ठाणे व पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात “प्रसाद चिकित्सा” ही स्वयंसेवी संस्था विविध प्रकारचे उपक्रम राबवित असते.
संस्थेने तानसा खोऱ्यात आरोग्य सुविधेबरोबरच पिण्याचे पाणी व स्वच्छता यावर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. हागणदारीमुक्त गाव या कार्यक्रमातंर्गत सुमारे नऊशे घरांना शौचालय बांधणीसाठी साह्य केलेले आहे. शाळांसाठी नविन शौचालयाची उभारणी व नादुरुस्त शौचालयांची पुर्नबांधणी, पिण्याच्या पाण्यासाठी विहीरींची खोदाई व जिर्ण विहिरींचे नुतणीकरण, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण संचाचे वाटप, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी शोषखड्डा असे नानाविध उपक्रम संस्थेने हाती घेतलेले आहेत. शौचालय बांधणीच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानाला देत असलेल्या योगदानाबद्दल पालघर जिल्हा परिषदेने संस्थेला पुरस्कार प्रदान करुन गौरवलेले आहे.
संस्थेच्या माध्यमातुन नुकतेच दोन उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.
पहिल्या उपक्रमात पालघर जिल्ह्यातील नेवाळ पाडा या जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या, अतिशय दुर्गम म्हणून प्रचलित असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुला, मुलींसाठीसाठी अद्ययावत शौचालय संकुल उभारण्यात आले.
उद्घानप्रसंगी स्थानिक सरपंच, शाळा केंद्रप्रमुख, गुरुदेव सिद्धपिठ व प्रसाद चिकित्सा पदाधिकारी, पालकवर्ग इ. मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी पदाधिकारी व गावकरी यांनी संस्थेने केलेल्या दर्जेदार कामाची प्रशंसा करून भविष्यात सुद्धा असेच योगदान देत रहावे असे आवाहन केले.
या संकुलामध्ये मुला मुलींसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था, पाण्याची टाकी व नळ, हात धुण्यासाठी वॉश बेसिन, अदयावत पाणी शुद्धीकरण यंत्रणा ई. बाबीं आहेत. या सुविधेमुळे स्वच्छते बरोबरच मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा निकालात निघालेला आहे.
या शाळेत इयत्ता चौथी पर्यंत वर्ग असून गरीब, आदिवासी समाजातील सुमारे ५० मुले – मुली शिक्षण घेत आहेत.
शौचालय व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाल्यामुळे छोटे बालगोपाळ, त्यांचे गुरुजी आणि पालक वर्ग यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या संदर्भात शालेय शिक्षक श्री. जगदीश पाटील यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. ते म्हणाले की, “गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून शाळेतील मुलांसाठी शौचालयाची व्यवस्थित सुविधा नव्हती. पडक्या, नादुरुस्त शौचालयामुळे मुलांकडून त्याचा वापर होत नव्हता. नळ सुविधा नसल्यामुळे अस्वच्छता, दुर्गंधी याचा सामना करावा लागायचा. त्यामुळे आमची मुले उघड्यावर जाणे पसंत करत. शौचालय वापरण्याची मुलांची सवयच पुर्णपणे नाहिशी झाली होती. पण आता ही सुविधा प्राप्त झाल्यामुळे मुलांबरोबरच शिक्षकांची सुद्धा मोठी गैरसोय दूर झालेली आहे. शौचालयाचा नियमित वापर व स्वच्छतेच्या इतर सवयी मुलांमध्ये रुजवण्यासाठी आता आम्ही मेहनत घेणार आहोत.
संस्थेच्या दुसऱ्या उपक्रमांतर्गत, ‘झाडे लावा झाडे जगवा’ या उक्तीप्रमाणे तसेच आर्थिक उत्पादनात शाश्वत वाढ व्हावी म्हणून आपआपल्या शेतात लागवड करण्यासाठी तानसा खोऱ्यांतील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील एकूण ४१० पुरूष, महिला शेतकऱ्यांना १३७७० विविध फळ रोपांची कलमे देण्यात आली.
या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवीन बदल घडून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास निश्चित मदत होणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, मृदा संवर्धन, पाण्याचे पुनर्भरण व हवा प्रदूषण रोखण्यासाठी मदत होणार आहे. या वृक्षाची भविष्यात गोड फळे या शेतकऱ्यांना खायला मिळणार आहेत. शिवाय यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आर्थिक वाढ होणार आहे हे निश्चित !
या प्रसंगी शेतकऱ्यांना फळबागेची लागवड कशी करावी, त्याचे व्यवस्थापण, निगा व सुरक्षा आणि सर्व रोपे कशी जगवावित याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. २००८ पासून संस्थेने फळबाग लागवड उपक्रमातंर्गत सुमारे साठ हजारांहून जास्त झाडांचे वाटप केलेले आहे व हा उपक्रम अव्याहातपणे चालू आहे. उत्पन्न देणारे साधन प्राप्त झाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

– लेखन : मिलिंद नरगुंद.
कार्यकारी व्यवस्थापक, प्रसाद चिकित्सा संस्था.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800