अद्भुत शिकागो
अमेरिकेतील प्रत्येक शहराची एक खास अशी ओळख आहे. वाॅश्गिटन डी.सी.अमेरिकेची राजधानी, राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान अमेरिकन स्वातंत्र्याची सनद तर न्यूयॉर्क वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि टाईम स्क्वेअर साठी कॅलिफोर्नियातील लाॅस एंजेल्स हाॅलीवूड चित्रपट निर्मिती साठी, तशीच शिकागोची आभाळाशी स्पर्धा करणार्यां उंच इमारतीचे, मिशीगण लेक आणि त्याचबरोबर जागतिक आर्थिक उलाढालीचे व नैसर्गिक बंदर असलेले तिसऱ्या क्रमांकावरील महत्त्वाचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
या शिकागो शहरात मराठी समुदायाची टक्केवारीही लक्षणीय आहे. येथेही मराठी भाषिक मित्रमंडळ अत्यंत सक्रिय असून धुमधडाक्यात वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये गणेशोत्सव, दीपोत्सव, ह्या प्रमुख सणासह अनेक प्रसंगानुरूप साजरे केले जातात. येथे मराठीतून लिहिणारे नामवंत लेखक, कवी आहेत. ही सारी मंडळी आपले सांस्कृतिक बंध जपून आहेत.
यातील काही परिचित मित्रांबरोबर केलेल्या चर्चेतून आणि वाचनातून जे मला आकलन झाले ते आपणा बरोबर आज शेअर करीत आहे. त्यावरून शिकागोचे आकर्षण अधिक का याची कारणेही लक्षात येतील.
सर्व प्रथम उत्तम विविध क्षेत्रात नोकरीची, व्यवसायाची संधी, लाॅस एंजेल्सिस, न्यूयॉर्क, बोस्टन आणि इतर महानगरांच्या तुलनेत घरांच्या, भाड्याच्या किंमती लक्षणीय कमी आहेत. येथे वर्षभर असंख्य चालणारे उत्सव, प्रदर्शने, चित्रपट गृहे, संग्रहालये, समृद्ध सांस्कृतिक जीवन, क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, उद्याने, मनोरंजनाची उत्कृष्ट क्रेंद्रे, शहरातील सुंदर वास्तुकला आणि जोडीला सुविकसीत पायाभूत सुविधा हीच मुख्य आकर्षणची कारणे आहेत असे बर्याच जणांकडून समजले.
या शिकागोतील अनेकोत्तम अशी प्रेक्षणीय स्थळांची अगणित एकापेक्षा एक अशी ठिकाणे आहेत, पार्कस् आहेत, म्युझियम, सांस्कृतिक कार्यक्रमाची केंद्र आहेत आणि लाखो पर्यटकांना आकर्षित करणारा मिशीगण लेक आणि त्यातून जलपर्यटन करण्यासाठी ऐषोआरामी क्रुझ आहेत. पर्यटकांना आणखीन काय हवे असते ?
क्रमश:

– लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर.
निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
