गतस्मृतीची पाने उलटताना डोळ्यासमोर येते, ती एक ४-५ वर्षाची, चाळीतल्या मुकादमाच्या दारात वड्याच्या आशेने उभी राहिलेली निष्पाप, निरागस, अल्लड मुलगी.
त्यावेळी आसपास कोकणातील मालवणी भाषिक कामगारवस्ती. सुतारकाम करणारे कोकणातून पोटापाण्यासाठी मुंबापुरीत येवून धडपड करणारे, जुन्या परंपरा जपणारी, फणसाच्या गऱ्यासारखी रसाळ, भाषेत गोडवा असणारी प्रेमळ माणसे. मागील बाजूस रोडवर असलेले मधून मधून गुलगुले पाठवणारे मद्रासी हॅाटेल.
म्हाडाच्या लॅाटरी पध्दतीमुळे म्हाडा वसाहतीत स्थलांतर झाले. पहिली दुसरीला त्यावेळी मुन्सिपालटी शाळेत दुधाची बाटली, चण्या शेंगदाण्याच्या पुड्या मिळायच्या. दुसरीचे गोसावी सर महाडचे, पुढे चवदार तळ्यामुळे लक्षात राहिलेले. दफ्तर म्हणून बाबांनी आणलेली अँल्युमिनियमची पेटी त्याचबरोबर दिलेली शिकवण “आपली वस्तू हरवली तरी चालेल, पण दुसऱ्या ची वस्तू चोरायची नाही“
त्याकाळी सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजा व्हायच्या. गच्चीवर पताका तोरण बनवायचे. लाऊडस्पिकर वरून गाणी लागायची. रात्री रस्त्यावर सिनेमा दाखवायचे. ‘या मालक‘ सिनेमा मधली रात्रीच्या किर्र काळोखातून घुंगराचा आवाज करून जाणारी बैलगाडी अजून डोळ्यासमोर येते. पुढे दूरदर्शन चा जमाना आल्यावर ‘मदर इंडिया‘ सिनेमा पहाण्यासाठी मामाकडे गेल्यामुळे शाळेला दांडी झालेली आठवते. शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षक होवून एक दिवसाचा खलिफा होण्याचा आनंद विरळाच ! मनसोक्त खेळण्याचा आनंद घेत घेत हळुवार पावलांनी बालपण संपून तारूण्यात पदार्पण होत होतं.
शाळेचा निरोप घेऊन आयुष्याच्या नव्या वळणावर पाऊले वळली. ‘ॲाखियों के झरोखे से मैंने देखा है सावरीया’, ‘हम बने तुम बने एक दुजे के लिए‘ ही मनात खऱ्या प्रेमाची महती बिंबवणारी त्याचबरोबर अमिताभ बच्चन चा अँग्रियंग मॅन मनात ठसत होता. कॅालेजच्या वाटेवरून नोकरी च्या वाटेवर पावलं कधी वळली ते कळलंच नाही.
स्वकमाईचा एक वेगळाच आनंद असतो. डोळ्यासमोर वडिलांनी उपसलेले अतोनात कष्ट, आईने केलेली खर्चाची तोंडमिळवणी येत होती. पैशाची मेहनतीची किंमत कळत होती. काटकसरीची जाणिव होत होती. मैत्रिणींच्या संगतीत कलाकौशल्य, भरतकाम, रूखवतातील कलात्मक वस्तू एकमेकींच्या संगतीने शिकायला मिळत होत्या. अनुभवाच्या गाठीत भर पडत होती. ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’, ‘दिसतं तसं नसतं‘ या उक्तीचा अनुभव येत होता. हृदयाची पाटी कोरी असताना बघण्याचा कार्यक्रमातून शुभमंगल झाले. अल्लडपणे झालेला गृहप्रवेश.
ही वाट दूर जाते‘, स्वप्नामधील गावा ‘म्हणत भान हरपून गेलेली नवतरुणी काश्मिरी आणि ‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना’ म्हणणारा रसिक बलमा. गोव्याच्या समुद्र किनारी कधी जन्म जन्मातरीच्या नात्यात गुंफून गेलो कळलेच नाही. नकळत शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले. स्वाभिमानी, प्रामाणिक, मातृभक्त मिष्किल‘, ‘सौ सोनार की एक लोहार की‘ सारखा हजर जबाबी वृश्चिक राशीचा, आयुष्याशी, जीवनाशी लढा देणारा जोडीदार. नियतीच्या आघातामुळे जीवनाच्या घडीचा डाव अर्धवट सोडून गेला.
मरणोपरांत नेत्रदान करून अमर झाला. सतारीला पुन्हा लयबद्ध करण्याचे सामर्थ्य देवून गेला. हळूवारपणे जपत, सांभाळत जीवनाच्या सप्त सुरांशी सांगड घालत सतारीला हळूवार गोंजारता गोंजारता नकळत अलगद सप्त सूर उमटू लागले, पंखांना बळ आले आणि पिलाने जमिनीत नाळ रोवून आकाशी भरारी घेतली.
प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं. पणतु व्होया म्हणणाऱ्या आजेसासुबाई पणती झाल्यावर तिला मांडीवर घेऊन वात्सल्याचा वर्षाव करायच्या. मऊशार गोधड्या बनवायच्या. दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त जपणाऱ्या सासुबाई. समाजकार्याला वाहून घेणारे सासरे व संसाराची आर्थिक बाजू समर्थपणे पेलणाऱ्या सासुबाई, झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीची जाणिव करुन देणारी होत्या. दु:खाला ही क्षणभर फुंकर, पहावा उगवता दिनकर ही शिकवण देणारी सासरची माणसं. स्वतः चं दु:ख मनात ठेवून इतरांना आनंद देणारा देवाचा लाडका माझा भाऊ, आयुष्यावर ठसा उमटविणारे होते.
आयुष्याच्या या क्षणी नकळत घडलेल्या गोष्टी आठवतात. नियतीचे डाव आपल्याला ओळखता येत नाही. जसे विधी लिखित होते तसे घडते पण नकळतपणे आपला हातभार लागलेला असतो किंवा नियती ते घडवत असते पण आता असे वाटते कि कालचक्र पुन्हा मागे फिरवता आले असते तर ? भविष्याचा वेध घेता आला असता तर .. काही दैवी आघात टाळता आले असते का ? दैवलिखत ! घटाघटाचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे ! याची प्रचिती येते.
आता आयुष्याच्या उंबरठ्यावर मन स्थिरावलं आहे. मी माझ्यातल्या मनाला स्वैर फिरायला मोकळीक देत आहे. पुन्हा नव्याने आनंदाचे क्षण वेचते आहे. जे परमेश्वराच्या जवळ आहे त्यांच्यात आनंद शोधते आहे. त्यांची केलेली सेवा परमेश्वराला पोहचते असं म्हणतात. पुन्हा एकदा पाटी कोरी करून त्यावर ज्ञानाची अक्षरे कोरते आहे.
जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय । कवी भा. रा. तांबे यांनी यात जीवनातील सत्य सांगितले आहे. शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. अज्ञात विश्वाचा वेध घेवून अनंतात विलीन होणे. मृत्यू म्हणजे जीवनाचा शेवट. सर्व सुखदुःखाच्या संवेदनांच्या पार. एक स्वप्नवत शांत निद्रा.
माझ्यावर प्रेम, विश्वास ठेवणारे नातेवाईक, मैत्रिणी, नकळत अज्ञात राहून आधार देणारे जीवलग यांची मी आजन्म ऋणी आहे. जीवनाच्या वाटेवर अचानक वाटसरू सारखे येवून मुलीला निस्वार्थ भावनेने ज्ञानार्जन देवून गुरू दक्षिणा न घेता कृतार्थ झाल्याची भावना व्यक्त करणारे शर्मा सर, देवस्थळी पती-पत्नी सारखे शिंपल्यातले अनमोल मोती स्मृतीपटलावर कायम रहातील. आईला सतत जपण्याच्या प्रयत्नात असलेली लाडकी लेक माझी आजन्म ठेव आहे.
जीवनात अनेक वेळा मृत्यू हुलकावणी देऊन गेला. लहानपणी इंफेक्शन होवून जीवावर बेतण्यापासून मला वाचवणं ही माझ्या वर दैवीकृपाच होती. टोकदार टोचा घेऊन माझ्या दिशेने येणाऱ्या वेडसर व्यक्तीने मला इजा न करता ओलांडून पुढे जाणं हे अनाकलनीय आहे.
रस्ता क्रॉस करताना अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या बसला सिग्नल देवून थांबवणारी नियती. रोलर कोस्टल राईड मध्ये हृदयाची स्पंदने नियमित ठेवणारी, युटर्न वेगाने मारणारी व मागे न पाहता अंगावर येणारी टॅक्सी पासून वाचविणारी, सतत माझ्या मागे रक्षणासाठी उभी असलेली एक अनामिक शक्तीची मी सदैव ऋणी आहे!
गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रमात प्रवेश झाला आहे. आयुष्याच्या अंतिम पर्वाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ‘फिरून जन्म घेईन मी’ म्हणत अलगद नियतीच्या कुशीत शिरणार आहे …

– लेखन : डॅा विद्या मंत्री. ह. मु. अमेरिका.
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप हृदयस्पर्शी लेख. विद्या मॅडम तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
विद्या, आयुष्यातले उतार चढाव खूप छान वर्णन केले आहेस प्रत्येक प्रसंगाचे डोळ्यांपुढे चित्र उभे राहिले
खूप मार्मिक पणे लेख लिहिला आहेस खूप छान!!!!!
मी पाहिलेली मंत्री मॅडम इतकी भाऊक आहे हे मला पहिल्यांदा समजलें. आयुष्यातील घेतलेले निर्णय निर्भयपणे पार पाडणे सोपे नसते. शेवट गोडच होईल. अनामिक शक्ती नक्कीच मदत करेल.लेख खरच सुंदर.
मंत्री खूपच छान लिहिले आहेस अगदी भावूक झाले मी.तूला खूप खूप शुभेच्छा भरपूर अभिनंदन👍👌
🙏निश्चितच होईल, खूप छान वेगवान आयुष्यपट मांडताना वाक्यरचना सुंदर ठरते आहे. थोडंसं आई, वडील मित्र मैत्रिणींबद्दल लिहिले असते तर हा लेख परिपूर्ण झाला असता. तरीही आवडला 🙏👍
खुपचं भावूक लेख .छानवाटल पण लेख वाचताना समाधानाने निश्चिंत झाल्यासारखे 👌👌👌👌
आयुष्याबद्दल तटस्थ वृत्तीने केलेला विचार व मागे वळून पहाताना आयुष्याचा घेतलेला आढावा… दोन्ही सुंदर 👌👌