केवळ नशिबाला दोष न देता जिद्दीने स्वतःचे भविष्य उज्वल करणारी आदिशक्ती, निर्भीड कणखर महिला जिने संघर्षाला संधी म्हणून पाहिले व आव्हान म्हणून स्वीकारले, वयाच्या अवघ्या पाच वर्षाच्या असताना हरपलेली आईची छाया व आजोबांच्या छत्रछायेत अतिशय साधेपणात मात्र शिस्तीत वाढलेली या चिमूलकलीची गोष्ट सुरु झाली माणिकवाड्या सारख्या खेड्यापासून आणि आज येऊन पोहचली सहायक आयुक्त, कौशल्य विकास उद्योजकता विभाग अमरावती वर्ग अ या पदापर्यंत. तर जाणून घेऊ या सर्वानाच अचंबीत करणारा सौ प्रांजली योगेश बारस्कर यांचा संघर्षमय जीवन प्रवास…...
प्रांजली ताईंचा जन्म दिनांक २६ जून १९८१ यवतमाळ जिल्ह्यातील माणिकवाडा या त्यांच्या आजोळी झाला. आईचा अपघात झाला असून “तुझी आई देवाघरी गेली” हे जेव्हा मावशीने सांगितले तेव्हा प्रांजली होती अवघ्या पाच वर्षाची. देवाघरी जाणे म्हणजे काय ? हे ही तिला माहीत नव्हते. कारण ते वय अतिशय कोवळे होते. नाचण्याचे, बागडण्याचे, खेळण्याचे, आईकडे हक्काने हट्ट करण्याचे. मात्र आज हे चित्र क्षणात बदलले. होत्याचे नव्हते झाले.
मोठी बहीण सहा वर्षाची व एक लहान बहीण अवघी अडीच वर्षाची. या दोघी वडिलांच्या जवळ रहात होत्या. आईच्या अपघाताने बहिणींची देखील ताटातूट झाली हे सांगताना आज देखील प्रांजलीताई अस्वस्थ होतात. सर्वांपासून एका क्षणात त्या दुरावतात.
प्रांजली आता आजी व आजोबांच्या सोबत माणिकवाडा येथे राहू लागल्या. आजी शांता व आजोबा आनंद अंबादास हाते यांनी आई वडिलांची माया लावली. तिला आपलंसं केलं. मायेची पोकळी त्यांनी भरून काढली.
आजोबा अतिशय कडक स्वभावाचे, शाळेतील मुख्याध्यापक होते. गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ति म्हणून त्यांची ख्याती होती. सामाजिक कामात देखील त्यांचा मोलाचा सहभाग असे.
प्रांजलीच्या मनात अनेक प्रश्न असायचे. माझ्या बहिणी कुठे असतील ? कशा असतील ? कशा दिसत असतील ? मला कधी भेटतील ? मावशीच्या साह्याने त्या सर्व बहिणींची पुन्हा भेट झाली तेव्हा प्रांजली ताई होती नववीत तर मोठी बहीण दहावीत. जेव्हा त्या बहिणींना भेटल्या तेव्हा त्यांनी कडकडून मिठी मारली. आनंदाश्रू लपत नव्हते. ही भेट, तो दिवस त्यांना आज ही स्पष्ट आठवतो. संघर्ष म्हणजे काय ? हे मोठया बहिणीकडे पाहून कळाले. ती दहावीत असल्यापासून स्वतंत्र आयुष्य जगत होती व लहान बहिणीचा देखील सांभाळ करत होती. वडिलांशी पटले नाही म्हणून स्वतः शिकवणी वर्ग घेत तसेच बाहेर क्लास वर शिकवायला देखील जात असे. स्वतः बरोबर लहान बहिणीची जबाबदारी मोठया बहिणीने चोख निभावली. एवढ्या लहान वयात एवढा समजूतदारपणा कोठून आला असेल बरे ? ज्याचे कोण नसते ना तेव्हा स्वतः परमेश्वर अदृश्य शक्तीच्या रूपाने त्या व्यक्तीला कणखर बनवतो.
कोठून येते हे बळ ? परिस्थिती मनुष्याला कठोर बनवते. अनेक गोष्टी शिकवते. स्वावलंबी बनवते. जो परिस्थिती वर मात करतो तोच यशस्वी होतो हे आज प्रांजली ताईंना पटले होते. प्रांजली यांची मोठी बहीण ताई, त्यांचे प्रेरणा स्तोत्र होती.
प्रांजली ताईंचे बारावी पर्यंतचे शिक्षण हे माणिकवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. आता आपण ही काहीतरी करावे स्वावलंबी आयुष्य जगावे असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी डी.एड. करायचे ठरवले. मात्र कमी मार्क असल्याने तिथे ऍडमिशन मिळणार नाही हे लक्षात आले.
गावात असताना त्या लग्न समारंभासाठी रुखवंतात लागणाऱ्या वस्तू करू देत. त्यांना आता असे वाटले की याच क्षेत्रात प्राविण्य मिळवून नवीन काहीतरी शिकून यातच करियर करावे. पण नशिबात काही वेगळेच लिहिले होते. एक उज्वल भवितव्य, एक सुंदर पहाट जी उजळून टाकणार होती तिचे भविष्य, तिचे आयुष्य. प्रांजलीने खूप सोसले होते. खूप सहन केले होते. पण आता नवीन काही घडणार होते ज्याची कल्पना प्रांजलीला देखील कधीच आली नाही.
मावशी सौ संध्या पुरुषोत्तम खुटाफळे यांनी प्रांजलीला नागपूर येथे बोलावून घेतले. हिऱ्याची पारख केवळ जोहरीच करू शकतो, त्याप्रमाणे मावशीचा प्रांजलीवर पूर्ण विश्वास होता की ती काहीतरी नक्की करू शकते. मावशीने तिला मातृसेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क या कॉलेज मध्ये जायला सांगितले व केवळ मावशीच्या इच्छे खातर प्रांजलीने तिथे ऍडमिशन घेतली. पुढे त्या अभ्यासक्रमाची गोडी वाटू लागली. आवड निर्माण झाली. हळूहळू त्या वातावरणात प्रांजली रमू लागल्या.
खेड्यातून थेट नागपूर सारख्या शहरात आल्यावर सुरवातीला थोडे जड जात होते. मात्र मैत्रिणींची चांगली साथ मिळाली असे त्या आवर्जून सांगतात. अनेक गोष्टी नवीन होत्या. त्या हळूहळू आत्मसात करत गेल्या. शिकत गेल्या. त्या सायकल चालवायला देखील नागपूरला आल्यावर शिकल्या.
तसे पाहिले तर मावशी काही फार श्रीमंत नव्हती अथवा तिला काहीच जबाबदाऱ्या नव्हत्या अशातला भाग नव्हता मात्र. मात्र त्यांना प्रांजलीच्या डोळ्यामध्ये स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती, जिद्द चिकाटी स्पष्ट दिसत होती. जाणवत होते की प्रांजली भविष्यात नक्कीच यशस्वी होणार. स्वतःचे अस्तित्व निर्माण करणार आणि याच विश्वासाला प्रांजली सार्थ ठरली.
प्रांजली ताईंनी अतिशय चिकाटीने प्रामाणिकपणे बॅचलर ऑफ सोशल वर्क व पुढे मास्टर् ऑफ
सोशल वर्क देखील केले. त्यावेळी या क्षेत्राला फारसे महत्व नव्हते. मात्र सामाजिक क्षेत्राची आवड अथवा हे बाळकडू त्यांना आजोबांकडून मिळाले होते, जे अदृश्य स्वरूपात त्यांच्यामध्ये होते.
मावशीने आईची माया लावली. हा प्रांजलीताईंच्या आयुष्यातील अतिशय सकारात्मक असा टर्निंग पॉईंट ठरला. दिवसेंदिवस त्यांच्यातील आत्मविश्वास वाढत गेला.
त्यावेळी अमरावती येथील एका एनजीओ मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तेव्हापासून सर्व बहिणी एकत्र राहू लागल्या.
या तिघी बहिणींनी आयुष्यात खूप सोसलं होत. मात्र तरीही त्यांची परमेश्वराकडे कोणती तक्रार नव्हती की आमच्याच नशिबी असे का म्हणून ? या कठीण खडतर परिस्थितीने त्यांना कणखर बनवले, स्वावलंबी बनवले. त्यांना लढायला शिकवले व ताठ मानेने जगायला शिकवले.
आता त्या तिघी बहिणी एकत्र राहू लागल्या. प्रांजलीताईंचे कामात मन रमत होते. त्या आवडीचे काम अतिशय आनंदाने करत होत्या. २००५ ते २००७ असे दोन वर्षे त्यांनी तिथे काम केलं.
पुढे लग्नाचे वय झाल्याने आजोबा स्थळ पाहू लागले. त्या वेळी हुंडा प्रथा जोमाने चालू होती. पण २००७ साली अतिशय आधुनिक विचारसरणी असलेल्या अमरावती येथील बारस्कर कुटुंबाने कोणताही हुंडा न घेता, कोणतीही मागणी न करता प्रांजलीचा स्वीकार केला. त्यांचा विवाह झाला व त्या सौ प्रांजली योगेश बारसकर झाल्या.
श्री योगेश मधुकरराव बारस्कर हे आर्टिस्ट असून पेंटिंग व शिल्पकार आहेत. अमरावती येथे त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. सासूबाई श्री नलिनी मधुकरराव बारस्कर या अतिशय आधुनिक विचारसरणीच्या असल्यामुळे पुढे त्यांनी कायम सुनेला साथ दिली.
हुंडा न घेता लग्न करणे ही त्यावेळी खूप मोठी गोष्ट होती. यावरून सासरच्या मंडळींच्या मनाचा मोठेपणा दिसतो. हुंडा ही प्रथा अतिशय चुकीची आहे ते पहिले पाऊल टाकले व समाजाला जणू याची जाणीव करून दिली की येणारी सून हीच तर खरी लक्ष्मी चे रूप आहे.
शिक्षणाबरोबर प्रांजलीताई स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अनेक परीक्षा देत होत्या. लग्नाला तीनच महिने झाले पण जणू त्यांचे नशीब उजळले. त्यांची आदिवासी विकास विभागात स्त्री अधिक्षिका वर्ग ३ या पदावर लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड झाल. ही बातमी कळताच सासरी व माहेरी सर्वच आनंदित झाले.
पण……ही नोकरी करण्यासाठी त्यांना पुन्हा आपले घर सोडावे लागणार होते व त्यात नवीनच लग्न झाले होते. मात्र प्रांजलीताई आपल्या निर्णयावर ठाम होत्या. कारण त्यांनी खूप मेहनत घेऊन हे पद प्राप्त केले होते. आज स्वतःला सिद्ध करण्याची ही वेळ होती. त्यांची जिद्द पाहून कुटुंब देखील त्यांच्या निर्णयाशी सहमत झाले होते, ही अतिशय जमेची बाजू होती.
२००७ मध्ये शासकीय आश्रम शाळा हिवरी, जिल्हा यवतमाळ येथे स्त्री अधिक्षिका म्हणून प्रांजलीताई रुजू झाल्या. मूळ गावापासून दूर……जंगलात…जेथे वाहनांची देखील सोय नव्हती अशा निर्जन ठिकाणी ही आश्रम शाळा होती. पायी प्रवास करून पोहचावे लागत असे. तिथे फारश्या सोयी सुविधा नव्हत्या. मात्र मागे हटेल ती प्रांजली कुठली ? कारण लहानपणापासूनच परिस्थितीशी दोन हात करणारी लढवय्या वृत्तीची प्रांजली आश्रम शाळेत स्वतःच्या परीने जेवढ्या होईल त्या सोयी सुविधा अथवा काही बदल करण्याचा प्रयत्न करत होती. पण तिने हार मानली नाही.
२००८ साली प्रांजलीताईंना दोन जुळ्या मुली झाल्या. तेव्हा सासूबाई स्वतः प्रांजली बरोबर रहात असत. तेथे राहणे सोपे नव्हते. कारण त्या गावात तशा सोयी सुविधा नव्हत्या. हळूहळू जशा मुली नक्षत्रा व कस्तुरी मोठया होऊ लागल्या, त्यांचे शाळेत घालायचे वय झाले तेव्हा हे लक्षात आले. जाणीव होऊ लागली की, मुलींच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी पुन्हा अमरावती येथे जावे लागणार होते व असा आग्रह पतीने देखील केला.
प्रांजलीताईंनी केवळ मला दोन वर्ष द्या अशी पतीला विनंती केली. एक तर दुसरी नोकरी शोधावी लागणार होती अथवा ही नोकरी सोडावी लागणार होती. काय करावे याच विचारात असताना त्यांना जाणीव झाली की स्त्री अधिक्षिका या पदासाठी तेव्हा अभ्यास करण्यासाठी त्यांनी तशी फार मेहनत घेतली नव्हती. अगदी वरच्यावर अभ्यास करून हे यश मिळवले होते. याची जणू त्या क्षणी त्यांना जाणीव झाली.
त्याच वेळी वीज जशी चमकून जाते तसे प्रांजली ताईच्या मनात विचार आला की जर का आपण सर्वस्व पणाला लावले, अभ्यासात शंभर टक्के दिले, खूप मेहनत घेऊन चिकाटीने अभ्यास केला तर नक्कीच या वरचे पद मिळवू शकतो. निर्णय झाला होता तसा त्यांनी एम.पी.एस.सी. या परीक्षेची तयारी सुरू केली.
दिवसभर प्रांजलीताई स्त्री अधिक्षिका म्हणून आश्रम शाळेतील जबाबदारी चोख बजावत. रात्री आश्रम शाळेतील दहावी व बारावीच्या मुलींबरोबर रात्र रात्र जागून अभ्यास करत.एम.पी.एस.सी. ची तयारी ही त्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षांपासून जुळ्या मुलींची आई झाल्यावर सुरू केली होती.
प्रांजली ताई पहात होत्या की एम.पी.एस.सी. या परीक्षेची खरी तयारी ही दहावी बारावी पासून करायची असते. मात्र त्यांच्या मते आपल्याला जेव्हा कधी एखादी गोष्ट मनापासून करावी असे वाटते तेव्हा ती नक्की करावी. कारण वय हा केवळ आकडा असतो. कोणतीही नवीन गोष्ट शिकताना त्याला वयाचे बंधन नसते व नसले पाहिजे असे प्रांजली ताईंचे ठाम मत आहे.
पती श्री योगेशजी बारस्कर हे अमरावती येथे सर्व फॉर्म भरत असत. प्रत्येक परीक्षेसाठी अर्ज करत व प्रांजली ताई या तासनतास अभ्यास करत. न थकता, न दमता, न कंटाळता. फक्त अभ्यास व परीक्षा हे एकच ध्येय दिसत होतं. त्या आपले काम व अभ्यास अतिशय प्रामाणिकपणे करत होत्या.
पती जेव्हा आठवड्यातून एकदा भेटायला येत तेव्हा परीक्षेला लागणारी पुस्तके व आठवड्याभरचे वृत्तपत्र आणत कारण त्या गावात वृत्तपत्र अगदी क्वचित मिळत असे.
अशा वेळी भक्कम साथ होती ती सासूबाईंची. त्या माय माऊलीने जुळ्या मुलींची व घराची सर्व जबाबदारी घेतली होती. केवळ त्याच मुळे प्रांजली ताई अभ्यास व नोकरी करू शकल्या असे त्या प्रांजलपणे कबूल करतात. पतीची भक्कम साथ आपल्या पत्नीचा सामर्थ्यावर असलेला विश्वास, सासूबाईंचे आशीर्वाद व जोडीला प्रांजली ताईंची मेहनत याचे गोड फळ मिळाले.
सासूबाईंनी आईची माया लावली ही खरंच खूप मोठी गोष्ट होती. कारण त्यांची साथ नसती तर आज जे यश मिळवले ते कदापीही शक्य झाले नसते, असे
प्रांजलीताईचे ठाम मत आहे.
दोन वर्षांच्या अथक परिश्रमाने सकारात्मक निकाल लागला. हे अद्भुत होते. विलक्षण होते. कारण त्या पहात होत्या की अनेक वर्षे अभ्यास करून सुद्धा अनेक लोक प्रयत्न करत असतात मात्र या परीक्षेत यशस्वी होणे वाटते तेवढे सोपे नाही. खूप मेहनत घ्यावी लागते. अनेक अपयश पचवून पुन्हा उभे रहावे लागते. जोमाने तयारी करावी लागते.
मुळातच हुशार व जिद्दी असल्याने हे यश प्रांजली ताईंना मिळाले होते. एम.पी.एस.सी.च्या लेखी परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. “सहायक आयुक्त” वर्ग अ
या पदासाठी प्रांजली ताईंची निवड झाली होती. या शिवाय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे गट ब पदी देखील त्यांची निवड झाली होती. अशा दुहेरी यशास त्या पात्र ठरल्या होत्या. पुन्हा आनंदाला उधाण आले. सासरी व माहेरी अभिमान वाटावा अशी त्यांनी कामगिरी बजावली होती. सर्व मंडळी खूप खुश होती.
आणि त्याच वेळी काळाने पुन्हा एकदा डाव साधला. त्यांची लहान बहीण प्रिया हिचा अपघातात मृत्यू झाला. ही बातमी कळताच मनावर खूप मोठा आघात झाला. कारण आज बहिणीच्या या आकस्मिक मृत्यू मुळे तिची बहिणीची मुलगी पोरकी झाली होती ती लहान मुलगी म्हणजे नंदिनी मध्ये पुन्हा बिन मायेचं लेकरू दिसायला लागले. जणू भूतकाळाची पुनरावृत्ती होती. असे अनेक विचारांचे काहूर मनात दाटून आले. मन पुन्हा अस्वस्थ होत गेलं. जणू आनंदावर विरजण पडलं होतं.
प्रांजली ताई पुन्हा एकदा खचल्या. आता ना पदाची इच्छा होती, ना की नोकरी करण्याची. ना की मुलाखतीची तयारी करण्याची. प्रचंड मानसिक ताण जाणवत होता. मन पुन्हा अशांत झालं होतं.
अशा नकारात्मक परिस्थितीत आठवले ते आजी, आजोबा ज्यांनी शिस्त लावली. त्यांना शिकवले, घडवले, आठवली ती मावशी जिने आईची माया लावून, पदरमोड करून प्रांजलीचे शिक्षण पूर्ण केले. आठवली ती मोठी बहीण, तिचा संघर्ष आणि आठवली ती अद्भुत अदृश्य स्वरूपात असलेली ती आईची शक्ती, तिचे संस्कार जे फार काळ जरी नव्हते तरी आईची माया, तिचे प्रेम हे राहून राहून आठवू लागले.आठवली आपल्या पतीची मेहनत. त्यांनी भरलेला प्रत्येक फॉर्म. त्यांनी ठेवलेला विश्वास आणि हो आठवली ती आपल्या आईरूपी सासूचे त्याग, समर्पण. आठवले ते विद्यार्थ्यां बरोबर केलेले जागरण. आठवली आपल्या गुरुजनांची शिकवण त्यांनी दिलेल्या मोलाचा सल्ला, त्या सूचना.
पुन्हा मन घट्ट केले. आता पुन्हा एकदा उभे रहायचे ठरवले, या सर्वांसाठी. कारण या सर्व कुटुंबियांची, नातेवाईकांची साथ होती. वेळोवेळी त्यांनी प्रोत्साहन दिले होते. त्यामुळेच ही वाटचाल सुखरूप व सोयीची झाली होती. त्यामुळे ही लढाई एकटीची नव्हती तर या सर्वांची होती. त्यांनी ठेवलेल्या विश्वासाची होती.
जसजशी मुलाखतीची तारीख जवळ येऊ लागली तसतशी मनावर दगड ठेवून मुलाखतीची तयारी करू लागल्या.
ज्या लोकांची एम.पी.एस. सी.मध्ये निवड झाली होती, ते पद, ती नोकरी मिळाली होती त्या अनेकांची प्रत्यक्ष जाऊन प्रांजलीताईंनी भेट घेतली. कशा पध्दतीने त्यांनी मुलाखतीची तयारी केली ? कसे प्रश्न विचारले जातात ? त्याचा त्या अभ्यास करू लागल्या. अत्यंत सकारात्मक दृष्टीकोण ठेवून त्यांनी मुलाखत दिली.
आता निकाल ही सकारात्मक आला. अतिशय आनंदाची बातमी मिळाली होती की प्रांजली ताईंची सहायक संचालक गट अ पदी निवड झाली आहे व गट ब शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पदासाठी देखील त्या पात्र ठरल्या होत्या.
सासरी व माहेरी आनंदाला उधाण आले. आज त्यांच्या कष्ठाची पोच पावती मिळाली. आज त्या माहेर व सासरच्या परिवारातील पहिल्या क्लास वन ऑफिसर झाल्या होत्या. आज प्रांजली ताईंना आईची खूप आठवण येत होती. आज त्या खूप रडल्या पण ते आनंदाश्रू होते.
त्यांच्या या यशस्वी वाटचालीसाठी अनेकांची भक्कम साथ होती. जसे की आजी, आजोबा, बहिणी, मावशी, पती, सासूबाईं, समजूतदार मुली, सर्व नातेवाईक व आईचे आशीर्वाद.
सहायक आयुक्त, कौशल्य विकास व उद्योजकता म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग यवतमाळ येथे झाली. तेथे त्या चार वर्षे कार्यरत होत्या. तेव्हा रोज येऊन जाऊन करत. पुढे दुसरे पोस्टिंग अमरावती येथे झाले होते. आज त्या बुलढाणा येथे कार्यरत असल्याने आठवड्यातून केवळ एकदाच घरी जाऊ शकतात. नोकरीत कार्यरत असल्याने आजही घरची जबाबदारी पती व सासूबाई सांभाळतात.
सहायक आयुक्त या उच्च पदी कार्यरत असल्याने कौशल्य, रोजगार, विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाची जबाबदारी चोख बजावत असताना अनेक कटू गोड अनुभव आले असेही त्या सांगतात. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. या क्षेत्रात मान सन्मान तर मिळतोच मात्र जबाबदारी देखील तेवढीच मोठी असते जी आज त्या अतिशय प्रामाणिकपणे बजावण्याचा सर्वस्वी प्रयत्न करत आहेत.
या विभागात प्रमुख तीन गोष्टींचा समावेश असतो ते म्हणजे रोजगार, कौशल्य विकास व उद्योजकता. कामाचा व्याप देखील खूप आहे. मात्र त्यातही आनंद व समाधान आहे स्वतःला सिद्ध केल्याचा.
आपल्या आयुष्यातील संघर्षमय परिस्थिती आपल्याला कणखर बनवते व खूप काही शिकवून जाते. त्यामुळे नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा त्याच्याशी दोन हात करून संघर्षाला आव्हान म्हणून स्वीकारले तर नक्कीच चमत्कार होऊ शकतात. एम.पी.एस.सी.अथवा कोणतीही परीक्षा असो फक्त प्रचंड इच्छाशक्ती, केलेल्या नियोजनाची अमलबजावणी व सातत्य आणि जोडीला संयम आणि हो त्या जोडीला सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्कर्म, सत्कार्य, चांगुलपणा, कामातील प्रामाणिकपणा असला की जोडीला लाभतात ते शुभ आशीर्वाद, शुभेच्छा, गुडविल जे मनुष्याला अनेक संकटातून तारून नेते. लढायला बळ देते असे प्रांजली ताईंचा तरुणांना लाख मोलाचा संदेश आहे.
लग्नानंतर जर पतीने आपल्या पत्नीच्या स्वप्नपूर्तीसाठी, तिच्या करियर साठी प्रोत्साहन दिले, भक्कम पाठिंबा दिला, तिच्या कला गुणांचा आदर केला, ते वाढीसाठी प्रेरणा दिली, घरच्या जबाबदारीत तिला मदत केली व जर प्रत्येक सासूने आपल्या सुनेला आपल्या मुलीप्रमाणे तिचे करियर घडवायला, तिचे अस्तित्व निर्माण करायला साथ दिली तर अशा कितीएक प्रांजली तयार होतील असे त्यांचे ठाम मत आहे.
आयुष्यात प्रत्येक व्यक्ती चुकत असते. चुकांना घाबरायचे नसते कारण त्यातूनच आपण शिकत असतो. केवळ एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्या चुका सुधारल्या पाहिजे व पुन्हा त्या चुका होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे असे प्रांजली ताईंचे मत आहे.
सद्या प्रांजली ताई व घरची मंडळीनी मिळून नुकत्याच एका एनजीओ ची स्थापना केली आहे. आजोबांच्या नावाने सुरू केलेल्या ‘आनंदवड’ मुळे अनेक ज्येष्ठाना नक्कीच मोलाची मदत होईल व त्यांना एक आधार मिळेल. येथे मायेची आपली माणसे असतील जी काळजी घेतील. त्यांचा सांभाळ करतील हाच या आनंदवडाचा प्रमुख उद्देश असेल असे त्या सांगतात व तसे प्रयत्न जोमाने सुरू आहेत.
यश हे कधीच एका रात्रीत मिळत नाही. अनेक वर्षांचे कष्ट, त्याग समर्पण असते जे भविष्य उज्वल बनवते व लोकांसमोर एक उदाहरण ठरते. केवळ नशिबाला दोष देऊन चालत नाही तर आपले नशीब आपल्याच हाती आहे व ते सर्वस्वी आपणच घडवायचे असते, हेच या यशकथेतून प्रकर्षाने जाणवते. अशा या हरहुन्नरी, शांत, प्रेमळ, मायाळू व अतिशय नम्र व्यक्तिमत्व लाभलेल्या प्रांजली
ताई नक्कीच सर्व महिलांसाठी एक आदर्श आहे. त्यांचे सर्व कुटुंब समाजासाठी निश्चितच एक आदर्श कुटुंब आहे.
प्रांजली ताईंना त्यांच्या भावी योजनांसाठी अनेक शुभेच्छा.
– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800.
I got a lot of inspiration.
लहापणापासूनच संघर्षमय जीवनातून स्वकर्तृत्वाने प्रेरक व्यक्तिमत्त्व घडविणारी प्रांजली… सहजीवनाचे नाते जुळल्या पासून तुझ्या संघर्षाचा, जिद्दीचा मी साक्षात साक्षीदार असल्याचा मला अभिमान आहे..I am very fortunate that you are my better half…! रश्मी ताई आपले विशेष आभार तुम्ही इतका छान प्रांजलीचा जीवन प्रवास तुमच्या लेखणीतून मांडल्याबद्दल…! वाचतांना सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहत होतं. ही तुमच्या लेखणीची कमाल आहे. सोबतच भुजबळ सरांचे सुद्धा विशेष आभार त्यांनी त्यांच्या व्यासपीठावर ही संधी उपलब्ध करून दिली. ज्यामुळे मला विश्वास आहे बऱ्याच जणांना प्रेरणा मिळणार आहे..
Pranjali tie Tumhala khup khup subheccha
Very inspiring …. Proud of u Pranjali mam… Keep it up.👏👏
प्रांजली तुझे खूप अभिनंदन.
तुझा जीवन संघर्ष खरंच आम्हा सर्वांकरिता खूप प्रेरणादायी आहे. तुझ्यासारखे जिद्द सर्वांमध्ये आली तर प्रत्येकाच्या जीवनाचे स्वरूप पालटून जाईल हे नक्की. तुझ्या प्रयत्नांना व त्यातून मिळालेल्या तुझ्या घवघवीत यशाला कोटी कोटी नमन.
रश्मी ताई छान लेख
प्रांजली तुझा खूप अभिमान आहे. तू खरंच प्राणाची ओंजळ आहे. प्रांजली च्या संघर्षाला खूपच समर्पक अशी शब्दरचना आहे. ओघवती भाषेने जिद्दी ला, चिकाटी ला कणखरतेचे कोंदण प्रदान केले आहे. खूप खूप धन्यवाद हेडे मॅडम आणि भुजबळ सर. आपले मनस्वी अभिनंदन आणि या रत्नपारखी प्रकल्पास अनेक शुभेच्छा 🙏
अतिशय प्रेरक जीवन प्रवास.. अनेक तरुणांना यातून प्रेरणा मिळेल.. प्रतिकूल परिस्थिती तुमच्यातील असामान्य प्रगतीसाठी गुरु बनते. तुमच्यातील जिद्द जागी ठेवते. अस्मिता जागृत करते आणि तुम्ही यशाचे उत्तुंग शिखर गाठू शकता. ताईच्या या यशकथेतील जिद्दीला परिश्रमांना सलाम, हार्दिक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा. तसेच लेखाबद्दल मनापासून धन्यवाद