आकाशाशी नाजूक नाते काळ्या मातीचे
क्षितिज गाई गाणे मधु अगाध प्रीतीचे
सोन वस्त्रे लेऊन रवी आला तळपत
गाली लाली प्राची येई लाजत मुरकत
गंधित वारा मुक्त हिंडे झाडाझाडातून
गोड गुपित सांगे त्यांना उराउरी भेटून
शाल उन्हाची लेऊन ते खुदुखुदू हासती
डोलून झाडे पानातूनी कुहूकुहू गाती
कुणी उधळली चांद फुले निशेच्या प्रांगणी
चंद्र घेई फिरकी त्यांची ढगा आड लपुनी
असे असावे आनंदाचे जिणे अन् जगणे
प्रेम लुटून सदैव घ्यावे आनंदाचे उखाणे
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2022/05/IMG_20220518_104808-150x150.jpg)
– रचना : शुभदा दीक्षित. पुणे
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800