शाहिर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव, जि. सांगली येथे अत्यंत गरीब कुटूंबात झाला. अनुभवाच्या शाळेतच त्यांचे शिक्षण झाले. पोटापाण्यासाठी अण्णाभाउ मुबईला आले तेथून त्यांच्या साहित्य प्रवासाला गती आली.
अण्णाभाऊंनी कथा, कादंबऱ्या, नाटके, प्रवासवर्णन, पोवाडे, लावणी, लोकनाटय या सर्व वाङमयाचे लेखन केले. अण्णाभाऊ साठे यांचे महाराष्ट्र प्रेम त्यांच्या विविध रचनेमधून आपणांस जाणवते.
ही भूमी असे कैकांची | संत महंताची |
ज्ञानवंताची | नररत्नाला जन्म देणार || जी-जी
या पोवाडयातून तसेच
महाराष्ट्र देशा आमच्या महाराष्ट्र देशा ||
आनंदवनभुवन तू भूवरी भूषणी भारतवर्षा ||
या शाहिरीगीतांतून अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्राला भारताचे भूषण मानले आहे. ही दोन उदाहरणे प्रतिनिधीक स्वरुपात सांगता येतील. अण्णाभाऊंच्या शाहिरीने स्वतंत्र स्थान निर्माण केले. 1946 साली अण्णाभाडफ साठे, अमरशेख, द. ना. गव्हाणकर यांनी ‘लाल बावटा’ या कलापथकांची स्थापना केली. आणि त्या कलापथकाने 1950-1960 या काळात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची हाक बुलंद केली.
‘माझी मुंबई’ हे अण्णाभाऊचे गाजलेले लोकनाटय म्हणजे संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीचे प्रेरणा गीतच ठरले होते. त्याचा एवढा प्रभाव पडला की भिंतीवरच्या पोस्टरमधून, घोषणांमधून, सभांमधून ते घोषवाक्यच होऊन बसले.
माझी मुंबई या लोकनाटयात विष्णू हा मराठी कामगार व मूनिमजी हा गुजराती बनिया यांच्यातील संवाद असून ‘मुंबई कोणाची’ या विषयीची जुगलबंदी म्हणजे हे लोकनाटय असून त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या ऐन धामधूमीच्या काळात हे लोकनाटय रंगभूमीवर आले व त्याला अभूतपूर्व यश मिळाले.
यानंतर तो नायक अत्यंत तळमळीने व हक्काने मराठी माणूस मुंबईवर आपला दावा कसा सांगतो हे अण्णाभाऊंनी रेखाटले आहे.
मूनिम – नाना भाषेची | अनंत जातीची ||
तूच मागशी कशी हिला ?
विष्णू – जशी गरुडाला पखं | आणि वाघाला नखं
तशी मुंबई मराठी मूलखाला ||
अर्थात ज्याप्रमाणे पंखाशिवाय गरुड नाही, नखाशिवाय वाघाचे अस्तित्व नाही तशीच मुंबईशिवाय महाराष्ट्राची कल्पनाच होवू शकत नाही हा दुर्दम्य आत्मविश्वास अण्णाभाऊंनी मराठी माणसांच्या मनामनात प्रज्वलीत केला.
‘माझी मैना गावावर राहिली’ या अण्णाभाऊ साठे यांच्या लावणीतील नायक आपल्या पत्नीच्या सौंदर्याचे वर्णन करतो व विरहाने व्याकूळ होतो अशी सौंदर्यवादी वाटणारी ही लावणी अलगदपणे आपल्याला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दृष्टीने चिंतनाकडे घेवून जाते. आणि द्वेभाषिक मुंबई राज्यातही नसलेल्या बेळगांव, कारवार, निपाणी, उंबरगांव, डांग हा भाग महाराष्ट्रापासून तोडल्याने खंडीत महाराष्ट्राची अवस्था कशी झाली होती हे सांगताना अण्णाभाऊ म्हणतात…
गावाकडं मैना माझी | भेट नाही तिची ||
तिचं गत झाली | या खंडीत महाराष्ट्राची ||
बेळगांव, डांग, उंबरगांव मालकी दूजांची ||
अशा पद्धतीने बेळगांव, कारवार, निपाणी तसेच डांग, उंबरगाव या भागातील मराठीजणांचे दु:ख अण्णाभाऊंनी त्यावेळीच मांडले होते. याच लावणीत अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकतेने लढा चालू ठेवावा असे आवाहन करताना…
आता वळू नका | रणी पळू नका ||
बिनी मारायची अजून राहिली ||
अशी गर्जना अण्णाभाऊ साठे करतात.
अण्णाभाऊ साठे हे कलावंत म्हणून तसेच कम्युनिष्ठ चळवळीचे नेते व लेखक म्हणून सर्वांगाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रेसर राहिले. शाहिर अमरशेख, शाहिर गव्हाणकर व अण्णाभाऊ या त्रिकूटाने पोलीसांची नजरचूकवून, शासनाचा बंदीहूकूम मोडून आपल्या शाहिरी व लोकनाटयातून समाजमने जागृत केली.
अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2022/08/IMG_20220801_153633-150x150.jpg)
– लेखन : प्रा. सोमानाथ डी. कदम. कणकवली.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800