स्त्रियांचे वाड्.मयीन कर्तृत्व
स्त्री-पुरुषांमध्ये समान वागणूक ठेवणाऱ्या स्वामींनी ज्ञानदानातही कधी फरक केला नाही. महदाईसाने विचारलेल्या प्रश्नांचे त्यांना भूषण वाटत असे, महदाईसे संबंधी स्वामींनी म्हटले आहे की , “महदाइसा ही जिज्ञासू आणि चर्चक असून, ती नेहमी आम्हाला काहीतरी विचारत असते.” यावरून चक्रधर स्वामींनी स्त्रियांच्या चिकित्सक प्रतिभेची प्रशंसा केल्याचे दिसून येते. यावेळी अनेक स्त्रिया महानुभाव पंथात आल्या. स्वामींच्या संन्निधानी जवळपास ९५ स्त्रिया आणि असंन्निधानी जवळजवळ ६५ स्त्रियांचा समावेश पंथात झाल्याचे दिसते. यापैकी काही स्त्रियांनी वाड्मयीनदृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. स्त्रियांना स्वांमीच्या माध्यमातून उत्तम मार्गदर्शक लाभले होते. त्यामुळेच महानुभाव संप्रदायात बाईसा, महदाइसा, कमळाइसा, हिराईसा, आउसा, देमाईसा, पोमाइसा, उमाईसा, नागाइसा अशा कितीतरी स्त्रियांचे उल्लेख येतात.
शके १२३० च्या दरम्यान महाराष्ट्रावर दिल्लीच्या सुलतानाची स्वारी झाली. त्या खालसाच्या धाडीमुळे सर्व महाराष्ट्रात ढवळून निघाला. याच काळात म्हाइंभट्टांने निर्माण केलेला लीळाचरित्राचा मूळपाठ नष्ट झाला. धाडीत हा स्मरणग्रंथ गेल्यानंतर ज्यांना -ज्यांना त्या लीळा पाठ होत्या त्यांनी-त्यांनी लीळाचरित्राचे नवीन पाठ तयार केले. या स्मरणग्रंथाच्या पुनर्निर्मितीमध्ये अनेक स्त्रियांनी वेगवेगळे पाठ तयार करून योगदान दिल्याचे दिसून येते. त्यामध्ये नागदेवाचार्यांची शिष्या कमळाइसा व त्यांची शिष्या हिराईसा ही प्रमुख असली तरी इतरही स्त्रिया लीळाचरित्र बांधणीत सहभागी होत्या. सर्वांचेच पाठ ग्राह्य मानल्या गेले नसले तरी त्यांचे कर्तुत्व नजरेआड करता येत नाही.
हिराईसा, मदाळसा, कुमाराइसा, म्हाळाइसा, नाती नागाइसा, पंडितांची हिराईसा, उपाध्ये कमळाइसा, कुमरे रेमाइसा, बोचरी धानाइसे, घायाळे लुखाईसे, कानडी लुखाईसे, नामा इसे, लाखाइसे, नागाइसे धाना इसे या महानुभाव स्त्रियांनी वेगवेगळे पाठ तयार करून आपल्या बुद्धीचातुर्याचा व ज्ञानाच्या अधिकाराचा प्रत्यय दिला. ही खरोखरच प्रशंसनीय बाब म्हणता येईल.
श्री चक्रधर स्वामींच्या तत्त्वज्ञानाची व्यवस्थित मांडणी करण्याचे काम श्रीनागदेवाचार्यां च्या सहवासात केसोबासांनी सुरू केले. याच काळात स्वामींच्या वचनांचा अर्थ स्पष्ट करणारे ‘लक्षण’ राजूरकर लक्ष्मीधरभटानी लिहिले. त्यानंतर धाडी नागाईसाने दुसरे ‘लक्षण’ आणि सिद्धांते हरिबासांनी शोधनीचे लक्षण तयार केले. या ‘लक्षणा’ प्रमाणे असलेला टीकेचा दुसरा प्रकार म्हणजे टाचणी होय.
या टाचण्यातून तीनही स्थळांची निर्मिती झाली. या टाचण्यांचे लेखक २४ पक्षकार आहेत. २४ पक्षकारात कमळाइसे, नाती नागाइसा, धाडि नागाइसा, हिराईसा व आबाइसे खांबणीकर या सहा विदुषींची नावे आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे. श्रीचक्रधर स्वामींच्या तत्त्वज्ञानाची बैठक घालून देण्यात या सहा विदुषींचाही महत्त्वाचा वाटा होता हे लक्षात येते. महानुभाव पंथाच्या सुरुवातीच्या काळात ज्ञात विरक्त स्त्रियांनी पक्षाच्या माध्यमातून सूत्राचा अर्थ शोधण्याचे कार्य केले. हा स्त्रियांचा असणारा सहभाग त्यांच्या विद्वत्तेचे धोतक आहेत. अशा अनेक स्त्रियांनी महानुभाव संप्रदायात आपले वाड्.मयीन दृष्टिकोनातून श्रेष्ठत्व सिद्ध केलेले आहे. (क्रमशः)
– लेखन : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800