या पावसाच्या पाण्याचा आवाज ऐकण्यात मी दंग झाले. हलका रिमझिम पाऊस पडत होता आणि क्षणभर मला भिजण्याचा मोह आवरला नाही. एखाद्या लहान मुलीसारखी पावसात पाच मिनिटे पटकन भिजून घेतले !

नकळतपणे गुणगुणायला लागले ते “रिमझिम गिरे सावन” हे गाणे. rhythm आणि melody, अर्थात ताल आणि चाल यांचा सुरेख संगम झाल्याने हे सहज लक्षात राहण्यासारखे आहे. एकदा गुणगुणायला लागले की दिवसभर डोक्यातून जाणार नाही असे melodious गाणे !

किशोरदा आणि लताजी या दोघांच्याही आवाजात हे गाणे आहे आणि मला दोन्ही आवृत्त्या (versions) खूपच आवडतात. खरं सांगू कुठले जास्त आवडते हे सांगणे फारच कठीण आहे. मला किशोरदांचा आवाज नेहमीच खूप हृदयस्पर्शी वाटतो. त्यांच्या आवाजातले हे गाणे मी डोळे मिटून ऐकणे जास्त पसंत करते. कानांना निव्वळ मेजवानी असते ती. सुरुवातीलाच जेव्हा म्मsss ह्ममsss सुरू होते तिथेच आपल्याला हे गाणे अलगद असे हलक्याशा सरींच्या थेंबाचा स्पर्श घेऊन जात आहे, असा भास होतो.

अमिताभने गायकाची भूमिका असलेली खूप गाणी केली आहेत. बरेच गायक पेटी वाजवत गायन करतात. तसेच या गाण्यात सुद्धा आहे. पण गंमत म्हणजे या गाण्यात एके ठिकाणी त्याने पेटी वाजवणे अपेक्षित होते, तिथे हात फक्त पेटीवर ठेवलेले दिसतात ! तुम्ही जर खूप बारीक लक्ष देऊन बघितलेत तर तुमच्याही लक्षात येईल की त्या काळी असे खूप चित्रपटातून दिसून येते. कित्येक वेळा अभिनेता किंवा अभिनेत्री पियानो वाजवत असतील तर बोटे त्याच त्याच ठिकाणी गाण्याच्या ठेक्याच्या अंदाजाने वाजवली जायची किंवा गिटार नुसताच पोझ घेऊन थोडेसे वाजवल्यासारखे केले जायचे !

मला ना त्या काळच्या अशा गोष्टींची फार गंमत वाटते. तेव्हा अभिनेता हा अभिनेताच असायचा. त्याने प्रत्येक नवीन भूमिकेसाठी त्या त्या क्षेत्रातले प्रशिक्षण घेतलेच पाहिजे हा आग्रह नसायचा किंवा कदाचित तसा विचार ना दिग्दर्शक, ना अभिनेता आणि ना ही प्रेक्षकांत असावा.

आजकाल जसे एखादे विशिष्ट पात्र साकारायचे असेल तर त्याचे पूर्ण प्रशिक्षण घेतले जाते, तसे त्या काळी विशेष नसायचे. आजकालच्या सारखे तेव्हा प्रेक्षकांचेही इतके बारीक लक्ष नसायचे. अमिताभ सारखा कलाकार तर त्यांच्यासाठी देवाहून कमी नव्हताच! इथे मला टीका करायची नाही, तर केवळ काळानुसार बदल घडत गेले ते माझ्या मनावर कुठेतरी छाप सोडून गेले, हे सांगायचे होते इतकेच !

पण गायकाचे काही विशेष हावभाव मात्र अमिताभने छान आत्मसात केले होते. जसे की डोळे मिटून तन्मयतेने गाणे, हातवारे इत्यादी. जे अमिताभचे माझ्यासारखे पंखे आहेत ना, त्यांच्यासाठी त्याच्या लांबसडक बोटांचे दर्शनही पुरेसे असते !

अर्थात अमिताभचे खूप कौतुक झाले होते या चित्रपटातील अभिनयासाठी.

तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर लक्षात येईल की हे गाणे सुरू व्हायच्या आधी एक अगदी गमतीशीर प्रसंग घडतो. अरुणा खोसला (मौशमी चटर्जी) आणि अजय चंद्रा (अमिताभ बच्चन) दोघेही एका लग्नाच्या रिसेप्शनला जात असतात. अरुणाची गाडी बिघडते आणि ती पायी पायी टॅक्सी शोधत निघते. तेवढ्यात गायक असलेला अजय उशीर झाल्याने झपाझप पावले टाकत त्याच दिशेने येत असतो.

बिचाऱ्या अरुणाला वाटते की हा माणूस आपल्याच मागे लागला आहे. ती झरझर पावले टाकायला लागते. पण आपल्याच नादात असलेला अजय तिला मागे टाकून निघून जातो. आपल्याच वेडेपणावर ती दिलखुलास हसते ! जेव्हा रिसेप्शन मध्ये अरुणा पोचते तेव्हा तिच्या लक्षात येते की अरेच्या हा गायक तर तोच आहे ! ती त्याच्या आणि त्याच्या आवाजाच्या एका क्षणात प्रेमात पडते !

मला या गाण्यात भावला तो त्यातला साधेपणा. रिसेप्शन किती साधेपणाने होत आहे. अगदी थोडे थोडके जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळी. श्रीमंत असणारी अरुणासुद्धा एकता कपूरच्या सीरियल मधल्या झोपून उठलेल्या नायिकेपेक्षा कमी दागिने घालून आहे ! फुलांचे डेकोरेशनसुद्धा साधेच. जोरजोरात वाजणारे डी जे नाहीत, महागडे कपडे नाहीत, फटाक्यांचा अतिरेक नाही, बँड बाजा बारात काही काही नाही. आहे ते फक्त संगीत संगीत आणि संगीत !

लग्नाच्या रिसेप्शनला आलेली श्रीमंत तरी साधी सोज्वळ नायिका

या गाण्यात अमिताभच्या मित्राची भूमिका केली आहे मेहमूदचा भाऊ, अन्वर अलीने. अमिताभची आणि त्याची जिगरी दोस्ती. मुंबईत नशीब आजमावण्यासाठी अमिताभ पहिल्यांदा कोलकात्याहून आला तेव्हा याच्याच घरी राहिला होता. असे म्हणतात की मेहमूदने त्याची मैत्रीण अरुणा इराणीला हिरॉईन बनवण्यासाठी “बॉम्बे टू गोवा” हा चित्रपट काढला आणि त्यात अमिताभला हिरोचा रोल दिला. त्यातूनच अमिताभला ज़ंजीर मिळाला आणि पुढे इतिहास घडला.

अजून एक सांगू, मला ना मौशमी चटर्जी खूप आवडते. का ते विचारा ? तिचे ते लोभसवाणे, निष्पाप निरागस हसणे, एखाद्या षोडश वर्षीय कन्येसारखे प्रेमात पडल्यावर लाजणे खूप आवडते. आणि सगळ्यात मला जर काही आवडत असेल तिच्या बाबतीत तर त्यांचे दात ! हसू आले असेल ना हे वाचून तुम्हाला ? आजकालच्या जमान्यात आपल्याला जिथे प्रत्येक गोष्ट परफेक्ट लागते तिथे वाकडे दात तिच्या सौंदर्यात भरच पाडत असे माझे स्पष्ट मत. त्यामुळे ती एकदम गोड दिसायची ! मला खरंच त्यामुळे ती अगदी जवळची वाटते !

या गाण्यातली तिची जांभळी टिकली बघून मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. तेव्हा ना एवढी टिकल्या लावायची फॅशन नव्हती. Shringar चे काळे किंवा लाल किंवा मरून रंगाचे द्रव स्वरूपात कुंकू असायचे. मग साधारण माझ्या अकरावीच्या सुमारास दुसऱ्या एका कंपनीचे वेगवेगळ्या रंगांचे द्रव स्वरूपात कुंकू यायला लागले बाजारात. मग काय कॉलेजला जाताना रोज ओढणी, कुर्ता नाहीतर सलवार याला मॅचींग कुंकू शोधून छानपैकी उदबत्तीच्या काडीने एखादे डिझाईन काढायचे असा छंदच लागला होता. त्याचीच आठवण झाली !

किशोरदांच्या आवाजात असलेले गाणे हे चित्रपट सुरू होतानाच येते. मित्राच्या लग्नाच्या रिसेप्शनला गायलेले, चार भिंतींच्या आड चित्रीकरण झालेले हे गाणे डोळे मिटताच पावसाला दत्त म्हणून समोर उभे करते आणि जी काही आपल्या हृदयाची तान छेडली जाते ते लाजवाब आहे. गीतकार योगेश, संगीतकार आर.डी.बर्मन गायक किशोर कुमार, या त्रयींची ही जादूच म्हणावी लागेल.

रिमझिम गिरे सावन
सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में
लगी कैसी ये अगन
रिमझिम गिरे सावन…||धृ||

मुंबईच्या पावसात बागडणारे मौशमी आणि अमिताभ

नवीन लग्न झालेले जोडपे या गाण्यात दाखवले आहे. त्यांना उद्देशून कदाचित हे गाणे असावे.

प्रेमाचा रिमझिम पाऊस बरसतोय आणि यात भिजताना एक सुप्त आग मनात पेटतिये. साहजिकच नवदाम्पत्याला ही भावना मनात उचंबळून येणार. प्रणयाची सुप्त आग भडकली आहे, तरी त्यावर प्रेमाचा वर्षाव होत असल्याने आग पेटलिये, पण थोडी दबून राहिलीये. प्रणयाला जणू प्रेमाचे कोंदण घालून ती आग नियंत्रणात आणली आहे. त्याची निशाणी म्हणून थोडासा धूर दिसतोय इतकेच. एका नवदाम्पत्याच्या भावना, जोडीला सामाजिक बंधने, सगळे काही या चार ओळीत सामावले आहे.

जब घुंघरुओं सी बजती हैं बूँदें
अरमाँ हमारे पलके न मूँदें
कैसे देखे सपने नयन,
सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में…(१)

पावसाच्या थेंबांना योगेशजींनी घुंगरांची काय सुंदर उपमा दिली आहे ! पावसाचे थेंब हे जणू हलक्या पावलांनी चालत, पैंजणातले घुंगरू वाजवत, आपल्या पतीला साद देणाऱ्या त्या नवपरिणीतेचे प्रतीक आहेत. तो साद ऐकून तिचा पती स्वप्नात रमून जातो आणि मीलनाच्या रात्री त्याच इच्छा त्यांना झोपू देत नाहीत. उघड्या डोळ्यांनी स्वप्ने बघणाऱ्या या जोडप्याच्या मनात प्राण्याची सुप्त आग धगधगू लागते आणि प्रीतीच्या वर्षावात चिंब भिजून जाते.

महफ़िल में कैसे कह दें किसी से
दिल बँध रहा है किस अजनबी से
हाय करें अब क्या जतन,
सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में…(२)

कदाचित हे जोडपे अरेंजड् मॅरेज करत असावे. म्हणूनच तर लग्न बंधनात अडकल्यावर दोघे अनोळखी जवळ येऊ लागले आहेत, असा उल्लेख आहे गाण्यात. तरी आता सगळ्यांसमोर उघडपणे कसे सांगणार की आपण प्रेमात पडतोय एकमेकांच्या! आता काय काय सांभाळणार, माझे हृदय, तुझे हृदय, आपला संसार, सगळ्यांच्या अपेक्षा, की हा हृदयात फुलणारा प्रीतीचा अंकुर ?

गाणे संपून खूप वेळ झाला तरी आपल्या मनात त्याचे पडसाद दीर्घकाळ रुंजी देत राहतात.

मौशमी चटर्जी ही फक्त चौदा वर्षाच्या होत्या जेव्हा तिने आपला पहिला चित्रपट, बालिका बधू (१९६७) केला. तिला त्यासाठी BJFA अवॉर्ड पण मिळाला होता. बालिका बधू नंतर चित्रपटांच्या ऑफर्सचा भडिमार झाला पण तिने आधी आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पण कदाचित नियतीला ते मंजूर नव्हते.

मौशमी चटर्जी हिचा जन्म इंदिरा चट्टोपाध्याय या नावाने २६ एप्रिल, १९५३ साली कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला. तिचे वडील, श्री. प्रणतोष चट्टोपाध्याय एक आर्मी ऑफिसर होते आणि आजोबा न्यायाधीश होते. तिला एक भाऊ आणि बहीण देखील आहे.

तिचे खूप लवकर म्हणजेच १५ व्या वर्षी लग्न झाले. दहावीत असताना, कोणीतरी नातेवाईक (बहुदा मावशी किंवा आत्या) मरणासन्न अवस्थेत होत्या आणि मरण्यापूर्वी त्यांना मौशमीजींचे लग्न बघायचे होते.

लोकप्रिय गायक हेमंत कुमार मुखोपाध्याय यांचा मुलगा जयंत मुखर्जी यांच्याशी तिचा विवाह झाला. तिचे पती जयंत मुखर्जी हे चित्रपट निर्माते आहेत. या जोडप्याने अभिनेत्री मेघा चॅटर्जी आणि एका टेलिव्हिजन चॅनलच्या क्रिएटिव्ह हेड पायल चॅटर्जी नावाच्या दोन मुलींना जन्म दिला.

पायल चटर्जी हिला २०१७ पासून टाईप १ प्रकारचा मधुमेह होता. २०१८ पासून त्या डायबेटिक कोमा मध्ये होत्या. २०१९ साली त्यांचा मृत्यू झाला. दुर्दैवाने पायलच्या शेवटच्या दिवसात माता पित्याचे दर्शन घेण्याचे भाग्यात नव्हते. तिचे पती, डिकी मेहता यांनी पायलला घरीच ठेवले आणि कोर्टाकडून मौशमी आणि जयंत चटर्जी यांना भेटण्यास मनाई केली. मौशमी चटर्जी आणि त्यांच्या पतीने कोर्टात खूप लढा द्यायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्यांना असे वाटत राहिले की हॉस्पिटलची बिले व औषधोपचार याचे पैसे वाचवण्यासाठी त्यांच्या जावयाने हे पाऊल उचलले. अखेर आई वडील आणि लेकीची शेवटपर्यंत भेट न होताच लेकीने अखेरचा श्वास घेतला.

मौशमी चटर्जी मनाने खूप उदार आणि दयाळू आहे. एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ती व राजकारणी आहे. खूप लहानपणापासून मदर टेरेसा यांच्यासोबत काम केले असून मदर टेरेसा यांच्यावर कविता देखील केली होती.

समाज सेवा करणाऱ्या मौशमी चटर्जीला आपल्याच लेकीची मात्र सेवा करता आली नाही आणि आपल्या जिवंतपणी लेकीच्या मृत्यूचे भयंकर दुःख पचवावे लागले. त्या निखळ, निरागस हास्याचे मागे इतके दुःख लपलेले असेल हे कोणास ठाऊक होते ?

तिचे सासरे, पार्श्वगायिक हेमंत कुमार यांनीच तिला तिचा पहिला हिंदी चित्रपट, अनुराग (१९७२) करायला प्रोत्साहित केले. हेमंत कुमार चित्रपट सृष्टीतील दिग्गज असल्याने बरेच फिल्मी जगातील हस्ती त्यांच्या घरी यायचे. त्यापैकी शक्ती सामंत यांनी मौशमीजींना चित्रपटात येण्यास आग्रह केला.

मौशमीने नकार दिला. पण पती आणि सासऱ्यांनी खूप प्रोत्साहन दिले आणि हिंदी चित्रपटसृष्टीला एक गोड अभिनेत्री मिळाली. या चित्रपटातील अंध मुलीच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. लग्नानंतर प्रमुख अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत करिअरची सुरुवात करणारी कदाचित ती पहिला भारतीय महिला होती.

पण गरोदर असल्यामुळे काही भूमिका त्यांना सोडाव्या लागल्या. “गुड्डी” (१९७१) मधली जया भादुरी यांची भूमिका सोडावी लागली. याच भूमिकेने जया भादुरी बाच्चन ला अभिनेत्री म्हणून प्रस्थापित केले. तसेच “रोटी, कपडा और मकान” (१९७४) मधले “हाय हाय यह मजबूरी” हे झीनत अमान यांचे गाणे सोडावे लागले.

वयाच्या १८व्या वर्षी पहिल्या मुलीचा जन्म झाला. लोकांना वाटले की आता यांचे फिल्मी करिअर संपले. पण लेकीचा पायगुण असा होता की मौशमीने एका पाठोपाठ एक हिट्स दिले आणि करिअरचा आलेख उंचावत गेला. त्या ७०च्या दशकात बंगाली चित्रपट सृष्टीतल्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री ठरल्या. त्याच काळात हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा त्यांनी आपला पाय रोवत तिथेही मानधन मिळकतीत ६ वा क्रमांक पटकावला.

१९७० पासून ते १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस, तिने घर एक मंदिर, न्याय चौधरी, अंगूर, प्यासा सावन, सब से बडा रुपय्या आणि रोटी कपडा और मकान यासारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले.

१९८० च्या दशकाच्या मध्यानंतर तिने पात्र भूमिका (character roles) करायला सुरुवात केली. या काळात त्यांनी घायाल, आ अब लौट चले, ना तुम जानो ना हम आणि जिंदगी रॉक्स सारखे चित्रपट केले. त्यांनी क्वचितच ग्लॅमरस भूमिका केली, त्या नेहमीच साडी नेसलेल्याच मोठ्या पडद्यावर झळकल्या.

हिंदी व्यतिरिक्त, त्यांनी विविध बंगाली चित्रपट देखील केले. बंगाली चित्रपटसृष्टीतही त्या टॉपच्या स्टार होत्या. त्यांच्या प्रसिद्ध बंगाली चित्रपटांमध्ये आनंद आश्रम, परिणीता, शतरूपा, द जपानी वाइफ आणि भालोबासर यांचा समावेश आहे.

मौशमी चटर्जी यांना २०१५ मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला.

तुम्हाला माहीत आहे का की विनोद खन्ना आणि मौशमी चटर्जी यांचे परिवार खूप जवळचे होते. खरं तर, जेव्हा मौशमीचे पती आणि विनोद खन्ना पार्टीज् ना जात तेव्हा मौशमी चटर्जी विनोद खन्ना यांच्या मुलांना सांभाळत. तो जमाना काही औरच होता ना.

मौशमी ना अगदी आपल्यासारखी आहे. चित्रपट पाहणे, संगीत ऐकणे, स्वयंपाक करणे आणि प्रवास करणे हे मौशमीचे छंद आहेत.

“रिमझिम गिरे सावन” या गाण्याच्या दुसऱ्या आवृत्तीत मौशमी साध्या सोज्वळ रुपात आहे. साधीशी साडी, त्यावर काळा ब्लाऊज्. केशभूषा नाही, मेकप नाही, काही स्पेशल इफेक्ट्स नाही. अख्खे गाणे एकाच पोशाखात. ते ही लाईव्ह लोकेशन वर. हे गाणे प्रत्यक्ष पावसाळ्यात चित्रीत करण्यात आले होते. कृत्रिम शॉट्स नाहीत. कदाचित पावसाच्या गाण्यांमधील सर्वोत्तम चित्रीकरण याच गाण्याचे झाले असावे.

संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण मुंबईच्या रस्त्यांवर केले गेले. या गाण्यात आपल्याला जुन्या मुंबईचे अतिशय सुंदर दर्शन घडते. सुवर्ण काळातील जुनी, भव्य, प्राचीन अन् अर्वाचिन मुंबई ! भव्य, मॅजेस्टिक, विंटेज मुंबई! हिरवीगार मुंबई ! चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, वरळी समुद्र किनारा, दादरचं मैदान, क्वीन्स नेकलेस, आझाद मैदान अशी सगळी ठिकाणं बघायला मिळतात.

टॅक्सी, फियाट, डबल डेकर बस, स्कुटर क्रिकेटचे मैदान बघायला मिळते. अम्बॅसेडर , फियाट इत्यादी आता नामशेष झालेल्या गाड्या या गाण्यात बघायला मिळतील. त्याच बरोबर काही विदेशी गाड्या आणि बेस्टच्या सिंगल व डबल डेकर बसही दिसतील, त्याही माणसे लोंबकळत नसलेल्या !

किती कमी रहदारी ! काही ठिकाणी तर एखादी तुरळक गाडी किंवा टॅक्सी. आता तर मध्यरात्री सुद्धा हे चित्र दिसत नाही. तेव्हाही थोडी फार रहदारी असतेच.

आणि छत्र्या ! त्या फक्त आणि फक्त मोठ्या कळ्या छत्र्या. आताच्या सारख्या रंगीबिरंगी छत्र्या नसायच्या तेव्हा. रेनकोट तरी थोडे फार वेगळ्या रंगाचे दिसतात, पण तेसुद्धा अगदी प्लेन, काही डिझाईन नसलेले.

मुंबई किती स्वच्छ होती बघा तेव्हा. आतासारखा बकालपणा कुठेही नव्हता. रस्त्यावरचे पावसाचे साठेलेले पाणी चक्क स्वच्छ होते ! आता स्वप्नातही अशी मुंबई दिसणार नाही असे वाटू लागले आहे !

मरीन ड्राईव्हच्या धक्क्यावरून तर मौशमी चक्क चप्पल न घालता चालताना दिसत आहे इतकी स्वच्छ होती तेव्हा. असो.

मला हे त्या दोघांचे असे दिलखुलास बागडणे भारी आवडले ! तिच्या बरोबरीने हातात हात घेऊन अमिताभचे तिच्या बरोबर फुटपाथ वरून धावणे ! मला नसते हो जमले असे बिनधास्त बागडणे ! तरी या दोघांकडे बघून वाटले की एकदा तरी जगाची तमा न बाळगता, बिनधास्त रत्स्याच्या मध्यावरून असेच बागडत जावे ! फक्त शहर कमी रहदारीचे शोधावे लागेल, नाहीतर मजा यायच्या आधी सजा मिळायची !

मुंबई आणि पाऊस याचे अतिशय सुंदर समीकरण इथे पहायला मिळते. मी आयुष्यात पहिल्यांदा या जुन्या मुंबईच्या प्रेमात पडले ! नाहीतर खरं सांगू का, मला कधीच कळले नाही की लोक मुंबईच्या पावसाचे इतके गोडवे का गात असतात. कारण मी बघितलेली पावसातली मुंबई म्हणजे त्यावर भाष्य न केलेलेच बरे !

जितके सुंदर चित्रीकरण तितकेच सुंदर दिग्दर्शन. दोन प्रेमीयुगुलांमधील केमिस्ट्री अगदी सहजपणे चित्रित केली आहे. ते पूर्णपणे एकमेकांमध्ये गुंतले आहेत, जणू जगाचा विसर पडला आहे. जेव्हा तुमची आवडती व्यक्ती तुमच्या शेजारी असते, तेव्हा तुम्हाला कसे वाटते, हे गाणे सुंदरपणे चित्रित करते.

हिंदी चित्रपट सृष्टीतील अलिखित नियमांप्रमाणे नायिकेला पावसात भिजवणे येथे आहेच. पण गाण्यात कोणतीही अश्लीलता नाही याची पुरेपूर काळजी बासुदांनी घेतली आहे ! समोर दिसते ते साधेसुधे पण परिपूर्ण प्रेम ! दोघांचाही उत्कृष्ट नैसर्गिक अभिनय !

लता दीदींच्या आवाजातले गाणे चित्रपटात साधारण मध्यांतराच्या काही काळ आधी येते.

हे गाणे पाहिल्यावर आणि ऐकल्यावर माझ्या मनात एक पावसातल्या रोमान्सचे चित्र निर्माण झाले, पण गाणे पूर्ण वाचल्यावर माझ्या मनात एक वेगळे चित्र निर्माण झाले. प्रेमात पडल्यावर एकमेकांसाठी जाणवणारी एक तळमळ, सगळं समजत असतानाही नक्की काय होतंय हे न कळल्यामुळे ते समजून घ्यायची अधिक ओढ, असे काहीसे चित्र निर्माण झाले. मला वाटतं की योगेशजींचा पिंड मुळात गझलाकाराचा असल्याने त्यात एक आर्तता नकळतपणे झळकून गेली आहे.

रिमझिम गिरे सावन
सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में
लगी कैसी ये अगन
रिमझिम गिरे सावन…||धृ||

या रिमझिम बरसणाऱ्या पावसाने मनात ती ओढ वाढत गेली आहे. ती ओढ धुमसत राहतीये मनात. हा रिमझिम बरसणारा पाऊस मात्र तिला प्रेमात नखशिखांत भिजवून टाकतोय आणि तरीही एक हवीहवीशी आग मनात धगधगत ठेवतोय.

हे बोल जेव्हां पडद्यावर उमटतात तेव्हा मुसळधार पाऊस आपल्याला भेटायला येतो. त्याच्या सोबत घेऊन येतो तिचे त्याच्यावर असलेले प्रेम!

अमिताभ तिला भेटायला गेलेला असतो, पण नेमकी मित्राची एरवी उधार मिळणारी गाडी मिळतच नाही. मौशमीच्या ही आईने तिची गाडी नेलेली असते. आता काय करणार ? श्रीमंत असूनही ती पटकन म्हणते की चल मस्त पावसात भिजत जाऊ ! तेवढाच वेळ त्याच्यासोबत घालवता येणार असतो तिला. तो ही विसरून जातो की हे सूट बूट आपण मित्राकडून उसने घेतले आहेत. पावसाची जादूच अशी काही आहे !

दोघे मस्त हुंदडत जात असतात. अमिताभ तर जितक्या सहजपणे अँग्री यंग मॅनच्या भूमिका निभावतो, तितक्याच सहजपणे रोमँटिक भूमिकाही निभावतो. या गाण्यात तर त्याचा अतिशय सहज वावर आहे. खरं सांगू? या रोमँटिक अमिताभच्या मी प्रेमात आहे. अँग्री यंग मॅन विशेष काही मला आवडत नाही बुआ !

मौशमी जेव्हा अमिताभला काहीतरी दाखवते आणि दोघे हसतात, किंवा दोघे गप्पा मारत जात असतात, तेव्हा आपल्यालाही प्रश्न पडतो की काय दाखवले असेल, काय बोलत असतील ते ? त्या ठिकाणी तिच्या ऐवजी आपण आणि आपला सखा असायला हवा, असे वाटून जाते.

दमून मधेच बसणे, ओल्या पदरानेच तोंड पुसणे, चेहर्‍यावर आलेल्या ओल्या केसांचे झुपके मागे सारणे, उगीच लडिवाळपणे हसणे, मौशमीचा प्रत्येक हावभाव हा जितका निरागस तितकाच भुरळ पाडणारा !

आपल्या प्रेयसीच्या इच्छेखातर सगळे विसरून पावसात मस्त भिजणारा तो तिचा हात पकडून अक्षरशः तिला पळवत पळवतच नेतोय! पण तिलाही ते खूप आवडतंय. त्याच्या ढांगांसोबत चालता चालता तिला पळावं लागतंय, पण ती अगदी आनंदाने पळतिये. त्याचं असं सोबत असणंच तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतंय. त्याच्या असण्याने मौशमीच्या चेहर्‍यावर तो आनंद, उत्साह, समाधान अगदी स्पष्ट दिसतंय. हीच तर सख्याची साथ हवी असते ना प्रत्येक स्त्रीला?

पहले भी यूँ तो बरसे थे बादल
पहले भी यूँ तो भीगा था आँचल
अब के बरस क्यूँ सजन,
सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में…(१)

पाऊस काय दर वर्षी पडतोच ना. दर वर्षी काळे ढग बरसतातच की, दर वर्षी आपण भिजतोच की. पण या वर्षी तो सोबत असण्याने सगळे वातावरणच बदलून गेले. त्या मुसळधार पावसात त्याच्या प्रेमाची ऊब तिला वेढून आपल्या कवेत घेत आहे.

इतकेच नव्हे तर प्रेमात असलेला माणूस जगाला वेगळ्याच चष्म्यातून बघायला लागतो. हा पावसाळा तिला वेगळा भासू लागला आहे. कळून नकळतपणे ती तरी विचार करत राहते की का बरे तो आता वेगळा वाटतोय ?

इस बार सावन दहका हुआ है
इस बार मौसम बहका हुआ है
जाने पी के चली क्या पवन,
सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में…(२)

हा बरसणारा पाऊस जणू तिच्या आत दबलेल्या भावनांच्या आगीला हवा देतेय. मनातला तो प्रेमाग्नी या श्रावणात जरा जास्तच भडकला आहे. तो एकटाच नव्हे तर अख्खा ऋतूच या वेळी अजून बहकल्या सारखा भासतोय. आणि कमी पडले म्हणून की काय प्रणयरस पिऊन वाहणारे वारे त्या आगीला भडकवत आहे.

पण गंमत अशी आहे की हे गाणे नायिकेच्या तोंडी दिलेले नाहीये. नायक आणि नायिका स्वच्छंदपणे एखाद्या फुलपाखराप्रमाणे सगळ्या जगाला विसरून बागडत फिरत असताना पार्श्वभूमीला हे गाणे वाजत असते. हे करण्यामागे दिग्दर्शकाचा काय बरे हेतू असेल असा विचार मनात येतो. कदाचित त्यांच्या जीवनातील येणाऱ्या उलथा पालथीच्या मागे त्यांच्यात वाहणारा एक सुप्त प्रेमाचा प्रवाह दर्शविण्यासाठी असेल कदाचित!

तब्बल ४० वर्षांनंतरही या गाण्याची जादू कायम आहे. पंचमदांचे अवीट गोडी असलेले संगीत, एका बाजूला किशोरदांचा जादुई आवाज तर दुसऱ्या बाजूला लता दीदींचा दैवी आवाज. श्रावणातला रिमझिम पाऊस या गाण्याशिवाय अपूर्णच आहे. जाता जाता मी एवढेच म्हणेन की हे गाणे म्हणजे निव्वळ नॉस्टॅल्जिया आहे. हे गाणे नुसते आठवणे म्हणजे शुद्ध अत्तराची कूपी उघडण्यासारखे आहे. त्याचा गंध तुम्हाला आपल्या कवेत घेतल्याशिवाय राहणारच नाही !

तनुजा प्रधान

– लेखन : तनुजा प्रधान, अमेरिका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. तनुजा, लेख वाचताना गाण्याबद्दल च्या भावना जागृत झाल्या हे गाणं (दोन्ही गायकाचं ) तोडांत अगदी चपखल असं बसलं आहे. हे गाणं अगदी अगदी जवळच व सर्वात आवडतं आहे इतकं सुदंर विवेचन केलं आहे की सतत पुन्हा पुन्हा हा लेख वाचताना तेवढाच आनंद वाढत जाईल. मौसमी व अमिताभ दोघेही आवडते कलाकार . मौसमी हसते तेव्हा तर ती लोभस खळखळून हसणारी अशीच डोळ्यासमोर भासते. तनूजा, हा लेख उच्च, दर्जेदार, मोहक आहे अनेक आभार व असे लेख लिहत जा अनेक आशीर्वाद. धन्यवाद

  2. अप्रतिम लेखन आहे . मी दत्ता सरदेशमुख स्वेच्छा निवृत्त आकाशवाणी निवेदक. गेल्या 2 वर्षात 1700 प्लस ऑडिओ केले आहेत.हे सांगायचं कारण काही चांगलं वाचलं की त्याचा ऑडिओ करण्याचा मोह होतो. हा लेख ही असा च मोहात पाडणारा थोडा दीर्घ आहे ऑडिओच्या दृष्टीनं पण आपण ऑडिओ करण्याची परवानगी दिलीत तर करेन. आपला व्हाट्सअप्प नंबर कळला तर 5 ऑडिओ सॅम्पल पाठवीन . अप्रतिम लेखनाचं पुन्हा एकदा कौतुक 💐☺️

  3. रिमझिम गिरे सावन या गाण्याबद्दल तनुजा प्रधान यांनी सुंदर लेख लिहिलंय.चोहोबाजूंनी गाण्याचे रसग्रहण आणि तेही भावपूर्ण!
    मौसमी चटर्जी यांच्याबद्दल काही नवीन माहितीही मिळाली.या गाण्यात प्रत्येकच प्रेमिकेचे स्वप्न दडले आहे खरे!

    • मेघना ताई, इतक्या सुंदर अभिप्रायाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद!🙏🌺🌿

  4. व्वा अप्रतिम लेख..
    मुंबईचे चिंब पावसातले आगळेवेगळे सौंदर्य या गाण्यात अतिशय सुंदर पध्दतीने चित्रित झालेले आहे.

    • विलास दादा, आपल्या सुंदर अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!🙏🌺🌿

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा