महानुभाव पंथातील स्त्री प्रतिष्ठा व गौरव
चक्रधर स्वामींच्या परिवारातील स्त्रिया त्यांना आकलन न झालेले प्रश्न विचारीत असत. त्या प्रश्नांचे निरसन करतांना स्वामींनी तत्त्वज्ञानात्मक निरूपण केले. स्त्रियांच्या चर्चेतून तत्त्वज्ञानाची उकल होऊन पंथियांकरिता ते ज्ञान आज महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. महदासाप्रमाणे देमाईसा, बाईसा, भूतानंदा, एकाइसा, आऊसा, आबाइसा, उमाइसा, खेईगोई, राणाइसा, साधाइसा इत्यादी स्त्रियांनी केलेल्या पृच्छेवरून तत्त्वज्ञानात्मक चर्चा होत असे. त्यातून पंथाला उपयुक्त अशा अमूल्य तत्त्वज्ञानाची भर महानुभाव वाङ्मयात पडली. त्यामुळे बंदिस्त असणाऱ्या स्त्रीला मानसन्मान व समानतेची वागणूक देणारे तत्त्वज्ञान म्हणूनही याची महती मान्य करावी लागेल.
श्री चक्रधर निरूपीत श्रीकृष्णचरित्रामध्ये तर महदाईसाच्या प्रश्नामुळेच एक एका लीळेचे स्वामींनी केलेले आहे. यातील “श्रीकृष्ण गुणनाम श्रवणी रुक्मिणी देवी वेधू कथन” या लिळेत रुक्मिणी स्वयंवराची कथा आलेली आहे. त्याचा प्रभाव महदाईसाच्या प्रतिभा शक्तीवर होऊन तिला काव्याची प्रेरणा निर्माण झाली. एकदा विवाह करण्याच्या प्रवृत्ती प्रसंगी श्रीगोविंदप्रभू महदाइसेला म्हणाले. “आवो मेली जाय” ही शिवी दिली आणि गायला सांगितले. म्हणाली, “काय गाऊ बाबा ?” गोसावी “कृष्णा आणि रुक्मिणी स्वयंवर गा” म्हणाले, आणि त्यानंतर महदाइसेला स्फूर्ती होऊन मराठीतील पहिले काव्य जन्मास आले. हे महदंबेचे काव्य “महदंबेचे धवळे” या नावाने प्रसिद्ध आहे.
धवळे ही स्वतंत्र काव्यविष्कारामधून निर्माण झालेली प्रथम पद्यरचना आहे. यावरून महदंबा ही मराठीतील आद्य कवयित्री ठरते. महदाईसा ही महानुभाव पंथातील वाङ्मयाला योगदान देणारी प्रतिभावंत स्त्री म्हणता येईल.
एकंदरीत युगनिर्माते असणाऱ्या स्वामींनी स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा दिली. निर्माण झालेल्या प्रश्नांच्या संबंधाने स्वामींनी स्त्रियांसोबत वैचारिक आदान प्रदान केले, याचे कितीतरी दाखले लिळा चरित्राच्या पानापानात दिसून येतात. स्वामींनी नागांबिकेचे ‘बाईसा’ असे नामकरण करून तिच्या घरी जाऊन तिला प्रेमदान दिले.
अशाप्रकारे हासूबाईचे- हंसराज, रुपाइसेचे -महदाइसा, माईबाईसाचे -शांताबाईसा, दुसऱ्या माईबाईसांचे -सौभागा, आउसाचे -नायका असे नामकरण केले. अशा स्त्रियांचे स्वामींनी विशिष्ट प्रसंगानुसार त्यांच्या हिताची जपणूक करण्याकरिता त्यांना प्रासादिक नाव ठेवल्याचे दिसून येते, श्रीकृष्ण अष्टमीला बोनेबाईस देवकी होण्यास सांगून मातृत्व प्रदान केले. एल्हाईसेला भाऊ बीजेस भाऊ म्हणून बंधुप्रेम दिले. देईगावच्या ब्राह्मणांच्या पाचही मुली विधवा असल्यामुळे गावातील लोक त्यांना ‘पंचरांडा’ म्हणत असत. पण स्वामींनी ”पंचगंगा’ चांगल्या आहेत’. असा त्या मुलींचा ‘पंचगंगा’ म्हणून उल्लेख करून स्वामींनी स्त्रियांची प्रतिष्ठा जपून त्यांचा गौरव केला.
क्रमशः

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800