आज नागपंचमी आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख….
सुप्रसिद्ध कवयत्री बहिणाबाई यांचा जन्म १८८० साली नागपंचमीस झाला. त्यांच्या जीवनात एक अविस्मरणीय प्रसंग घडला.
त्यांचा मुलगा (सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी) तान्हा असताना त्याला टोपलीत घालून त्या शेतावर गेल्या. आम्ब्याच्या झाडाखाली टोपली ठेवून त्या शेतात काम करु लागल्या. थोड्या वेळाने त्यांचे टोपलीकडे लक्ष्य गेले तर टोपलीजवळ नाग फणा काढून डोलत होता तर टोपली उपडी पाडून बाळ नागासोबत खेळत होता.
ते दृश्य पाहून बहिणाबाई घाबरल्या. त्यांनी नागोबाला हात जोडून विनंती केली की तुला शंकराची शपथ आहे तू माझ्या बाळाला दंश करु नकोस. त्यांनी परमेश्वराचा सुद्धा धावा केला. योगायोगाने लहान बालकाशी खेळणारा नाग बालकाला काहीही न करता निघून गेला.
बहिणाबाईंनी या दैवी चमत्काराबद्दलची हकीगत फार सुंदर रितीने काव्यात वर्णिली आहे.
ऐकू ये आरायी
धावा, धावा, घात झाला
अरे धावा लवकरी
आम्ब्याखाली नाग आला,
फना उभारत नाग
व्हता त्याच्यामंदी दंग
हारा उपडा पाडूनी
तान्हा खेये नागासंग
हात जोडते नागोबा
माझं वाचव रे तान्हा
अरे नको देऊ डंख
तुले शंकराची आन
आता वाजव, वाजव
बालकिसना, तुझा पावा
सांग सांग नागोबाले
माझा आयकरे धावा
तेवढ्यात नाल्याकडे
ढोखऱ्याचा पावा वाजे
त्याच्या सुरांच्या रोखाने
नाग गेला वजे वजे
तव्हा आली आम्ब्याखाली
उचललं तानक्याले
फुकीसनी दोन्ही कान
मुके कितीक घेतले
देव माझा रे नागोबा
नही तान्ह्याले चावला
सोता व्ह्यसनी तान्हा
माझ्या तान्ह्याशी खेयला
कधी भेटशीन तव्हा
व्हतीत रे भेटीगाठी
येत्या पंचमीले
आणील दुधाची रे वाटी
असा नागाच्या संदर्भातील अनुभव अनेकांना आला असेल. बहिणाबाई यांनी मात्र स्वतःच्या अनूभवाला काव्यात गुम्फुन नाग हा मानवाचा मित्र आहे हे सिध्द केले आहे.
– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी. कर्जत-रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मराठीतील ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाईंनी मनात घर करणारी आठवण सुरेख.