इथे, म्हणजे UK मधे व भारतातही असे खुप लोक दिसतात, जे काहि ना काहि व्याधींमुळे अंथरूणाला खिळलेले आहेत. पूर्णपणे परावलंबी, कंटाळवाणे व केवळ औषधांवर जिवन जगत आहेत. शारिरीक दुर्बलता त्यांचे स्वातंत्र्य, स्वाभिमान हिरावून नेते. इतरांच्या मदतीबद्दल त्यांना अपराधी वाटत असते. स्मृतीभ्रंश व भ्रम झालेल्यांचे तर वेगळच जग असते. असे असले तरी त्यांचे अंतर्मन जागृत असते. हे सगळे त्यांच्या डोळ्यांतून, मधूनमधून का होईना पण जाणवत राहते. फक्त मेंदूवर ताबा नसल्याने शब्द सापडत नाहीत. मी हे खुप जवळून अवलोकन केलं आहे. त्यांना असे जिवन जगत असतांना काय वाटत असेल ? त्यांच्या दृष्टिकोनातून हि शब्दरचना केली आहे.
फक्त शारिरीक दुर्बलता असलेले, सरकारने “इच्छामरणाला” परवानगी द्यावी, तसा कायदा करावा याची धडपड करत आहेत. हे सगळे लोक मला महाभारतातल्या अश्वत्थाम्यासारखेच वाटतात. “इच्छामरण” हा वादग्रस्त विषय आहे. पण यांची असाह्यता मनांला भिडते. तेच या शब्दरचेनेत उतरले आहे.
धन्यवाद.
– सौ लीना फाटक.
“नवयुगाचा अश्वत्थामा”
कणाकणाने आहे जगणे,
क्षणाक्षणाने आहे मरणे ।।१।।
मणामणाचे आहे ओझे,
परावलंबी जिवन माझे ।।२।।
अपंगपणानी कैदी आहे,
जन्मठेपेची सजा आहे ।।३।।
संतुलन नाही देह-मनाचे,
आक्रंदन चाले अंतऱात्म्याचे ।।४।।
तोडा हो माझ्या या शृंखला,
बंदिस्त मी या कारागृहा, ।।५।
नको ती तुमची दया-माया,
जागवू नका हो कर्तव्याला ।।६।।
उघडा आता सारी दारे,
जीव मुक्तीला आसुसला रे, ।।७।।
पदर न पसरता “तेल” मागतो,
जखमांसाठी जीवात्म्याच्या ।।८।।
“इच्छामरण” नाही मजला,
नवयुगाच्या या “अश्वत्थाम्या” ।।९।।

– लेखन : सौ. लीना फाटक. युनायटेड किंग्डम
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800